अलिबाग – रायगडच्या नेऊली अलिबाग येथे असणाऱ्या जिल्हा क्रिडा संकुलाची उपेक्षा संपणार आहे. क्रिडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २५ लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.
यावेळी कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा नियोजन अधिकारी जे. एस मेहेत्रे, जिल्हा क्रिडा अधिकारी रविंद्र नाईक उपस्थित होते. नेऊली येथील क्रिडा संकुलाची देखभाल दुरुस्तीआभावी दुरावस्था झाली होती. याबाबत अलिबाग येथील पत्रकारांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना निवेदन दिले होते. जिल्हा क्रिडा संकुलाचा वनवास दूर करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केली होती. यानुसार जिल्हा क्रिडा संकुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन निधीतून २५ लाख रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले. तसेच गरज भासल्यास आणखी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नियोजन अधिकाऱ्यांना निधी वितरीत करण्याबाबतचे पत्रही त्यांनी यावेळी दिले.
हेही वाचा – “…तर उद्धव ठाकरेंना सोडणार नाही”, शेवटची चेतावणी देतोय म्हणत बावनकुळेंची धमकी
जवळपास तीन दशकांच्या प्रतिक्षेनंतर रायगड जिल्ह्याला २०१५ मध्ये क्रिडा संकूल उपलब्ध झाले होते. यानंतर हे क्रिडा संकूल खेळाडूंसाठी उपलब्ध होईल, खेळाडूंचा वनवास संपेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. नंतरच्या काळात संकुलाचा कधी मतमोजणी केंद्र म्हणून, तर कधी मतपेट्या साठवणुकीचे केंद्र म्हणून वापर झाला. नंतर कोविड काळात कोविड केंद्र म्हणूनही क्रिडा संकुलाचा वापर केला गेला. कधी जेलमधील करोना बाधित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासाठी या संकुलाचा वापर केला गेला, तर कधी कोविड सेंटर म्हणून उपचाराधीन रुग्णांच्या सुश्रुषेसाठी संकुलाचा वापर झाला. त्यामुळे खेळाची मैदाने नादुरुस्त होत गेली. देखभाल दुरुस्तीसाठी निधी नसल्याने संकुलाची उपेक्षा होत राहीली.
ही बाब माध्यमांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांना देखभाल दुरुस्तीसाठी आवश्यक निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. सुरवातीला जलतरण तलावाची दुरुस्ती करून तो खुला करून दिला होता. आता पालकमंत्री उदय सामंत यांनी क्रिडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे क्रिडा संकुलाचा वनवास संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जिल्हा क्रिंडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहोत. गरज भासल्यास आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल. काम चांगल्या पद्धतीने व्हावे याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, असे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.