शेतमालाच्या अधिक उत्पादनासाठी वापरण्यात येत असलेल्या युरियामुळे शेतीची पत कमी होते. हे नुकसान होऊ नये तसेच आयातीवर होणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने या वर्षीपासून ‘निम कोटेड’ युरिया निर्माण करण्याचे धोरण राबवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार या वर्षी ‘निम कोटेड’ युरियाचा ७० टक्के, तर पुढील वर्षांपासून शंभर टक्के पुरवठा देशभरातील शेतकऱ्यांना केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय खते, पेट्रोलियम व औषध राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेतमालाच्या वाढीसाठी युरिया अत्यंत महत्त्वाचे रासायनिक खत आहे, परंतु त्याच्या नियमित वापरामुळे शेतीचा पोत कमी होत असल्याचे संशोधनांती स्पष्ट झाले आहे. युरियाचा संबंध हवेशी आल्याने त्यात घट होते, तसेच पावसाळ्यात तो वाहून जातो. त्यामुळे युरियाला ‘निम कोटेड’ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे युरियाचा हवेशी संबंध आल्यास त्यात घट होणार नाही, तसेच पावसाळ्यात तो पूर्णपणे वाहून जाणार नाही. यावर्षी देशातील शेतकऱ्यांना ७० टक्के निम कोटेड युरियाचा, तर पुढील वर्षीपासून तो १०० टक्के करण्यात येईल. देशाला दरवर्षी २२ दशलक्ष टन युरियाची गरज भासते. त्यातील ९ दशलक्ष टन युरियाची विदेशातून आयात केली जाते. युरियावर मोठय़ा प्रमाणात अनुदान दिले जाते. निम कोटेडमुळे युरियाचा वापर कमी होईल. त्यामुळे आयातही कमी होईल. परिणामी, विदेशात जाणारा पैसा थांबवता येईल, असा युक्तिवादही अहीर यांनी याप्रसंगी केला.
केंद्र सरकारने देशात तीन हजार जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५०४ दुकानांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यापैकी १७८ दुकाने उघडण्यातही आली. त्यातील ९८ दुकानांतून ही औषध विक्री केली जात आहे. केंद्र सरकारने या संदर्भात एक नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालयात ही जेनेरिक औषधे दिली जाणार आहे. अशा पद्धतीने देशातील २८ हजार रुग्णालयांत ती पुरवली जातील. तेथे पदवीधर औषध तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांना दुकाने उघडण्यासाठी अडीच लाख रुपये दिले जातील. अशा पद्धतीने पुढील तीन वर्षांत देशातील ५० हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. यामुळे देशातील गरीब नागरिकांना २० ते २५ टक्के आर्थिक फायदा होईल. केंद्र सरकारने ५०४ औषधांचे दर जाहीर केले आहेत. या दरांपेक्षा अधिक दराने ही औषधे विकल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई केली जाणार असल्याचेही अहीर यांनी सांगितले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक धोटे उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा