ज्याने त्याने आपापल्या मगदुराप्रमाणे आंबेडकरवाद जोपासल्यामुळे आज आंबेडकरवादी चळवळ आवर्तनात सापडली आहे. डॉ. आंबेडकरांचा लढा वर्चस्ववादाविरुध्द होता. परंतु त्यांचे अनुयायी व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी आज वर्चस्ववादी तथा धर्मवाद्यांशी हातमिळवणी करीत आहेत. अशा प्रवृत्तीच्या पाठीमागे झुंडीच्या झुंडी धावत असतात, याची खंत वाटते. त्यासाठी नव्या पिढीला सत्य समजण्यासाठी आंबेडकरवादी चळवळीचा इतिहास लिहिण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ आंबेडकरवादी लेखक ज. वि. पवार यांनी व्यक्त केले.
सोलापुरात शनिवारी सुरू झालेल्या तेराव्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनात पवार यांनी अध्यक्षीय भाषणात मनोगत मांडताना आंबेडकरवादी चळवळीच्या सद्यस्थितीची मांडणी केली. कल्चरल अकॅडमीने हुतात्मा स्मृतिमंदिरात आयोजिलेल्या या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील व महापौर सुशीला आबुटे यांच्यासह सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेशेखर शिवदारे, वस्त्रोद्योग विभागाचे सहसंचालक श्रीकांत मोरे आदींची उपस्थिती होती.
आंबेडकरवादी चळवळीचा इतिहास जुना आहे. तो शौर्याचा आहे. परंतु तो शब्दबध्द झाला नाही. उलट, ज्यांच्या हाती लेखण्या होत्या, त्यांनी खोटा इतिहास लिहिला. अनेकांनी सत्याचा अपलाप केला. गोबेल्स तंत्रानुसार तोच खोटा इतिहास खरा असल्याचा निर्वाळा दिला गेला. १९५६ नंतर खरा इतिहास लिहिण्यास अनेक लेखक सक्षम होते. परंतु समन्वयाअभावी इतिहास लेखन झाले नाही, अशी पाश्र्वभूमी विशद करीत पवार म्हणाले, आंबेडकरवादी साहित्य हेच खरे साहित्य आहे. आंबेडकरवादातून निर्माण झालेल्या साहित्यात ‘हिरो’सुध्दा बदलले आहेत. रामायण-महाभारतातील ‘हिरों’चे पुनर्मूल्यांकन करणारे नवे साहित्य निर्माण होत असून रामायण व महाभारताभोवती फिरणारे साहित्य यापुढे एकाच ग्रंथाभोवती फिरेल आणि त्या ग्रंथाचे नाव असेल ‘भारतीय संविधान.’ तोच भारताचा राष्ट्रीय ग्रंथ आहे, असे त्यांनी नमूद केले.
बेळगाव येथे नुकत्याच झालेल्या मराठी नाटय़ संमेलनाचा संदर्भ देताना पवार म्हणाले, बेळगावात नाटय़संमेलन होत असताना तेथील कर्नाटक सरकारने नाटय़ परिषदेचा कणाच मोडून टाकला. काही अटी लादूनच हे नाटय़ संमेलन घेण्याची परवानगी दिली. खरे तर सीमा भागातील संयुक्त महाराष्ट्र संबंधीचा ठराव गेली अनेक वर्षे मांडण्यात येत असताना त्याला कचऱ्याची टोपली दाखविली जात आहे. तसे पाहता अशा ठरावाला काहीच महत्त्व नसते. परंतु एखादी अट टाकायची आणि ती आपण निमूटपणे मान्य करायची, यात कसले आहे नाटय़, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी भालचंद्र नेमाडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. दलितमुक्ती, स्त्रीमुक्तीला आडकाठी आणणाऱ्या नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार दिल्याने प्रतिगामित्वावर सन्मानाची मोहोर उमटविण्यात आल्याचा शेरा पवार यांनी मारला.
डॉ. आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलण्याचा व आंबेडकरवादी विचार संपविण्याचा प्रयत्न आज जातीयवादी व प्रतिगामी शक्तींकडून जोमाने होत असतानाच दुदैर्वाने आंबेडकर चळवळीतील काही स्वार्थी मंडळी अशा जातीयवादी शक्तीच्या वळचणीला बसली आहेत. अशा स्वार्थी आंबेडकरवादी मंडळींचा निषेध आमदार शिंदे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात  नोंदविला. तर रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण वाढण्याची गरज प्रतिपादन केली. यावेळी संयोजक बाबूराव बनसोडे यांनी संमेलनाचा हेतू विशद केला. स्वागताध्यक्ष नगरसेवक अविनाश बनसोडे यांनीही मनोगत मांडले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन अरविंद माने व अंजना गायकवाड यांनी केले.