मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात मोर्चा उघडला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर टीका करत असले तरी भाजप विरोधात मात्र त्यांनी मौन पाळल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. इतकंच नाही तर राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो, असा दावा करत नीलम गोऱ्हे यांनी इशारा दिलाय. त्या आज (११ मे) सांगलीत बोलत होत्या.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो. राजकीय गेम म्हणजे त्यांच्यासोबत भाजप राजकीय कुरघोडी करू शकते. राज ठाकरे भाजपाबद्दल अनुकूल भूमिका घेत आहेत, पण भाजपा काम झाले की राज ठाकरे यांना वाऱ्यावर सोडेल. इसापनीतीची कथा अशीच आहे.”
“भाजपा तिकीट वाटपावेळी मनसेला वाऱ्यावर सोडून देईल”
“आम्ही भाजपाचा अनुभव घेतला आहे. भाजपा त्यांना तिकीट वाटपावेळी वाऱ्यावर सोडून देईल. कारण भाजपाला उत्तर भारतीयांची मतं हवी असतात. त्यामुळे हा धडा त्यांना लक्षात येईल,” असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.
हेही वाचा : “एका आठवड्यात माफी मागा, अन्यथा…”, ‘छटी का दुध याद दिलाएंगे’ म्हणत राज ठाकरेंना महंतांचा इशारा
“उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या राजकीय भूमिका वेगवेगळ्या”
“उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या राजकीय भूमिका वेगवेगळ्या आहेत हे स्पष्ट आहे. त्यांचा वापर कोणी करत नाही ना याचा त्यांनी विचार करावा,” असा सल्लाही त्यांनी दिला.