Neelam Gorhe Controversial Statment : “ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे”, असं वक्तव्य मराठी साहित्य संमेलनात केल्याने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे अडचणीत सापडल्या आहेत. शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) महिला कार्यकर्त्यांनी नीलम गोऱ्हेंचा निषेध नोंदवला असून अनेक नेत्यांनीही त्यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. दरम्यान, नीलम गोऱ्हे यांनी कशाप्रकारे कार्यकर्त्यांची लूटमार केली, याविषयी विनायक पांडे आणि अशोक हरनावळ यांना विचारा, असं संजय राऊत म्हणाले. त्यांनीही नीलम गोऱ्हे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडून पैसे घेतले, पण मला उमेदवारी दिली नाही, अशी खंत नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी बोलून दाखवली. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

“मी शिवसेनेचा सात वर्षे शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख, उपमहापौर, महापौर होतो. पण शिवसेना प्रमुख किंवा उद्धव ठाकरेंनी कधीही पदासाठी माझ्याकडून एक रुपयाही मागितला नाही. फक्त त्यांनी माझं काम पाहून मला पदं दिली. शिवसेनेने मला जे दिलं ते भरभरून दिलं. पण नक्की सांगेन की विधानसभेच्या निवडणुकीत या बाईने माझ्याकडून पैसे घेतले होते. राज्यात अनेक कार्यकर्ते पुढे येऊन सांगतील की या बाईंनी काय काय केलं आहे”, नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर विनायक पांडे म्हणाले.

नीलम गोऱ्हेंनी कार्यकर्त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू दिलं नाही

ते पुढे म्हणाले, “मुळात त्यांनी जो विषय दिल्लीत मांडला, तो मांडण्याचा व्यासपीठ ते नव्हतं. तिथे मराठी साहित्याविषयी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती. त्यामुळे आम्हाला या बाईची किव येते. मी ४३ वर्षे शिवसेनेत आहे. मला मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत. पण काही नवीन कार्यकर्ते आहेत, ज्यांना पदाची अपेक्षा असते, त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू दिलं जात नाही. ज्या ज्या ठिकाणी नीलम गोऱ्हे संपर्क प्रमुख होत्या, तिथल्या कार्यकर्त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू दिलं गेलं नाही”, असाही आरोप विनायक पांडे यांनी केला.

पैसे परत केले, पण अर्धेच!

“मी मध्य नाशिकमधून इच्छूक होतो. अजय बोरास्ते इच्छूक होते. त्यावेळी नीलम गोऱ्हेंचा कार्यकर्ता माझ्याकडे आला. त्यांनी मला ताईंकडे नेलं. ताईंशी चर्चा करून दिली. माझी पार्श्वभूमी सांगितली. ताईंनी सांगितलं की तिकिटाकरता इतके इतके मला द्यावे लागतील. त्यातील काही पैसे मी त्यांना पोहोचवले. पण तरीही अजय बोरास्ते यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मी माझे पैसे मागितले. पण त्यांनी आज-उद्या देतो करत चालढकल केली. शेवटी मी त्यांना सांगितलं की पत्रकार परिषद घेऊन मी माध्यमांना माहिती देईन. तेव्हा त्यांनी आमदार निवास येथे काही रक्कम दिली. त्यातही कमी रक्कम दिली”, असंही त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neelam gorhe took money for vidhansabha but not gave ticket says thackeray group leader vinayak pandey sgk