सांगली : निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह व नाव आपणास दिले असल्याने शिंदे गट हा शब्द आपण पुसून काढला पाहिजे, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी सांगलीत केले.श्रीमती गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवसेनेचा महिला मेळावा दैवज्ञ भवन येथे पार पडला. सुनीता मोरे यांच्यासह बजरंग पाटील, रावसाहेब घेवारे, जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे, ज्योती चांदेकर, अर्चना माळी, मनीषा पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, आता खरी शिवसेना आपलीच आहे. मात्र, अजूनही काही जण शिवसेना शिंदे गट असे अनेक जण म्हणतात, गट हा आता शब्द आपण पुसून टाकला पाहिजे. निवडणुकीत शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव आपल्याला मिळाले आहे. महिलांना आपले कोण आणि परके कोण हे आता चांगले कळाले आहे. सांगलीच्या २०१९ च्या पुरानंतर खूप अस्वच्छता होती, ही अस्वच्छता दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे त्यावेळी पुढे सरसावले होते, त्यावेळी शिंदे मुख्यमंत्री नव्हते, मात्र ज्या पद्धतीने ते सांगलीकरांच्या मदतीला धावले, त्यामुळेच सांगलीच्या श्री गणेशाच्या आशीर्वादाने त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले.
लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करणार आहोत. लाडक्या बहिणींना योजनेतून पैसे देतो म्हणून काही जणांना राग आला होता. निवडणुकीच्या तोंडावर काही जणांनी महिलांना साड्या भेट दिल्या, मात्र त्या दर्जाहिन होत्या. या योजनेच्या पैशामुळे बँकांना कोट्यवधी रुपयांचे व्याज मिळाले. त्यामुळे बँकांनी बँकेत आलेल्या महिलांना किमान बसायला खुर्ची तर द्यावी. बचत गटाकडे जर कोण पैसे मागत असेल तर शिवरायांचे जे तत्व होतं की चुकीला माफी नाही, असा प्रयोग करायला एकनाथ शिंदेंना सांगायला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.