Nepal Bus Accident : नेपाळ दर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांची बस नदीत कोसळल्याने २४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १६ पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये काहीजण जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील असल्याची माहिती समोर आली. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात नर्स्यांगडी अंबुखैरनीजवळ घडला. भाविक पोखराहून काठमांडूला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीत कोसळल्याची घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेपाळमध्ये झालेल्या या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. तसेच या घटनेतील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. याप्रकरणी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेच्या विमानाने उद्या (२४ ऑगस्ट) २४ जणांचे मृतदेह नाशिकमध्ये आणण्यात येणार आहेत. तेथून कुटुंबियांकडे ते पोहोचविण्यात येणार आहेत.

हेही वाचा : नेपाळ बस अपघातातील मृतांमध्ये जळगावच्या काही भाविकांचा समावेश

जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये दुर्घटना झाल्याने २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील मदत व पुनर्वसन विभागातील अधिकारी, केंद्रीय अधिकारी यांच्याशी संवाद साधत मदतीच्या कामाची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधून भाविकांचे मृतदेह महाराष्ट्रात तातडीने आणण्याकरिता विनंती केली होती. याप्रकरणी राज्याला सर्वतोपरी मदत करू. त्यासाठी समन्वयासाठी विशेष अधिकारी नियुक्त केल्याचेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद वायुसेनेचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्या हे मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे आणण्यात येतील. तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपविण्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nepal bus accident 24 killed in nepal bus accident in jalgaon the dead body will be brought to maharashtra tomorrow by an air force plane gkt