“उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना बळीचा बकरा बनविले. ठाकरेंना जे बोलायचे असते ते राऊत यांच्याकडून वदवून घेतले जाते”, अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांना दोन दिवसांपूर्वी दिली होती. संजय राऊत यांचा वापर होत असून ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी त्यांना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला होता, पण त्यांनी तो मान्य केला नाही, असेही त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांचे दावे फेटाळून लावत, त्यांच्यावर जहरी टीका केली. ‘मी बळीचा बकरा नसून शिवसेनेचा वाघ आहे’, असे सांगत नीलम गोऱ्हे या स्वार्थी नेत्या असल्याचे राऊत म्हणाले होते. पक्षात असताना त्यांनी खा-खा खाल्लं आणि जाताना ताट-वाटी-चमचा असं सर्व काही त्या सोबत घेऊन गेल्या, अशी जळजळीत टीका राऊत यांनी केली होती.
हिणकस टीका करून दिशाभूल केली – गोऱ्हे
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वाद-प्रतिवादाचे नाही तर प्रतिक्रियांचे राजकारण सुरू आहे. एका नेत्याच्या प्रतिक्रियेनंतर दुसऱ्या नेत्याची प्रतिक्रिया हाती येते. या अलिखित नियमाप्रमाणे आता उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही संजय राऊतांवर पलटवार केला आहे. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, “मी ज्या हेतूने पक्षाबद्दल बोलले होते, त्याचे उत्तर संजय राऊत यांच्याकडे नसल्यामुळे त्यांनी दिशाभूल करण्यासाठी अत्यंत हिणकस भाषेमध्ये माझ्यावर टीका केली. तसेच ते माझ्याबद्दल बदनामीकारक बोलत आहेत. त्यांना जर खरंच उत्तर द्यायचं असेल तर मुख्यमंत्री शिंदे आणि इतर आमदार नाराज असताना त्यांची समजूत घालण्यासाठी राऊत यांनी कोणता तोडगा काढला? याचे उत्तर त्यांनी द्यावे. पण हे सोडून ते माझ्यावर वैयक्तिक टीका करत आहेत.”
हे वाचा >> “एकनाथ शिंदे यांची बाजू कधीच…”, उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना नीलम गोऱ्हेंची टीका
ज्येष्ठ असले म्हणून सर्वज्ञानी नाहीत
नीलम गोऱ्हे माझ्यानंतर शिवसेनेत आल्या. त्यांनी माझ्याबद्दल बोलू नये, असा इशारा राऊत यांनी दिला होता. त्यावर उत्तर देताना गोऱ्हे म्हणाल्या की, राऊत माझ्यापेक्षा फक्त पाच-सहा वर्षच ज्येष्ठ आहेत, याचा अर्थ त्यांना सर्वज्ञान प्राप्त झालंय, असं होत नाही. मला वाटतं, त्यांचा हा डाव आहे. दोन-तीन प्रवक्ते एकाचवेळी माझ्याविरोधात बोलत आहेत. त्यांच्यात खरंच हिंमत असेल तर मी जे वैचारिक मुद्दे मांडले त्यावर त्यांनी उत्तर द्यावे. हे दिलं सोडून आणि ते माझ्यावरच वैयक्तिक चिखलफेक करत आहेत, अशी टीका गोऱ्हे यांनी केली. पिंपरी चिंचवड परिसरात तळवडे येथील (Talavade)कारखान्यात झालेल्या दुर्घटना स्थळाची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना उपरोक्त आरोप केले.