Raj Thackeray on Maharashtra Assembly Elections : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून महाराष्ट्रात यंदा अनेक ठिकाणी तिहेरी लढाई पहायला मिळणार आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे असे तीन पक्ष प्रामुख्यने लढणार आहेत. त्यातच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोरेगाव येथील जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्रातील जनतेला मोठं आवाहन केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गोरेगाव येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, “सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणायचा, देशाला दिशा देणारा महाराष्ट्र म्हणायचा, ही दिशा? याला दशा म्हणतात. मी ठाण्यातील सभेत म्हटलं होतं की शरद पवार नास्तिक आहेत. देवधर्म काही पाळत नाहीत. आजपर्यंत पाळला नाही. त्यांच्या मुलीने लोकसभेतच सांगितलं आहे, की माझेवडील नास्तिक आहेत म्हणून. मी हे सर्व बाहेर बोलल्यानंतर पवार साहेब आता प्रत्येक मंदिरात जाऊन पाया पडायला लागलेत. पण हे हात जोडणंदेखील खोटं आहे.”

“निवडणुकीच्या तोंडावर काय वाट्टेल ते करतील. तुम्हाला जातीमध्ये बुडवतील, अजून कोणत्या गोष्टीत अडकवतील. पैशांचा महापूर आणतील. पण एक गोष्ट सांगतो. उद्या ज्यावेळी निवडणुकीच्या काळात पैसे वाटतील, सर्वच राजकीय पक्ष वाटतील. घ्या नक्की. कारण हे तुमचेच पैसे आहेत. इथूनच लुटलेले पैसे आहेत. ते पैसे नक्की घ्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला विजयी करा. महाराष्ट्राची धुरा माझ्या हातात आली की हा महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही आणि तुटणार नाही. आपला अभिमान, स्वाभीमान आपणच जगवला पाहिजे”, असं आश्वासन त्यांनी दिलं.

हेही वाचा >> Raj Thackeray : “शरद पवार, तुम्ही काय केलंत आयुष्यभर?”, भरसभेत राज ठाकरेंचा सवाल; फोडाफोडीच्या राजकरणावरून अजित पवारांनाही सुनावलं!

मनसे हा सत्तेतील पक्ष असेल

“जे मनाला येईल ते सरकारकडून सांगितलं जातंय, शब्द दिले जातायत. फुकट पैसे दिले जात आहे. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आचारसंहिता लागेल. महाराष्ट्राकडे तुमचं लक्ष असलंच पाहिजे. प्रत्येक मनसैनिकाचं लक्ष असलंच पाहिजे. कुठे कोणती गोष्ट घडतेय. कशाप्रकारे जनतेला फसवलं जातंय. ही गोष्ट सर्वांत महत्त्वाची आहे. म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला ना युती, ना आघाडी आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत, मी नक्की तुम्हाला सांगतो विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे हा सत्तेतील पक्ष असेल हे लक्षात ठेवावं. ज्या लोकांनी आशा अपेक्षा ठेवली आहे त्यांना आपण उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू”, असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला. “या राज्याची धुरा महाराष्ट्राने एकदा आमच्या हातात द्यावी, एवढीच विनंती करतो”, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं.