नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात झालेले निधन हे आजही भारतीय लोकमानसाला एक न उलगडलेलं रहस्य बनून राहिले आहे. ‘त्यांच्या निधनाची बातमी हा एक बनाव होता, ते जिवंत असून रशियात आहेत, पुढे ते भारतात संन्यासी बनून परतले आणि अज्ञातवासात आयुष्य व्यतीत करत आहेत, पं. नेहरूंनी रशियन राज्यकर्त्यांना सांगून त्यांना रशियात कैदेत डांबून ठेवले आहे..’ अशा अनेकानेक वदंता वेळोवेळी आपल्याकडे पसरल्या.. काहींनी हेतुत: त्या पसरविल्या. नेताजींच्या मृत्यूसंबंधीचे गूढ उकलण्याकरता तीन चौकशी आयोग नेमण्यात आले. त्यांच्या रहस्यमय मृत्यूसंबंधीची कागदपत्रे असलेल्या सरकारी फाइली उघड कराव्यात यासाठी अनेक वेळा मागणी करण्यात आली. त्यातल्या काही फाइली पूर्वी उघड करण्यात आल्या होत्या. अलीकडेच मोदी सरकारनेही बऱ्याच फाइली उघड केल्या. परंतु या सगळ्यातून काहीच नवे निष्पन्न झालेले नाही. परंतु तरीही नेताजींच्या गूढ मृत्यूबद्दलच्या कट-कारस्थानांची थिअरी आजही अव्याहतपणे मांडली जातेच आहे. या साऱ्या घटना-घडामोडींचा सप्रमाण घेतलेला मागोवा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

।। ती बातमी ।।

२४ ऑगस्ट १९४५.

दुसरे महायुद्ध आता संपल्यात जमा होते. जपानने शरणागती पत्करून आठ दिवस लोटले होते. दोस्तराष्ट्रांचा विजय झाला होता. या युद्धात हिंदुस्थान फॅसिस्ट आणि नाझी शक्तींच्या विरोधात होता, हे खरे. या शक्ती हरल्या याचा आनंद होताच. पण याचबरोबर या महायुद्धात हिंदुस्थानच्या सीमेवर येऊन धडकलेल्या आझाद हिंद फौजेलाही माघार घ्यावी लागली होती. या फौजेकडे अवघा हिंदुस्थान मोठय़ा आशेने पाहत होता. पण आता सगळेच संपले होते. वातावरण विचित्र मळभलेले होते.

अशात अचानक ती बातमी येऊन धडकली..

‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू’!

जपानच्या ‘डोमेई’ या वृत्तसंस्थेने २३ ऑगस्टला दिलेली ती बातमी. २४ तारखेच्या ‘हिंदुस्थान स्टँडर्ड’मध्ये ती लंडन डेटलाइनने पहिल्या पानावर झळकली होती. ‘हिंदू’ आणि ‘हिंदुस्थान टाइम्स’ ही तेव्हाची दोन मोठी वृत्तपत्रे. त्यात ती २५ ला आली.

या दुर्वार्तेने अवघा देश हादरला.

दु:ख एवढे प्रचंड होते, की कोणाचा त्या घटनेवर विश्वासच बसेना.

कसा बसणार?

नेताजी हे चकमा देण्यात महामाहीर होते. अवघ्या चार वर्षांपूर्वी त्यांनी ब्रिटिशांच्या हातावर तुरी दिल्या होत्या. १७ जानेवारी १९४१ रोजी त्यांच्याविरुद्धच्या राजद्रोहाच्या खटल्याची सुनावणी सुरू होणार होती. त्याच दिवशी ब्रिटिशांच्या नजरकैदेतून ते निसटले होते. काळाच्या हातीही ते अशीच तुरी देतील याबद्दल सर्वाना खात्री होती.

नेताजी आणि आजचा भारत

।। अपघात ।।

नेताजी जपानच्या साह्यने ब्रिटिशांशी लढत होते. १५ ऑगस्टला जपानने शरणागती पत्करली. ६ तारखेला हिरोशिमा आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याने पुरते कोसळलेले ते राष्ट्र त्यानंतर केव्हाही शरण जाईल असे वातावरण होते. त्याच वातावरणात १३ ऑगस्ट रोजी नेताजी सिंगापूरला पोहोचले होते. आता पुढे काय, हा त्यांच्यासमोरील सवाल होता. मार्ग दोन होते- एकतर ब्रिटिशांपुढे शरणागती पत्करणे किंवा निसटणे. यावर विचार करण्यासाठी त्यांनी १४ ऑगस्टला आपल्या सहकाऱ्यांची बैठक बोलावली. एस. ए. अय्यर, डॉ. एम. के. लक्ष्मय्या, ए. एन. सरकार, एम. झेड. कियानी, मे. जन. अलगप्पन, कर्नल जी. आर. नागर आणि हबिबुर रहमान हे या बैठकीला उपस्थित होते. तोवर जपानच्या शरणागतीचा निर्णय झाला होता. प्रश्न होता तो जपानबरोबर आझाद हिंद फौजेनेही शरण जायचे की स्वतंत्रपणे?  बैठकीत ठरले- स्वतंत्रपणे! पण त्याला जपानच्या मंजुरीची आवश्यकता होती. जपानचे सिंगापूरमधील कमांडर तशी परवानगी देऊ  शकत नव्हते. तेव्हा ठरले की, टोक्योला विचारायचे. पण वायरलेस संपर्क तुटलेला होता. तेव्हा मग सर्वानी मिळून ठरवले की नेताजींनी स्वत:च टोक्योला जायचे. त्यासाठी आधी बँकॉकला जावे लागणार होते. तेथे आझाद हिंद सरकारचे मुख्यालय होते.

(मे. जनरल जगन्नाथ भोसले यांनी ब्रिटिश गुप्तचरांना दिलेल्या जबानीनुसार) १६ ऑगस्टला नेताजी बँकॉकला पोहोचले. त्यांच्यासोबत अय्यर, रहमान आणि लेफ्ट. कर्नल प्रीतमसिंग होते. तेथे त्यांनी आझाद हिंद सरकारमधील जपाननियुक्त मंत्री हचिया टेरूको, तसेच लेफ्ट. जन. सबुरो इसोदा आणि कर्नल कागावा यांच्याशी शरणागतीबाबत चर्चा केली. हचिया यांनी सुचविले की, त्यांनी सायगावला (म्हणजे आजची ‘हो चि मिन्ह सिटी’) जावे आणि फिल्ड मार्शल काऊंट तेराऊची हिसैची यांना भेटावे. नेताजींची काहीच हरकत नव्हती. हचिया आणि इसोदा हेही त्यांच्यासमवेत येणार होते.

१७ ऑगस्टला दुपारी ते सायगावच्या विमानतळावर उतरले. पण तेराऊची हेही आझाद हिंद फौजेच्या शरणागतीबाबत काही निर्णय देऊ  शकत नव्हते. टोक्योहून त्यांना त्याबाबत आदेश आलेला नव्हता. आता टोक्योला जाण्याखेरीज पर्याय उरला नव्हता.

पण तिकडे जायचे कसे? नेताजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी विमान उपलब्ध करून द्यायचे कसे?

दोस्तराष्ट्रांनी जपानच्या विमानांना उड्डाणबंदी घातली होती. मात्र सायगावहून एका लष्करी विमानाला परवानगी मिळाली होती. पण त्यात एकच जागा शिल्लक होती. नेताजींना एकटे सोडण्यास त्यांचे सहकारी तयार नव्हते. अखेर आपले एडीसी कर्नल हबिबुर रहमान यांना सोबत घेण्याचे नेताजींनी ठरवले. कशीबशी आणखी एका जागेची व्यवस्था करण्यात आली.

ते होते मित्सुबिशी की- २१ बॉम्बफेकी विमान. त्यात आणखी ११-१२ प्रवासी होते. लेफ्ट. जन. सुनामसा शिदेई हे त्यांपैकी एक. ते रशियन भाषेचे जाणकार. क्वांटुंग आर्मीचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून नुकतीच त्यांची नियुक्ती झाली होती. ते मांचुरियाला निघाले होते.

रात्री सातच्या सुमारास ते विमान तौरेनला (आताचे द. व्हिएतनाममधील दा नांग शहर) उतरले. रात्रीचा मुक्काम तेथेच होता. नेताजी आणि त्यांचे सहकारी एका हॉटेलमध्ये (बहुधा हॉटेल मोरीनमध्ये) थांबले. विमान सायगावहून निघाले तेव्हा त्यात आधीच जास्त वजन होते. त्यामुळे नेताजींना त्यांच्या काही बॅगा मागे ठेवाव्या लागल्या होत्या. तरीही उड्डाण करताना विमानाला संपूर्ण धावपट्टीचा वापर करावा लागला होता. त्यामुळे तौरेनला उतरल्यानंतर या विमानातील १२ विमानविरोधी मशिनगन काढून टाकण्यात आल्या. वजन किमान ६०० किलोने हलके झाले.

१८ ऑगस्ट १९४५. हाच तो काळा दिवस.

त्या दिवशी सकाळी या विमानाने व्हिएतनाममधील तौरेनहून उड्डाण केले. दुपारी दोनच्या सुमारास ते फार्मोसातील (म्हणजे आताचे तैवान) तैहोकू विमानतळावर उतरले.

जपानी एअर स्टाफ ऑफिसर मे. तारो कोनो हे या विमानानेच प्रवास करीत होते. (त्यांनी मे. जन. शाहनवाझ खान आयोगासमोर दिलेल्या जबानीनुसार) विमानाचे डावे इंजिन नीट काम करत नसल्याचे त्यांना वाटले. त्यांनी आत जाऊन त्याची तपासणी केली. त्यांच्यासोबत कॅ. नाकामुरा हा विमानतळावरील अभियंता होता. त्यानेही ते तपासून पाहिले. त्यालाही शंका आली होती. पण तपासणीत ते व्यवस्थित असल्याचे आढळून आले.

हे सुरू असताना सारे प्रवासी विमानतळाच्या इमारतीत (म्हणजे इमारत म्हणून तेथे जे काही शिल्लक राहिले होते त्यात) गेले होते. तेथे एक तंबू उभारण्यात आला होता. त्यात उपाहाराची व्यवस्था होती. नेताजींनी सँडविच आणि एक-दोन केळी खाल्ली. तोवर अडीच वाजत आले होते. कोणीतरी सर्वाना विमानात बसण्याची सूचना केली.

अडीच वाजता विमान धावपट्टीवरून धावू लागले. हलकेच त्याचा पुढचा भाग उचलला गेला. ते हवेत झेपावले. ३०-४० मीटर उंचीवर असताना अचानक मोठा आवाज झाला. विमान डावीकडे कलले. कॅ. नाकामुरा यांच्या डोळ्यांसमोर हे घडत होते. विमानाच्या डाव्या बाजूने काहीतरी खाली पडल्याचे त्यांना दिसले. तो प्रोपेलर होता. पाहता पाहता विमान हेलकावे घेऊ लागले आणि धावपट्टीपासून सुमारे १०० मीटर अंतरावर ते कोसळले. त्यावेळी त्याचा वेग किमान ३०० कि. मी. प्रति तास एवढा असावा. कोसळताच विमानाने पेट घेतला.

(कर्नल रहमान यांच्या जबानीनुसार) नेताजींच्या डोक्याला मार लागला होता. पण ते कसेबसे उभे राहिले. विमानाचा पुढचा भाग चेमटला होता. आगीने वेढला होता. ते मागच्या बाजूने बाहेर पडण्यास निघाले. पण ते अशक्य होते. आतल्या पेटय़ा आणि अन्य सामानाने दरवाजा अडला होता.

कर्नल रहमान नेताजींना म्हणाले, ‘आगे से निकलिये, नेताजी. मागे रस्ता नाहीये.’

पुढचा दरवाजाही आगीच्या ज्वालांनी वेढलेला होता. नेताजी सरळ त्या आगीतून धावत गेले. रहमानही त्यांच्यामागून बाहेर पडले.

बाहेर पडताच त्यांनी पाहिले तर पुढे दहा यार्डावर नेताजी उभे होते. त्यांच्या कपडय़ांनी पेट घेतला होता. अपघातात फुटलेल्या टाकीतील पेट्रोल त्यांच्या अंगावर सांडले होते. त्या पेट्रोलमुळे त्यांचे कपडे पेटले होते. रहमान त्यांच्याकडे धावले. त्यांनी त्यांचे शर्ट काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर बेल्ट होता. त्यामुळे शर्ट काढणे अवघड झाले होते. त्यांच्या पँटीने मात्र पेट घेतला नव्हता.

रहमान यांनी नेताजींना जमिनीवर झोपवले. त्यांचे अंग भाजले होते. डोक्यावर- बहुधा डाव्या बाजूला मोठी- सुमारे चार इंचांची जखम झाली होती. चेहरा आगीने पोळला होता. केस जळाले होते. अंगावरची भाजलेली कातडी लोंबत होती. नेताजींना प्रचंड वेदना होत असाव्यात.

अपघातात मार बसल्याने, थकव्याने रहमानही नेताजींच्या बाजूला कोसळले. तेवढय़ात त्या अवस्थेतही त्या महान नेत्याने त्यांना विचारले, ‘आप को जादा तो नहीं लगी?’

रहमान म्हणाले, ‘मी ठीक आहे असं वाटतंय.’

त्यावर नेताजी म्हणाले, ‘मी वाचत नाही असं दिसतंय.’

काही क्षणांनी ते म्हणाले, ‘जब अपने मुल्क वापस जायें तो मुल्की भाईयों को बताना, की मैं आखरी दम तक मुल्क की आझादी के लिये लडता रहा हूँ. वह जंग-ए-आझादी को जारी रखें. हिंदुस्थान जरूर आझाद होगा. उस को कोई गुलाम नहीं रख सकता.’

थोडय़ा वेळातच त्यांना जवळच्या नानमॉन लष्करी इस्पितळात नेण्यात आले. तेव्हा दुपारचे तीन वाजत आले होते.

नेताजींवर तातडीने उपचार सुरू झाले. पण..

रात्री ९ वाजता त्यांचे देहावसान झाले.

चिंतनधारा : स्वराज्याचा पाया सुराज्याने

।। अविश्वास ।।

नेताजींच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा म. गांधी पुण्यात होते. त्यांच्या सायंकालीन प्रार्थनासभेत काँग्रेसचा ध्वज अध्र्यावर घेण्यात आला. गांधीजी मात्र काहीच बोलले नाहीत. पं. नेहरूंना अबोटाबादमध्ये ही बातमी समजली. ती ऐकून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. पण ही बातमी खरी मानण्यास कोणाचेही मन तयार नव्हते. तशात २९ ऑगस्ट १९४५ रोजी आणखी एक घटना घडली.

त्या दिवशी पं. नेहरूंची पत्रकार परिषद होती. पत्रकार त्यांना विविध विषयांवर प्रश्न विचारत होते. अचानक शिकॅगो ट्रिब्यूनचा एक वार्ताहर अल्फ्रेड वॅग उभा राहिला. म्हणाला, ‘मी चार दिवसांपूर्वीच सायगावमध्ये नेताजींना जिवंत पाहिलं!’

हे साधे विधान नव्हते. एका षड्यंत्र सिद्धान्ताचे ते बीज होते.

दोनच दिवसांत- १ सप्टेंबर रोजी लंडनच्या ‘संडे ऑब्झव्‍‌र्हर’ने त्याच्या दाव्याला प्रसिद्धी दिली. बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचे जपानतर्फे सांगण्यात येत असले तरी त्यावर विश्वास ठेवण्यास ब्रिटिश वा अमेरिकी लष्करी अधिकारी तयार नसल्याचे त्या बातमीत म्हटले होते.

आता भारतातील नेतेही स्पष्टपणे हेच म्हणू लागले होते. ११ सप्टेंबरला झाशीतील सभेत नेहरूंनी आपला नेताजींच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास नसल्याचे जाहीरपणे सांगितले. गांधीजीही तेच सांगत होते. ‘नेताजींची रक्षा जरी कोणी मला दाखविली तरी ते जिवंत नाहीत यावर मी विश्वास ठेवणार नाही,’ असे गांधीजींचे विधान होते.

केंद्र सरकारच्या एका गोपनीय फाइलमध्ये (क्र.२७३/आयएनए) यालाच दुजोरा देणारी माहिती मिळते. त्या फाइलमधील एक उतारा असा आहे :

‘बोस हे जिवंत असून लपून बसले आहेत..’ असे म. गांधींनी जानेवारीच्या सुरुवातीला जाहीरपणे सांगितले होते. ते हे कशावरून म्हणतात याची कोणतीही समाधानकारक कारणे त्यांनी दिलेली नाहीत. आपला आतला आवाज असे म्हणतो असे ते सांगतात. पण काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, गांधीजींचा हा आतला आवाज म्हणजे त्यांना मिळालेली गोपनीय माहिती आहे असे काँग्रेसजनांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे, तर एका गोपनीय अहवालानुसार, नेहरूंना बोस यांचे एक पत्र आले आहे. त्यात बोस यांनी म्हटले आहे की, आपण रशियामध्ये असून तेथून पळून भारतात येण्याची आपली इच्छा आहे. आपण चित्रालमार्गे येऊ. तेथे शरद्चंद्र बोस यांचा एक मुलगा आपणास भेटेल.

पण ही कहाणी असंभव वाटते.

ज्या गुप्तचराने हा अहवाल दिला होता, त्याला स्वत:ला हे सारे असंभाव्य वाटत असले तरी भारतीय जनतेची भावना वेगळी होती.

मधल्या काळात गांधीजींचे मत मात्र बदलले होते. त्याला कारण होते, नेताजींचे जवळचे सहकारी कर्नल हबिबुर रहमान.

नेताजींच्या आझाद हिंद फौजेतील जवानांवरील खटला सुरू होता. त्यांना काबूल लाइन्स आणि लाल किल्ला येथे कैदेत ठेवण्यात आले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासमवेत गांधीजी त्या जवानांना भेटण्यासाठी गेले असताना रहमान यांच्याशी त्यांची भेट झाली. रहमान यांनी त्या अपघाताबद्दल त्यांना सविस्तर माहिती दिली. त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रार्थनासभेत गांधीजींनी आपला आधीचा विश्वास चूक होता.. नेताजी आता आपल्यात नाहीत, असे स्पष्ट केले.

३० मार्च १९४६ च्या ‘हरिजन’मध्येही त्यांनी याविषयी लिहिले होते- ‘काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रांत सुभाष बोस यांच्या मृत्यूच्या बातम्या आल्या होत्या. मी त्यांवर विश्वास ठेवला होता. पण नंतर त्या बातम्या खोटय़ा असल्याचे सिद्ध झाले. तेव्हापासून मला नेहमी असे वाटते, की स्वराज्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय नेताजी आपल्याला सोडून जाणार नाहीत. आपल्या ध्येयाच्या पूर्तीसाठी शत्रूंच्याच नव्हे, तर जगाच्या डोळ्यांत धूळ फेकण्याची थोर क्षमता नेताजींमध्ये असल्याचे मला माहीत आहे. त्यानेच माझ्या या विश्वासाला बळ दिले. नेताजी हयात आहेत या माझ्या विश्वासामागे केवळ हीच कारणे होती.’

परंतु गांधीजींच्या या निवेदनानंतरही लोकांचे समाधान झाले नव्हते. पुढे १९४९ मध्ये भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनीही बोस यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. पण लोकांच्या मनातील नेताजींची प्रतिमा त्यांना मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवू देत नव्हती.

अनेकांच्या मते, ब्रिटिशांच्या डोळ्यांत धूळ फेकून नेताजी लेफ्ट. जन. सुनामसा शिदेई यांच्यासमवेत गुपचूप रशियाला गेले होते. आपल्यामागचा ब्रिटिशांचा ससेमिरा टाळण्यासाठीच त्यांनी ही विमान अपघाताची बनावट कहाणी प्रसृत केली होती. कर्नल हबिबुर रहमान यांना ते माहीत होते. परंतु त्यांना नेताजींनी गोपनीयतेची शपथ दिली होती. खुद्द नेताजींचे बंधू शरदचंद्र बोस यांनाही असेच वाटत होते, की अपघात ही दंतकथा आहे.

।। चौकशी ।।

नेताजींच्या मृत्यूबद्दल शंका केवळ भारतीयांनाच होती असे नव्हे. २४ ऑगस्ट १९४५ रोजी ही बातमी ऐकल्यानंतर व्हाइसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी आपल्या रोजनिशीत नोंद केली होती : ‘हे खरे असेल?’

नेताजींसारख्या नेत्याबद्दल अशी बातमी आल्यानंतर त्याची खातरजमा केली जाणार नाही हे शक्यच नव्हते. अ‍ॅडमिरल माऊंटबॅटन यांच्याकडे त्यावेळी ईशान्य आशिया आणि भारत कमांडची जबाबदारी होती. डोमेई वृत्तसंस्थेने ती बातमी दिल्यानंतर लगेचच ३० ऑगस्ट १९४५ रोजी त्यांच्या मुख्यालयाने याची चौकशी सुरू केली. जपान सरकारकडे त्याबाबतचा अहवाल मागण्यात आला. युद्धसमाप्तीच्या त्या धामधुमीत जपान सरकारकडे संपूर्ण माहिती आलेली नव्हती. तेव्हा १५ सप्टेंबर १९४५ ला एक अंतरिम अहवाल पाठविण्यात आला. त्यात नेताजींच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचे नमूद करण्यात आले होते.

पण त्यानेही ब्रिटिश सरकारचे समाधान झाले नव्हते. लष्करी गुप्तचर संघटना, तसेच इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) यांच्याकडे त्या घटनेची खातरजमा करण्याचे काम सोपविण्यात आले. सप्टेंबर १९४५ मध्ये आयबीचे सहायक संचालक फिलिप फिने यांना बँकॉकला, तर सहायक संचालक डब्लू. एफ. एम. डेव्हिस यांना सायगावला पाठविण्यात आले. फिने यांच्या चौकशीतून एक बाब स्पष्टपणे समोर आली. ती म्हणजे नेताजी यांचा ब्रिटिशांना शरण जाण्याचा मुळीच विचार नव्हता. रशियाच्या मदतीने स्वातंत्र्ययुद्ध सुरू ठेवण्याची योजना त्यांनी आखली होती आणि जपानी अधिकाऱ्यांच्या मदतीने ते रशियाला जाणार होते. मात्र विमान अपघातात बोस यांचे निधन झाल्याची खबर खरी असल्याचे फिने यांच्या चौकशीत आढळून आले.

यानंतरही ब्रिटिश सरकारचा त्या बातमीच्या सत्यतेवर विश्वास बसत नव्हता असे दिसते. कारण १६ मे १९४६ रोजी लष्कराच्या ईशान्य कमांडतर्फे लेफ्ट. कर्नल जे. जी. फिगेस यांना चौकशीला जुंपण्यात आले होते. त्यातूनही वेगळे काहीच समोर आले नाही.

भारतातील माध्यमेही या चौकशीत मागे नव्हती. ‘फ्री प्रेस जर्नल’चे एस. सदानंद यांनी त्यांच्या वृत्तसंस्थेतर्फे हरिन शाह या पत्रकारास दुर्घटनास्थळी पाठवले होते. ते २२ ऑगस्ट १९४६ ला फॉर्मोसाला पोचले. नेताजींवर ज्या इस्पितळात उपचार करण्यात आले तेथील अनेकांशी ते बोलले. त्यातूनही नेताजींचा १८ ऑगस्ट १९४५ रोजी अपघाती मृत्यू झाल्याची दुर्वार्ता खरी असल्याचेच निष्पन्न झाले.

एव्हाना भारताला स्वातंत्र्याचे वेध लागले होते. त्या सर्व धामधुमीत नेताजींच्या मृत्यूचा विषय मागे पडला. पण म्हणून लोकांना नेताजींचा विसर पडला नव्हता. उलट, फाळणीच्या काळात तर त्यांच्या आठवणी अधिकच उफाळून येत होत्या. कारण सुभाषबाबू हिंदू-मुस्लीम ऐक्याचे बिनीचे शिलेदार होते. १९३८ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष असताना हिंदू आणि मुस्लीम यांच्यातल्या संबंधांत सुधारणा हा त्यांच्या प्राथमिकतेचा विषय होता. आझाद हिंद फौजेतही त्यांनी हिंदू-मुस्लीम यांच्यातील ऐक्यासाठी प्रयत्न केले होते. असा नेता आज असता तर चित्र वेगळे दिसले असते अशी आशा लोकांच्या मनात तरळून जात होती. नेताजींच्या स्मृती भारतीयांच्या मन:पटलावर कोरल्या गेल्या होत्या.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन पराक्रम दिवस म्हणून साजरा करणार – केंद्र सरकार

।। आयोग ।।

भारतात आता स्वातंत्र्याचे मोकळे वारे वाहत होते. देश नव्या दमाने उभा राहू पाहत होता. नेताजींच्या त्या अपघातास पाच वर्षांचा काळ लोटला होता. लोकांनी पुन्हा एकदा नेताजींबाबतचे सवाल विचारण्यास सुरुवात केली होती.

काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर १९३९ मध्ये नेताजींनी काँग्रेसमध्ये फॉरवर्ड ब्लॉक या गटाची स्थापना केली होती. १९४० मध्ये त्यांनी त्यास स्वतंत्र पक्षाचे स्वरूप दिले. त्याचे पहिले सरचिटणीस होते एच. व्ही. कामथ. ते नेताजींचे कट्टर अनुयायी. पुढे ते घटना समितीवरही निवडून आले. १९५१ मध्ये त्यांनी नेताजींच्या कथित मृत्यूसंबंधी सरकारला प्रश्न विचारला. त्याच्या उत्तरात उप-परराष्ट्रमंत्री बी. व्ही. केसकर यांनी नेताजींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. पण अशा उत्तरांनी नेताजींच्या अनुयायांचे समाधान होणे शक्य नव्हते. पुढच्याच वर्षी प. बंगालच्या विधानसभेत याच प्रश्नावरून गदारोळ झाला. लोकसभेच्या दर अधिवेशनात पुन: पुन्हा हा सवाल येत होता. वर्तमानपत्रांतून त्याची चर्चा होत होती. सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होते. प्रकरण संपले आहे, त्याची चौकशी करण्याची आवश्यकता नाही, असे सरकारचे म्हणणे होते.

अशात १८ सप्टेंबर १९५५ रोजी जपानच्या ‘निप्पॉन टाइम्स’ या दैनिकात बातमी आली. तिचा मथळा होता- ‘अलाइव्ह ऑर मर्डर्ड?’ ‘हयात की हत्या?’ : नेताजींबद्दलच्या सत्याची भारतीयांची मागणी!

या वृत्ताने जपानबरोबरच भारतातही खळबळ माजली. चौकशीची मागणी अधिक जोर धरू लागली. पंतप्रधान नेहरू आता त्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हते. त्यांनी भारतीय मुत्सद्दी बी. आर. सेन आणि प. बंगालचे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्याशी सल्लामसलत केली आणि अखेर १३ ऑक्टोबर १९५५ रोजी नेताजींच्या कथित मृत्यूच्या चौकशीसाठी आयोग नेमण्याचा निर्णय घेतला. त्याची जबाबदारी सोपविली जन. शाहनवाझ खान यांच्याकडे.

नेताजींसमवेत लढलेला हा सेनानी. त्यांचा विश्वासू. लालकिल्ला खटल्यात राजद्रोहाच्या आरोपाखाली ब्रिटिशांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात देशभरात वादळ उठले. त्यापुढे ब्रिटिश सरकार नमले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी गांधीजींचे अनुयायित्व पत्करले.

नेहरू सरकारने नेताजी प्रकरणाच्या चौकशी आयोगाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपविले. सदस्य म्हणून सनदी अधिकारी शशांक मित्र आणि सुभाषबाबूंचे बंधू सुरेशचंद्र बोस यांची नियुक्ती करण्यात आली. नेताजी प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने नेमलेला हा पहिला आयोग. त्याचा निष्कर्ष सरकारच्या आजवरच्या भूमिकेशी सुसंगत असाच होता. पण तो बहुमताने काढलेला निष्कर्ष होता. आयोगाचे तिसरे सदस्य सुरेशचंद्र बोस यांच्या मते नेताजी अजून हयात होते!

आयोगाच्या अहवालास त्यांनी आपले विरोधी मत जोडले होते. नंतर नोव्हेंबर १९५६ मध्ये त्यांनी ते स्वत:च प्रसिद्ध केले. जन. शाहनवाझ खान यांना सत्य शोधायचे नव्हते. त्यांना केवळ पुराव्यांमधील फटी बुजवायच्या होत्या, अशा आशयाचा आरोप त्यात त्यांनी केला होता. नेताजींना तो अपघात झालाच नाही. ते ठरल्यानुसार रशियाला गेले. कर्नल रहमान हे त्यांचे परमविश्वासू. त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली असावी. त्यामुळेच ते अपघाती मृत्यूची कहाणी सांगत आहेत, असे सुरेशबाबूंचे म्हणणे होते. या मतपुस्तिकेच्या शेवटी त्यांनी सर्वसामान्य जनतेला आवाहन केले होते की, सरकारकडून सर्व गोपनीय कागदपत्रे जाहीर करण्याची मागणी करा.

शाहनवाझ आयोगाच्या अहवालानंतर सरकारच्या लेखी खरे तर हा प्रश्न संपला होता. समितीने नेताजींच्या मृत्यूच्या घटनेवर शिक्कामोर्तब केले होते. पण सुरेशचंद्र बोसांच्या मतामुळे त्या सगळ्यावर पाणी पडले होते. लोकांच्या मनातील शंका-कुशंका वाढत चालल्या होत्या. या लोकभावनेचा फायदा उठविण्याचेही प्रयत्न सुरू होते.

नेताजी जिवंत आहेत. ते सैबेरियामध्ये रशियाच्या कैदेत आहेत. त्यांनी संन्यास घेतला आहे. ते साधू बनून वावरत आहेत. नेहरूंच्या अन्त्यसंस्काराच्या वेळी ते हजर होते. नेहरू त्यांना भारतात येऊ  देत नाहीत. नेहरूंच्या सांगण्यावरून स्टॅलिनने त्यांची हत्या केली.. अशा अफवांना साठच्या दशकात जोर आला होता. शौलमारीबाबा हे प्रकरण त्यातलेच एक. प. बंगालमधील कुचबिहार जिल्ह्य़ातील फालाकाटानजीक शौलमारी येथे या चेनस्मोकर बाबाचा आश्रम होता. तो आपण नेताजी असल्याचे सांगत असे. नेताजींच्या अनेक अनुयायांनाही तसे वाटत होते. नेताजींनी स्थापन केलेल्या ‘बंगाल व्हॉलिंटियर्स’ या गटाचे एक सदस्य, माजी क्रांतिकारी सत्य गुप्ता यांनी तर पत्रकार परिषद घेऊन तेच नेताजी असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पोलीस आणि आयबीने त्यांच्यावर नजर ठेवणे सुरू केले. त्यांच्या दाव्याची खातरजमा करणे सुरू केले. त्याचे अनेक गोपनीय अहवाल आज उपलब्ध आहेत. पण हा बाबा तोतयाच निघाला. वेळोवेळी अशी ‘तोतयांची बंडे’ माजत होती. नेताजी हयात आहेत, ही अनेकांची श्रद्धा बनली होती. त्यासाठी ते कशावरही विश्वास ठेवण्यास तयार होते. विविध षड्यंत्र सिद्धान्त तयार केले जात होते. ‘आयबी’नेच हा तोतया उभा केला, हा त्यातलाच एक सिद्धान्त.

।। सेल नं. ४५ ।।

नेताजी रशियाच्या कैदेत असल्याचा दावा करण्यात आघाडीवर होते बिहारमधील काँग्रेसचे (माजी) खासदार सत्यनारायण सिन्हा. त्यांना अनेक परकी भाषा येत होत्या. सोव्हिएत तसेच मुसोलिनीच्या फौजेत ते होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेतही काम केले होते. त्यांनी स्वत:हून नेताजी प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यासाठी ते तैवानलाही जाऊन आले. त्यानंतर १९६५ मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिले- ‘नेताजी मिस्ट्री’! त्यात त्यांनी नेताजींना ठेवण्यात आलेल्या तुरुंगाचे नावही दिले होते. ते होते- याकुत्स्क. आणि कोठडीचा क्रमांक होता- ४५.

‘त्यांच्या विमानाला अपघात झालाच नव्हता. नेताजी रशियाला गेले होते. तेथे स्टॅलिनने त्यांना कैदेत ठेवले..’ ही माहिती सिन्हा यांना दिली कोझ्लोव्ह नावाच्या गुप्तचराने. तो ट्रॉटस्कीवादी असल्याच्या संशयावरून स्टॅलिनने त्यालाही तुरुंगात टाकले होते. तेथे त्याने नेताजींना पाहिले, हा सिन्हा यांचा दावा. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे त्यांनी नेहरूंना भेटून सांगितले. पण त्यांनी त्याकडे लक्षच दिले नाही.

याला जोडून आणखी एक दावा करण्यात येत होता, की नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे परराष्ट्रमंत्रीपद ठेवले, ते नेताजींना संपविण्यासाठी! त्यासाठी त्यांनी रशियात राजदूत म्हणून पाठवले आपल्या बहिणीला. त्यांच्यानंतर तेथे थोर तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली
राधाकृष्णन् यांना पाठविण्यात आले. ते म्हणे नेताजींना जाऊन भेटले.

आपणास परत यायचे आहे, असे पत्रही नेताजींनी नेहरूंना पाठवले होते. पण नेहरूंनी त्यांना येऊ  दिले नाही.. हे आणखी एक उपकथानक. त्यावरून आता सुब्रमण्यम स्वामींसारखी मंडळी नेहरूंना खुनी ठरवीत आहेत. तर साठ-सत्तरच्या दशकांत अशा प्रकारचा प्रचार होत होता.

दुसरीकडे एच. व्ही. कामत, अटलबिहारी वाजपेयी, मधु लिमये यांसारखे नेते सरकारकडे नव्या चौकशीची मागणी करू लागले होते. लोकसभेत सातत्याने प्रश्न विचारले जात होते. अनेक खासदारांचा त्याला पाठिंबा होता. पंतप्रधान इंदिरा गांधींना पत्र पाठवून ते चौकशीची मागणी करीत होते. लोकभावना त्यांच्या बाजूने होती. शाहनवाझ समितीपासून अनेक गोपनीय कागदपत्रे दडवून ठेवण्यात आली होती, असा आरोप करण्यात येत होता. सरकार चौकशीला का घाबरत आहे, असा सवालही विचारला जात होता.

अखेर या दबावापुढे इंदिरा गांधी झुकल्या. ११ जुलै १९७० रोजी त्यांनी एक-सदस्यीय चौकशी आयोग नेमण्याचा आदेश दिला.

अग्रलेख : चुकीचा बरोबर अर्थ!

।। पुन्हा आयोग ।।

निवृत्त न्या. गोपालदास तथा जी. डी. खोसला. महात्मा गांधी हत्या खटल्यामुळे सर्वपरिचित असलेले हे नाव. त्यांच्याकडे आता नेताजी प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली. तीन वर्षांनी त्यांनी आपला अहवाल सरकारला सादर केला. शाहनवाझ आयोगाच्या अहवालाहून तो वेगळा नव्हता. पुढच्या काळात शाहनवाझ आयोगाच्या चौकशीवर अनेक आक्षेप घेण्यात आले होते. नेहरूंवर आरोप करण्यात आले होते. नेताजी कुठे कुठे दिसल्याच्या अफवा पसरविण्यात आल्या होत्या. त्या सगळ्याचा समाचार घेताना न्या. खोसला यांनी पुन्हा एकदा नि:संदिग्धपणे बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले.

सप्टेंबर १९७४ मध्ये हा अहवाल संसदेत मांडण्यात आला. नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नाही, यावर श्रद्धा असलेल्यांना तो मान्य असणे शक्यच नव्हते. त्या श्रद्धाळूंनी मोठाच गदारोळ केला. खासदार समर गुहा यांनी तर तो अहवाल तेथेच टराटरा फाडला.

समर गुहा हे सुभाषबाबूंचे सहकारी. नंतर ते प्रजासमाजवादी पक्षात गेले. १९६७ ला पहिल्यांदा ते प. बंगालमधून लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर ७१ आणि ७७ ची निवडणूकही त्यांनी जिंकली. पुढे ते जनता दल (सेक्युलर)मध्ये गेले. नेताजींचा विमान अपघात मृत्यू झालाच नाही यावर त्यांचा अखेपर्यंत विश्वास होता. शाहनवाझ आणि खोसला आयोगाने सत्य दडवले आहे असे त्यांचे मत होते.

मधल्या काळात केंद्रात सत्ताबदल झाला होता. जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले होते. आता नेताजींच्या मृत्यूचे गूढ उलगडणे सोपे झाले होते. गुहा यांनी लागलीच ऑगस्ट १९७७ मध्ये संसदेत खोसला आयोगाविरोधात ठराव मांडला. पुन्हा चौकशी आयोग बसवावा अशी मागणी त्यांनी केली. त्याला आपला विरोध नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री चरणसिंह यांनी सांगितले. पण मोरारजी सरकारने पुढे गुहा यांना शांत केले.

याच काळात १९७८ मध्ये खोसला आयोगाच्या निष्कर्षांची चिरफाड करणारे पुस्तक गुहा यांनी प्रसिद्ध केले. त्याचे नाव : ‘नेताजी- डेड ऑर अलाइव्ह?’ या पुस्तकाचे प्रकाशन केले राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी. त्या भाषणात राष्ट्रपती म्हणाले, ‘भारत पुन्हा एकदा नेताजींबाबतच्या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करील. नेताजी रशियात असतील तर त्यांना परत पाठवावे असा आग्रह रशियाकडे धरील.’ नेताजी रशियामध्येच असावेत, हा संशय किती खोलवर आणि किती वपर्यंत रुजला होता याचे हे उदाहरण.

या षड्यंत्र सिद्धान्तात विसंगती अशी, की त्याचवेळी नेताजी भारतात साधू बनून राहत आहेत असेही अनेकांना वाटत होते. खुद्द गुहा यांनीच तसे जाहीर केले होते. तेही भर संसदेत.

२८ ऑगस्ट १९७८ रोजी लोकसभेत मोरारजी देसाई यांनी गुहा यांना त्यांचा चौकशी आयोग नेमण्याचा ठराव मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी गुहा म्हणाले, अशी चौकशी करण्याची गरजच नाही. मला माहीत आहे- नेताजी जिवंत आहेत. ते स्वतंत्र आहेत. अनेकजण त्यावेळी त्यांना हसले.

पण त्यानंतर पाचच महिन्यांनी गुहा यांनी त्याचा ‘पुरावा’च सादर केला. कोलकात्यात एका पत्रकार परिषदेत त्यांनी नेताजींचे एक वर्षांपूर्वी ‘घेतलेले’ छायाचित्र जाहीर केले. ‘पिता आणि पुत्रीने रचलेल्या कटाचे पितळ विद्यमान सरकारकडून उघडकीस आणण्यात येत आहे,’ असे ते म्हणाले. २३ जानेवारी १९७९ ला वर्तमानपत्रांत ही बातमी प्रसिद्ध झाली. पुन्हा एकदा देशात संशयाचे वातावरण निर्माण झाले. पण..

गुहा यांनी सादर केलेले छायाचित्र बनावट आहे. आणि शरदचंद्र बोस यांच्या धडावर सुभाषबाबूंचे डोके चिकटवून ते तयार करण्यात आले आहे असे उघडकीस आले. गुहा यांचे सारेच प्रयत्न फसले. छायाचित्र बनावट निघाले. नवा चौकशी आयोग स्थापण्याची मागणीही हवेतच विरली.

ती पूर्ण होण्यास आणखी वीस वर्षांचा काळ लोटणार होता.

सन १९९९.

त्या अपघातास आता ५४ वष्रे उलटून गेली होती.

स्वातंत्र्य, फाळणी, युद्धे, आणीबाणी, दहशतवाद, रंगीत टीव्ही, मंडल-कमंडल, आíथक उदारीकरण, संगणक क्रांती.. राष्ट्राचा जीवनरथ पुढे पुढे धावत होता. नुकतीच देशाने दिल्लीतील सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा अटलबिहारी वाजपेयी यांच्या हाती सोपविली होती. िहदुत्ववादी विचारांचे सरकार सत्तेवर होते. नेताजी प्रकरण हे नेहरूंचे षड्यंत्र आहे असे मानणाऱ्यांच्या आशा त्यामुळे पल्लवित झाल्या होत्या. आता तरी नेताजी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल असे त्यांना वाटत होते.

ऐंशीच्या दशकात हे प्रकरण काहीसे लोकविस्मृतीच्या फडताळात जाऊन पडले होते. पण तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी १० ऑक्टोबर १९९१ रोजी राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांना पाठविलेल्या पत्राने हे निद्रिस्त वादळ पुन्हा उठले.

व्ही. पी. सिंग सरकारच्या काळापासूनच नेताजींचा अस्थिकलश भारतात आणण्यासाठीच्या हालचाली सुरू होत्या. (गोपनीय फाइल- पीएमओ ८००/६/सी/१/९०-पॉल) नेताजींच्या कुटुंबातील काही सदस्यही त्याच्या बाजूचे होते. परंतु नेताजींची एकुलती एक कन्या डॉ. अनिता बोस-पाफ यांना मात्र त्याबद्दल संशय होता. म्हणजे नेताजींचा त्या अपघातात मृत्यू झाला असणे शक्य आहे, असे त्यांचे मत. परंतु रेंकोजी मंदिरातील अस्थिकलशाबाबत त्या काहीशा साशंक होत्या. त्याबद्दलचा वाद सुरू असतानाच नरसिंह राव यांनी नेताजींना मरणोत्तर भारतरत्न द्यावे असा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठविला. त्या संदर्भातील गोपनीय फाइलनुसार (पीएमओ ८७०/ ११/ पी/ १६/ ९२-पॉल) २३ जानेवारी १९९२ रोजी हा किताब त्यांना अर्पण करावा अशी सूचना राव यांनी केली. राष्ट्रपती भवनातून २२ जानेवारी रोजी तसे पत्रक काढण्यात आले. ते पाहताच नेताजी ‘हयातवादी’ संतापले. नेताजींना मरणोत्तर भारतरत्न देणे म्हणजे त्यांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब करणे. याला त्यांचा विरोध होता. या वादामुळे पुन्हा एकदा नव्या चौकशीची मागणी जोर धरू लागली. काहीजण न्यायालयात गेले. अशा चौकशीला वाजपेयी सरकारचा विरोध असण्याचे काही कारणच नव्हते. या चौकशीतून काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांचा- म्हणजे नेहरूंचा पर्दाफाश होईल, अशी कुजबुज नेहमीच सुरू असे. ती खरे ठरणे म्हणजे भाजपला सत्तेचा अमरपट्टा मिळणे. तशात आता कोलकाता उच्च न्यायालयानेही चौकशीचे निर्देश दिले होते. तेव्हा १४ एप्रिल १९९९ रोजी वाजपेयी सरकारने नेताजी प्रकरणाच्या चौकशीसाठी नवा आयोग नेमण्याची घोषणा केली. त्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मनोजकुमार मुखर्जी यांच्यावर सोपविली.

॥ बनाव? ॥

मुखर्जी आयोगासमोर एक महत्त्वाचा प्रश्न होता. नेताजी हयात आहेत की नाहीत? हयात नसतील, तर मृत्यू कधी झाला?

त्यांच्या मृत्यूच्याही पाच कथा होत्या.. पाच तारखा होत्या. (मुखर्जी अहवाल, खंड १, प्रकरण ३, ४)

१. १५ ऑगस्ट १९४५ रोजी लाल किल्ल्यात त्यांची हत्या करण्यात आली. (हा ‘नेताजी के लाल केलिये होत्त्या’ या पुस्तकाचे लेखक उषारंजन भट्टाचारजी यांचा दावा.)

२. १८ ऑगस्ट १९४५ रोजी तवानमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला.

३. १९७७ मध्ये डेहराडूनमध्ये त्यांचे निधन झाले.

४. २१ मे १९७७ रोजी श्योपूरकलाँ (मध्य प्रदेश) येथे ते मृत्युमुखी पडले.

५. १६ सप्टेंबर १९८५ रोजी फैजाबादमध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला.

या सर्व कहाण्या आणि तारखा मुखर्जी आयोगाने उडवून लावल्या. लाल किल्ल्यातील हत्येची कहाणी हास्यास्पदच होती. श्योपूरकलाँची कहाणी त्याहून भन्नाट होती. त्यानुसार १९४६ मध्ये मध्य प्रदेशातील पंडोला नावाच्या खेडय़ात एक विमान कोसळले. त्यात तिघेजण होते. नेताजी, कर्नल हबिबुर रहमान आणि.. अ‍ॅडाल्फ हिटलर! ते तिघेही वाचले. पकी नेताजी श्योपूरकलाँमध्येच ज्योतिर्देव या नावाने साधू बनून राहिले. मुखर्जी यांनी यासंदर्भात पाच साक्षीदारांची तपासणी केली आणि निष्कर्ष काढला : या नावाचा साधू तेथे होता. पण तो नेताजी नव्हे.

यातील दोन दाव्यांची आयोगाने कसून चौकशी केली. एक म्हणजे विमान अपघात आणि दुसरा फैजाबादमधील मृत्यू. आयोगाने जपान, तवान, रशिया आदी देशांना भेटी दिल्या. तेथील, तसेच केंद्र सरकारच्या ताब्यातील गोपनीय फाइलींचा अभ्यास केला. विविध साक्षीदारांची तपासणी केली. यातून एक बाब स्पष्ट झाली की, विमान अपघाताबाबतच्या विविध साक्षीदारांच्या माहितीमध्ये तफावत आहे, विसंगती
आहे. एकतर तो अपघात आणि त्यानंतरचा नेताजींचा मृत्यू याबाबत ठोस कागदपत्रेच नाहीत. नेताजींवर ज्या रुग्णालयात उपचार करण्यात आले होते, तेथील संबंधितांच्या जबान्या एकमेकांशी मेळ खात नाहीत. त्याबाबतचे कागदोपत्री पुरावे उपलब्ध नाहीत. नानमॉन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले डॉ. कॅ. तेनायोशी योशिमी यांनी. शाहनवाझ समितीसमोर त्यांनी दिलेल्या साक्षीनुसार, त्यांनीच नेताजींचे मृत्यू प्रमाणपत्र दिले. त्यात मृत व्यक्तीचे नाव होते- कता काना (जपानीत- चंद्रा बोस)! पण जपानी सरकारने १९५५ रोजी भारतास दिलेल्या मृत्यू प्रमाणपत्रात ‘इचिरो ओकुरा’ असे भलतेच नाव होते. डॉ. योशिमी यांचे सहकारी डॉ. तोयोशी त्सुरुता यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी हे प्रमाणपत्र दिले होते.

असा सगळाच घोळ.

मुखर्जी आयोगाच्या निष्कर्षांनुसार, नेताजींना सुखरूप रशियाला जाता यावे यासाठी जपानी अधिकारी आणि हबिबुर रहमान यांनी मिळून हा डाव रचला होता. इतरांची दिशाभूल करण्यासाठी इचिरो आकुरो यांचा मृत्यू आणि अंत्यसंस्काराची कागदपत्रे नेताजींची म्हणून दाखविण्यात आली.

तात्पर्य- तवानमधील अपघात हा बनाव होता.

मग त्यानंतर नेताजींचे काय झाले? ते रशियाला गेले?

मुखर्जी आयोगाचे यावर उत्तर एवढेच, की पुराव्यांअभावी त्याचे उत्तर देता येत नाही. पण नेताजी हयातवाद्यांकडे त्याचे उत्तर आहे. डॉ. पुरबी रॉय या त्यांपकी एक. त्या इतिहास संशोधक. जाधवपूर विद्यापीठात त्या ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ हा विषय शिकवायच्या. ‘द सर्च फॉर नेताजी : न्यू फाइंडिंग्ज’ हे त्यांचे गाजलेले पुस्तक. त्यांच्या संशोधनानुसार, नेताजी रशियामध्ये गेले. तेथेच ‘गायब’ झाले. ‘इंडियाज बिगेस्ट कव्हर-अप’ या पुस्तकाचे लेखक पत्रकार अनुज धर यांचेही मत ‘नेताजी रशियात गेले’ असेच आहे. पण त्यांच्या म्हणण्यानुसार, ते तेथून परतले. भारतात आले. साधू बनून राहिले. त्यांचे नाव- गुमनामीबाबा ऊर्फ भगवानजी.

गुमनामीबाबांची कहाणी सुरू झाली ती त्यांच्या मृत्यूने.

१६ सप्टेंबर १९८५ रोजी फैजाबादमध्ये त्यांचा मृत्यू झाला. शरयूकिनारी त्यांच्यावर १३-१४ लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाला. फैजाबादमधील नागरिकांच्या दृष्टीने तोवर त्यात विशेष असे काहीही नव्हते. वादळ उठले ते ‘नये लोग’ या स्थानिक दैनिकातील एका बातमीने. बाबांच्या मृत्यूनंतर ४२ दिवसांनी- २८ ऑक्टोबर रोजी ती प्रसिद्ध झाली. तिचा मथळा होता- ‘फैजाबाद में अज्ञातवास कर रहे नेता सुभाषचन्द्र बोस नहीं रहे!’ चंद्रकुमार श्रीवास्तव आणि रामतीर्थ विकल या पत्रकारांच्या या वृत्ताने स्वतंत्र भारतातील एका सर्वात मोठय़ा गूढकथेला जन्म दिला.

या कथेने एक महत्त्वाचे काम केले. नेताजी रशियात आहेत हे नेहरूंना ठावूक होते, डॉ. राधाकृष्णन् नेताजींना रशियात भेटले होते, नेहरूंनी नेताजींना भारतात येऊ दिले नाही, स्टॅलिनला सांगून तुरुंगात डांबले, नेताजींची हत्या करविली.. असे सर्व आरोप धुऊन टाकले. भगवानजी बनलेल्या नेताजींना गुमनामीतच राहायचे होते, तर मग नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी त्यांच्याबाबतच्या गोपनीय फायली जाणीवपूर्वक नष्ट केल्या, या आरोपातही काही अर्थ राहत नाही. इतरांनी त्यांचे अस्तित्व दडवून ठेवले तर ते चांगलेच केले असे याबाबत म्हणावे लागेल.

या कहाणीनुसार, १९६४ मध्ये गुमनामीबाबा फैजाबादला आले. नंतर अयोध्या आणि बस्ती येथे वेगवेगळ्या ठिकाणी राहिले. १९८३ पासून ते फैजाबादमधील रामभवन या बंगल्याच्या आवारातील एका घरात राहू लागले. डॉ. आर. पी. मिश्र आणि डॉ. प्रियब्रत बॅनर्जी हे त्यांचे जवळचे अनुयायी. त्यांनी तेथे बाबांच्या निवासाची व्यवस्था केली होती. या बंगल्याचे मालक होते निवृत्त दंडाधिकारी गुरुबसंत सिंग. त्यांचा मुलगा शक्तीसिंग याने दिलेल्या माहितीनुसार, बाबा कोणाला भेटत नसत. चेहरा दाखवत नसत. बोललेच तर पडद्याआडून बोलत असत. खुद्द शक्तीसिंग यांनीही त्यांना कधी पाहिलेले नव्हते. ‘नेताजी लिव्हिंग डेंजरसली’ (लेखक-पत्रकार किंगशुक नाग) या पुस्तकात शक्तीसिंग यांचा एक किस्सा दिला आहे. त्यांच्या ओळखीचे एक पोलीस अधिकारी होते. बाबांचे रहस्य उलगडण्याचा त्यांनी चंग बांधला होता. एके सकाळी ते काही पोलिसांना घेऊन रामभवनात आले. अचानक काहीतरी झाले आणि ते आले तसे मागच्या पावली निघून गेले. बहुधा कोणत्यातरी अनामिक शक्तीच्या प्रभावामुळे तसे घडले असावे! थोडक्यात, या बाबांमध्ये दैवी शक्ती होती!!

त्यांच्या अनुयायांच्या म्हणण्यानुसार, बाबांना उत्तम िहदी, बंगाली आणि इंग्रजी येत होती. त्यांच्या बोलण्या-वागण्यावरून तेच नेताजी आहेत, यावर त्यांच्या अनुयायांचा विश्वास होता. त्यात अनेक प्रतिष्ठित, उच्चशिक्षित होते. त्यातील काही तर प्रत्यक्ष सुभाषबाबूंना भेटलेले होते.

या लोकांना ते अधूनमधून आपल्या पूर्वायुष्यातील काही गोष्टी सांगत. त्यात युद्धाचे, राजकारणाचे अनेक संदर्भ असत. त्यांची अशी अनेक वक्तव्ये, किस्से एका बंगाली पुस्तकात दिलेले आहेत. त्याचे नाव- ‘ओई महामानब आसे’! लेखक आहेत- चरणिक. हे अर्थातच टोपणनाव आहे. या पुस्तकात ७०-८० च्या दशकातील अफगाणिस्तानमधील सोव्हिएत आक्रमणासारख्या आंतरराष्ट्रीय घटनांचेही उल्लेख येतात. अशा गोष्टींवरून त्यांच्या अनुयायांची खात्रीच पटलेली होती की, ते नेताजीच आहेत. लीला रॉय या त्यातील एक. त्या क्रांतिकारी नेत्या होत्या. सुभाषबाबूंसमवेत त्यांनी काम केले होते. संसदेत त्यांचे छायाचित्र लावलेले आहे. अनुज धर यांच्या पुस्तकानुसार, लीला रॉय या स्वत: गुमनामीबाबा यांना भेटल्या होत्या आणि त्या भेटीतून त्यांची खात्री पटली होती, की ते नेताजीच आहेत. १९७० मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्याप्रमाणेच आणखी एक महत्त्वाची व्यक्ती बाबांच्या संपर्कात होती. ती म्हणजे डॉ. पबित्रमोहन रॉय. हे आझाद िहद सेनेतील गुप्तचर अधिकारी. त्यांच्यामुळेच लीला रॉय यांना बाबांची ओळख झाली.

आता प्रश्न असा येतो, की भारतात येण्यापूर्वी ते कुठे होते?

‘ओई महामानब आसे’ या पुस्तकानुसार, बाबा सांगत, की रशियातून ते १९४९ ला बाहेर पडले. तेथून ते चीनला गेले. तेही माओ-त्से-तुंग यांचे अतिथी म्हणून. १ऑक्टोबर १९४९ ला ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’चा जन्म झाला. त्या कार्यक्रमाला बाबा उपस्थित होते. याचा पुरावा : ७ ऑक्टोबर १९४९ रोजी शरदचंद्र बोस यांच्या ‘नेशन’ या दैनिकाने पहिल्या पानावर ‘नेताजी इन् रेड चायना’ अशी बातमी प्रसिद्ध केली होती. ती आधारलेली होती एका विदेशी वृत्तसंस्थेच्या पत्रकाराच्या माहितीवर. त्याच्याही पुढची धक्कादायक बाब म्हणजे तमिळनाडूतील फॉरवर्ड ब्लॉकचे नेते आणि माजी खासदार मुथुरामिलगम थेवर यांनी आपण चीनमध्ये गुप्तपणे नेताजींना भेटलो, असा जाहीर दावा केला होता.

तर चीनमधून नेताजी १९५५ मध्ये भारतात परतले. येथे आल्यानंतर त्यांनी संन्यास घेतला. भगवानजी, महाकाल, गुमनामीबाबा या नावाने ते ओळखले जाऊ लागले. १९८५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्याजवळ सापडलेल्या सामानावरून तर गुमनामीबाबा हेच नेताजी यावर जणू शिक्कामोर्तबच झाले. या सामानात होती अलेक्झांडर सोल्त्झेनित्सिन यांचे ‘गुलाग आíचपेलॅगो’, ब्रिगे. जे. पी. दळवी यांचे ‘हिमालयन ब्लंडर’, सुरेशचंद्र बोस यांचा ‘डिसेंटिएन्ट रिपोर्ट’; झालेच तर शेक्सपिअरची काही नाटकं, चार्ल्स डिकन्स, पी. जी. वूडहाऊसच्या कादंबऱ्या, कुलदीप नय्यर, मौलाना आझाद यांची राजकीय विषयांवरील अशी बरीच पुस्तके. विशेष म्हणजे त्यांत बम्र्युडा ट्रँगल (चार्लस् बेíलट्झ), फ्लाईंग सॉसर्स फेअरवेल (जॉर्ज अ‍ॅडम्स्की), लाइफ बीयॉंड डेथ (स्वामी अभेदानंद), सेलिब्रेटेड  क्राइम्स (आय. जी. बर्नहॅम) अशीही पुस्तके होती. याशिवाय एक कोरोना टाईपरायटर, रोलेक्स घडय़ाळ, नकाशे, वर्तमानपत्रांची अनेक कात्रणे, पत्रे अशा गोष्टीही त्यांच्याकडे सापडल्या. या पत्रांमध्ये एक पत्र होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुरुजी माधव गोळवलकर यांचे. मात्र, ते ‘स्वामी श्री विजयानंदजी महाराज’ यांना उद्देशून लिहिलेले होते.

‘नये लोग’ आणि त्यानंतर अन्य काही वृत्तपत्रांत याबद्दलच्या बातम्या आल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड खळबळ माजली. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी होऊ लागली. हे सगळे पाहून सुरेशचंद्र बोस यांची कन्या आणि नेताजींची पुतणी ललिता बोस या उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीरबहादूर सिंह यांना भेटल्या. बाबांच्या साहित्याचा लिलाव करण्यात येणार होता, तो रोखावा आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी त्यांची मागणी होती. त्यासाठी नंतर त्या उच्च न्यायालयातही गेल्या. त्यावर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि तीन महिन्यांत नेताजींचे स्मारक बांधावे असा आदेश न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिला.

या सगळ्या गोष्टींवरून बाबा हेच नेताजी असे मानण्यास कोणाची हरकत असेल? अनेकजण छातीठोकपणे तेच सांगत आहेत.

परंतु काहींचे मत याहून वेगळे आहे.

‘नये लोग’मधील त्या बातमीनंतर फैजाबादमधील ‘जनमोर्चा’ या वृत्तपत्राचे संपादक शीतलसिंह यांनी आपले काही बातमीदार या प्रकरणाच्या मागे लावले. बाबा हेच नेताजी असल्याचे आझाद िहद फौजेतील गुप्तचर अधिकारी पबित्रमोहन रॉय सांगत असल्याचा बाबांच्या अनुयायांचा दावा होता. शीतलसिंह यांनी कोलकात्यात जाऊन रॉय यांची मुलाखत घेतली. ‘जनमोर्चा’च्या ६ नोव्हेंबर १९८५ च्या अंकात ती प्रसिद्ध झाली. त्यात रॉय यांनी म्हटले होते, ‘आम्ही नेताजींच्या शोधात कोहिमापासून पंजाबपर्यंत सगळे साधू आणि रहस्यमयी व्यक्तींना भेटत आहोत. त्याच प्रकारे आम्ही बाबाजींना बस्ती, फैजाबाद आणि अयोध्येत भेटलो. परंतु मी ठामपणे सांगतो- ते नेताजी सुभाषचंद्र बोस नाहीत.’ आपण त्यांना पत्रं पाठविल्याचे त्यांनी कबूल केले. पण त्या एकाही पत्रात आपण त्यांना नेताजी म्हणालेलो नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले. मग प्रश्न असा येतो, की बाबांकडे नेताजींसंबंधीची कागदपत्रे, छायाचित्रे, विविध पुस्तके सापडली, त्याचे काय? रॉय यांच्या म्हणण्यानुसार, ‘त्यात त्यांना रस असेल म्हणून त्यांनी ती जमवली असतील. इतरही अनेकांनी तसे साहित्य जमवलेले असू शकते.’

थोडक्यात, हे बाबा नेताजी नव्हेत. नेताजींचे पुतणे शिशिर बोस यांचेही हेच मत होते. डॉ. पुरबी रॉय याही तेच सुचवतात. त्यांच्या संशोधनाचा एकच निष्कर्ष आहे, तो म्हणजे नेताजींच्या ‘गायब’ होण्याचे रहस्य रशियात दडले आहे.

मुखर्जी आयोगही गुमनामीबाबांना नेताजी मानण्यास तयार नाही. आयोगाने याबाबत अनेक साक्षीदारांची उलटतपासणी घेतली. अनेक कागदपत्रे तपासली. गुमनामीबाबांकडचे साहित्य पाहिले. त्यांचे आणि नेताजींचे हस्ताक्षर जुळवून पाहण्याचा प्रयत्न केला. बाबांच्या सामानात काही दात सापडले होते. त्यातील पाच दात डीएनए चाचणीसाठी पाठवले. आणि या सगळ्या चौकशीतून एकच निष्कर्ष काढला-  ‘भगवानजी किंवा गुमनामीबाबा हे नेताजी होते हे सिद्ध करण्यास एकही योग्य पुरावा नसल्यामुळे ते फैजाबाद येथे १६ सप्टेंबर १९८५ रोजी मरण पावले काय, याचे उत्तर देण्याची आवश्यकता नाही.’

मग आता प्रश्न उरतो की, हे नेताजींना पाहिलेले, त्यांच्या जवळचे लोक बाबांनाच नेताजी मानत होते, त्याचे काय? याचे उत्तर दुसऱ्या एका प्रश्नात दडलेले आहे. तो म्हणजे- शौलमारीबाबा हे नेताजी असल्याचे माजी क्रांतिकारी सत्य गुप्ता यांनी तर पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते, त्याचे काय?

यानंतर सवाल येतो, की मग गुमनामीबाबा नक्की होते तरी कोण? याचे उत्तर अद्याप अंधारातच आहे. पण ‘स्क्रोल.इन’ या वृत्तसंकेतस्थळानुसार, त्यांचे खरे नाव कृष्णदत्त उपाध्याय तथा कप्तानबाबा असावे. तसा संशय व्यक्त करणारे एक पत्र ‘जनमोर्चा’च्या २ नोव्हेंबर १९८५ च्या अंकातही प्रसिद्ध झाले होते. अयोध्येतील गायत्री ब्रह्मचर्याश्रम संस्कृत विद्यालयाचा उपाध्याय हा एक विश्वस्त होता. १९५८ मध्ये विश्वस्त मंडळातील वादातून त्याने पं. ब्रह्मदेव शास्त्री या दुसऱ्या एका विश्वस्ताचा गोळी घालून खून केला व तेव्हापासून तो पसार झाला. त्या वाचकपत्रानुसार, तो नेपाळमध्ये पळाला आणि नंतर काही काळाने बस्ती येथे येऊन राहू लागला. शेठ ईश्वरदास बेनीप्रसाद हे कोलकात्यातील बडे व्यापारी उपाध्यायचे निकटवर्ती. त्यांचा गुमनामीबाबांशीही संबंध होता. परंतु गुमनामीबाबा म्हणजे कप्तानबाबा याचे ठोस पुरावे नाहीत. तसे ते नेताजी असल्याचेही ठोस पुरावे नाहीत. मुखर्जी आयोगानेच तसे म्हटले आहे.

या आयोगाने ७ नोव्हेंबर २००५ रोजी सादर केलेल्या अहवालाचे निष्कर्ष होते-

१. नेताजी आता हयात नाहीत.

२. त्यांचा विमान अपघातात मृत्यू झालेला नाही.

३. जपानमधील मंदिरातील रक्षा त्यांच्या नाहीत.

४. त्यांचा अन्य कोणत्या प्रकारे वा कुठे मृत्यू झाला याचे ठोस पुराव्याअभावी उत्तर देता येत नाही.

हा अहवाल केंद्र सरकारने फेटाळला. परंतु त्याने नेताजींचे रहस्य अधिकच गडद झाले. नेताजींचे अपघाती निधन झाले नसेल, तर कसे झाले, असा गूढ प्रश्न त्यातून पुढे आला. त्याच्या उत्तराचा शोध गुमनामीबाबांच्या दिशेने घेऊन जात होता. त्यालाही कारणीभूत न्या. मुखर्जीच ठरले होते. कारण गुमनामीबाबा हेच नेताजी असल्याचे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगून टाकले होते. त्या मतामुळे रशिया पक्षापेक्षा गुमनामी पक्षाचे पारडे जड झाले होते.

पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्रालय आदींकडे असलेल्या गोपनीय फायलींमध्येच या रहस्याचे उत्तर असल्याची अनेकांची खात्री होती. या फायली खुल्या कराव्यात अशी संशोधक आणि रहस्यशोधकांची मागणी होतीच. ती आता नव्याने जोर धरू लागली होती. यावेळी तिच्यामागील राजकीय शक्ती अधिक प्रबळ होत्या.

॥ रहस्यभेद ॥

२०१४ साल उजाडले ते नरेंद्र मोदी नावाचे वादळ घेऊनच. देशात निवडणुकांचा माहोल होता. मोदींची लाट होती. काँग्रेस आखाडय़ात येण्याआधीच चीतपट झालेली होती. पण कोठेही हयगय करून चालणार नव्हते. कारण देशातील प्रत्येक मतदारसंघात कमळ फुललेच पाहिजे अशी मोदींची मनीषा होती. तेव्हा मिळेल त्या मार्गाने नेहरू-गांधी घराण्याच्या जिव्हारी घाव घालण्यात येत होते. त्याची एक संधी दिली २३ जानेवारीने. हा नेताजींचा ११७ वा जयंतीदिन. त्याच्या आदल्या दिवशी रात्री ८.३३ वाजता भाजपचे तत्कालीन अध्यक्ष राजनाथसिंह यांनी एक ट्विपण्णी केली.. ‘नेताजींचा मृत्यू कसा आणि कोणत्या परिस्थितीत झाला, हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. केंद्र सरकारने त्यांच्या मृत्यूच्या रहस्याचा पर्दाफाश केला पाहिजे.’ २३ जानेवारीला कटक येथे जाहीर सभेतही त्यांनी याचा पुनरुच्चार केला. त्या एका भाषणाने गांधी-नेहरू घराण्याचा नेताजींना कसा विरोध होता, याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली.

तशी ही चर्चा जुनीच. वस्तुत: ती चर्चा कमी आणि चिखलफेकच जास्त. हे तसे राजकारणातील मोठेच अस्त्र. राजकीय विरोधकांवर चिखलफेक करायची. वाट्टेल तशी. नि सातत्याने करायची. सतत तेच ते आरोप केले की लोकांनाही ते खरे वाटू लागतात. माणूस बदनाम होतो. पं. जवाहरलाल नेहरूंबाबत गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे. नेहरूंच्या आíथक-सामाजिक-राजकीय विचारांना विरोध असणे वेगळे. त्यावर विवेकनिष्ठ टीका होऊ शकते. परंतु या विरोधकांना नेहरूंचे चारित्र्यहनन करून फिदीफिदी हसण्यात अधिक रस. त्यातून मग नेहरू हे एका मुस्लीम वेश्येचे पुत्र, बाईलवेडे, मेले ते लंगिक आजाराने- येथपासून एडविनाशी त्यांचे लगिक संबंध होते आणि त्यामुळेच त्यांनी देशाची फाळणी स्वीकारली.. येथपर्यंतचे आरोप करण्यात आले. या आरोपांनी इंटरनेटवरील पानेच्या पाने भरली आहेत. त्यातून नेहरूंचे एक खलनायकी चित्र तयार केले जात आहे. याचाच एक भाग म्हणजे नेहरूंविरोधात स्वातंत्र्य चळवळीतील अन्य नेत्यांना उभे करणे असा आहे. नेहरूंनी नेताजींचा खून केला, हा आरोपही या मिथकनिर्मितीचीच पदास.

वस्तुत: नेताजी आणि नेहरूंमध्ये जो वाद होता तो खुर्चीसाठी नव्हता. १९२९, १९३६ आणि १९३७ साली नेहरूंना काँग्रेस अध्यक्ष करण्यात सुभाषबाबूंचा हात होता आणि १९३८ साली सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष झाले ते नेहरूंच्याच पािठब्यामुळे. पुढे १९३९ साली ते काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आले. तेव्हा मात्र नेहरू त्यांच्या बाजूने नव्हते. गांधीही नव्हते आणि सरदार वल्लभभाई पटेलही नव्हते. गांधींनी नेहरूंना प्रतिस्पर्धी नको म्हणून सुभाषबाबूंना बरोबर अध्यक्षपदावरून उडवले, असे मिथक या ठिकाणी निर्माण करण्यात आले आहे. त्यात त्या निर्मात्यांची चूक नाही. आजच्या राजकारणाच्या क्षुद्र चष्म्यातून पाहिले की असेच दिसणार. उद्या हाच चष्मा अडवाणी आणि मोदी यांच्यातील सत्तास्पध्रेला लावला तर कसे चित्र दिसेल? मुळात तो संघर्ष सत्तेचा नव्हता, तर काँग्रेसने पुढचा प्रवास कोणत्या मार्गावरून करायचा, याचा होता. वाद लढय़ाच्या डावपेचांबद्दलचा होता. त्यातून दोघांत नक्कीच कटुता निर्माण झाली होती. पण तिचे स्वरूप आज आपण समजतो तसे नव्हते. आझाद िहद सेनेतील ले. कर्नल गुरुबक्षसिंग धिल्लाँ यांच्या नेतृत्वाखालील चौथ्या गुरिला रेजिमेन्टचे नाव ‘नेहरू ब्रिगेड’ होते. गांधीजी, मौलाना आझाद यांच्या नावाच्याही रेजिमेन्ट होत्या. या प्रतिसरकारने गांधी जयंतीची सुटी जाहीर केली होती. हे सगळे नेहरू व सुभाषबाबू हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते, या थापांच्या विरोधात जाणारे आहे.

आणि तरीही नेहरूंना नेताजींचे भय वाटत होते. ते भारतात आले तर आपली पंतप्रधानकी जाईल असे वाटत होते. म्हणून त्यांनी नेताजींबाबतची सगळी माहिती दडवून ठेवली. अनेक फायली नष्ट केल्या. त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यास नकार दिला. नंतर आयोग नेमून रंगसफेदी करण्याचा प्रयत्न केला, असे आरोप केले जात होते. गोपनीय फायली खुल्या केल्या जात नाहीत, याचा अर्थ ते आरोप खरे आहेत असे मानले जात होते.

नेताजी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या तिन्ही आयोगांची एकच ओरड होती. गोपनीय फायलींची अनुपलब्धता. मुखर्जी आयोगाच्या अहवालात ‘मर्यादा आणि बंधने’ या मथळ्याखाली मुखर्जी यांनी स्पष्टपणे ही तक्रार नोंदविली आहे. त्यांनी ‘१२(२२६)/५६-पीएम’ या क्रमांकाच्या फाइलचे उदाहरण दिले आहे. ही फाइल त्यांनी मागितली. त्यावर ती नष्ट करण्यात आली आहे, असे उत्तर पंतप्रधानांच्या कार्यालयाने दिले. खोसला समितीनेही ही फाइल मागितली होती. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याबाबत कळविले होते की, या फाइलमध्ये केवळ अन्य फायलींमधील कागदपत्रांच्या प्रती होत्या. तेव्हा ती नष्ट करण्यात आली. या फाइलमध्ये नेताजी प्रकरणाच्या चौकशीसंबंधी कॅबिनेटच्या बठकीतील चच्रेचे वृत्तान्त होते. ते कॅबिनेट सचिवालयाकडे असल्याचे पंतप्रधानांच्या कार्यालयाने मुखर्जी आयोगाला कळविले. पण ती कागदपत्रे काही त्यांना अखेपर्यंत मिळू शकली नाहीत. या काळात पंतप्रधानपदी होते अटलबिहारी वाजपेयी.

असेच दुसरे उदाहरण ‘२/६४/७८-पीएम (पॉल. सेक्शन)’ या पंतप्रधान कार्यालयातील फाइलचे. नेताजींबाबत काही नवीन अधिकृत कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत, असा उल्लेख पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी संसदेत केला होता. आधी तशी कोणतीही कागदपत्रे नाहीत, असे आयोगाला सांगण्यात आले. नंतर उपरोक्त गोपनीय फाइल पाठविण्यात आली. पण त्यात काही तशी कागदपत्रे नव्हती. हा किस्सा वाजपेयींच्या काळातलाच.

याचे दोन अर्थ होतात. आधीच्या सरकारांनी नेताजींबाबतची काही महत्त्वाची कागदपत्रे नष्ट केली आणि केंद्रात कोणाचेही सरकार असो; त्यांचा गोपनीय फायली जाहीर करण्यास विरोध होता. हे पुढे मोदी सरकारच्या काळातही दिसून आले.

मनमोहन सिंग सरकारने नेताजींच्या फायली खुल्या कराव्यात, अशी जोरदार मागणी करीत आधीच्या सर्व काँग्रेस सरकारांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण करणारे राजनाथसिंह त्यानंतर चारच महिन्यांनी केंद्रात गृहमंत्री झाले. त्यामुळे आता सर्व फायली खुल्या होणार आणि गांधी-नेहरू घराण्याची कृष्णकृत्ये जगजाहीर होणार, असे वातावरण निर्माण झाले होते. राज्यसभेत तृणमूल काँग्रेसचे खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी या फायलींबाबत प्रश्न सादर केला होता. त्याला १७ डिसेंबर २०१४ रोजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी लेखी उत्तर दिले- ‘नेताजींबाबतच्या गोपनीय फायली खुल्या करणे भारताच्या परराष्ट्रांबरोबरच्या संबंधांस हितकारक नाही!’

यावरून मोदी सरकारवर टीका होऊ लागली होती. लोकांचा दबाव वाढत चालला होता. अशात अचानक २०१५ च्या एप्रिलमध्ये ‘इंटेलिजन्स ब्युरो’कडील दोन गोपनीय फायली खुल्या करून नॅशनल अर्काइव्हज्मध्ये ठेवण्यात आल्या. त्यातील कागदपत्रांवरून एक मोठा गौप्यस्फोट झाला. १९४८ ते १९६८ अशा नेहरू, शास्त्री आणि इंदिरा अशा तीन पंतप्रधानांच्या काळात आयबीचे गुप्तचर नेताजींच्या कुटुंबीयांवर पाळत ठेवून होते.

ते कशासाठी? चर्चा दोन कारणांची होती. एक म्हणजे नेताजी जिवंत असल्याचे सरकारला माहीत होते; आणि दोन- ते परत आले तर नेहरूंचे काही खरे नव्हते. १९५७ ची निवडणूक तर ते हरलेच असते, म्हणून.

वस्तुत: नेताजींच्या काही कुटुंबीयांवर ब्रिटिश काळापासूनच पाळत ठेवण्यात येत होती. ती पुढेही चालू राहिली. त्याची ताíकक कारणे बरीच होती. ती म्हणजे- नेताजी ठिकठिकाणी दिसत असल्याच्या खबरी येत होत्या. नेताजींचे काही नातेवाईक त्या तोतयांच्या संपर्कात होते. काहीजणांची कम्युनिस्टांशी संगत होती. पण यावरून नेहरूंना बदनाम करण्याची आयतीच संधी विरोधकांना सापडली.

हा गदारोळ सुरू असतानाच प. बंगालमधील निवडणुकांचे वारे वाहू लागले. ‘नेताजी’ हा त्या निवडणुकीतील हुकमाचा पत्ता होता. नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या डावात पहिल्यांदा तो उतरवला. पंतप्रधान कार्यालयाने या फायली खुल्या करण्यास नकार दिला असला तरी आता नेताजींच्या नातेवाईकांच्या भेटी घेऊन मोदी त्यांना आश्वासित करू लागले होते. एप्रिल २०१५ मध्ये जर्मनीत त्यांनी सूर्यकुमार बोस यांची भेट घेतली. ऑक्टोबर २०१५ मध्ये तर मोदींच्या निवासस्थानी बोस कुटुंबीयांचा मेळाच भरवण्यात आला होता. त्यावेळीही मोदी यांनी पुन्हा फायली खुल्या करण्याचे आश्वासन दिले. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या ध्यानी यामागील राजकारण आले नसते तरच नवल. त्यांनी चलाखीने मोदींचा डाव उलटवला. १८ सप्टेंबर रोजी त्यांनी प. बंगाल सरकारच्या ताब्यात असलेल्या ६४ गोपनीय फायली खुल्या केल्या.

आता मोदींना थांबणे शक्य नव्हते. त्यांनी नेताजींच्या ११९ व्या जयंतीदिनाचा मुहूर्त साधून १०० गोपनीय फायलींचा पहिला गठ्ठा खुला केला. अवघा देश त्या फायलींतून होणाऱ्या रहस्यभेदाकडे डोळे लावून बसला होता.

पण एक अपवाद वगळता त्यात धक्कादायक असे काहीच नव्हते. हा अपवाद होता- नेताजी युद्धगुन्हेगार असल्याबद्दलचा. नेहरू हे नेताजींना युद्धगुन्हेगार मानत होते आणि त्यासाठी त्यांना शिक्षा व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. याचा पुरावा निवडणूक काळात समाजमाध्यमांतून फिरवला जात होता. ते होते एक पत्र. नेहरूंनी १९४५ मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट अ‍ॅटली यांना लिहिलेले. ‘प्रिय मि. अ‍ॅटली, तुमचे युद्धगुन्हेगार सुभाषचंद्र बोस यांना स्टॅलिनने रशियात प्रवेश करण्यास परवानगी दिल्याचे मला विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे. रशिया हे ब्रिटन-अमेरिकेचे मित्रराष्ट्र आहे. तेव्हा रशियाने केलेली ही स्पष्ट दगलबाजी आहे. रशियाने असे करायला नको होते. कृपया याची दखल घ्यावी आणि आपणास योग्य वाटेल ते करावे,’ असे त्यात म्हटले होते. यावरून नेहरू हे कसे खुनशी होते, असे सांगितले जात होते. मुळात नेहरूंनी असे कोणतेही पत्र लिहिले नव्हते. त्यांनी ते लिहिण्यास आपणास सांगितले, असा दावा श्यामलाल जैन या स्टेनोग्राफरने खोसला आयोगासमोर केला होता.

हा दावा, ते पत्र हे सगळेच कसे खोटे होते ते त्या गोपनीय फायलींनी उघड केले. त्यातील कागदपत्रांनुसार नेताजी हे कधीही ब्रिटनचे युद्धगुन्हेगार नव्हते. तशी कोणतीही यादी ब्रिटिशांनी तयार केली नव्हती.

‘नेताजींच्या अस्थी मातृभूमीत परत आणा’; सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची भारत सरकारला विनंती

॥ गूढ उलगडले?॥

२३ एप्रिल २०१६ पासून दर महिन्याला नेताजींबाबतच्या गोपनीय फायली खुल्या केल्या जात आहेत. हेही पहिल्यांदाच घडतेय असे नाही. १९९७ मध्ये संरक्षण मंत्रालयाने आझाद िहद सेनेबाबतच्या ९९० फायली खुल्या केल्या होत्या. २०१२ मध्ये मनमोहन सरकारने खोसला आयोगाशी संबंधित २७१, तर मुखर्जी आयोगाशी संबंधित ७५९ फायली खुल्या केल्या होत्या.

त्यातून नेताजींचे गूढ उलगडले का? ते हरवलेल्या वा नष्ट केलेल्या फायलींमध्ये तर नव्हते?

२६ एप्रिल २०१६ रोजी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, अशा दोन फायली गहाळ आहेत. त्यातील एक पंतप्रधानांच्या कार्यालयातील आहे, दुसरी गृहमंत्रालयातील. या दोन्ही फायली कशाबद्दलच्या आहेत? तर- नेताजींचा अस्थिकलश भारतात आणण्यासंबंधीच्या! पण त्याच उत्तरात रिजीजू यांनी जपान आपल्याकडील दोन फायली खुल्या करण्याची शक्यता वर्तविली होती. त्यातून काय बाहेर येते याकडे सगळ्यांचेच लक्ष होते.

मधल्या काळात ज्येष्ठ संपादक, राजकीय इतिहासकार गोिवदराव तळवलकर यांनी नेताजींच्या गूढाचा पाठपुरावा चालवला होता. फेडरल स्टेट इन्स्टिटय़ूशन, रशियन स्टेट मिलिटरी अर्काइव्ह, रशियाचे एमव्हीडी (अंतर्गत व्यवहार मंत्रालय) यांच्या ते संपर्कात होते. त्यातून एक गोष्ट उघड झाली. ती म्हणजे रशियाच्या स्टेट अर्काइव्हमध्ये नेताजींबाबतची कागदपत्रे आहेत, हा प्रचार खोटा आहे. त्यांच्याकडे तसे काहीही नाही. नेताजी हे याकुत्स्क तुरुंगात होते असे म्हटले जाते. पण तीही अफवा आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नेताजींचा विमान अपघातात मृत्यू झाला ही बातमी खरी की खोटी याची चौकशी ब्रिटिश सरकारने १९४५ मध्ये केली होती. आणि तेव्हा जपानने पाठवलेल्या अंतरिम अहवालात नेताजींचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. तळवलकर यांनी प्रयत्नपूर्वक ती सर्व अधिकृत कागदपत्रे मिळविली आहेत.

पण म्हणून नेताजींच्या मृत्यूचे गूढ उलगडले असे म्हणता येईल का?

नेताजींचा मृत्यू झाला, तो विमान अपघातात झाला, हे खरे. पण षड्यंत्र सिद्धान्त कधीही सत्य आणि तथ्यांवर अवलंबून नसतो. तो एकदा तयार झाला की अमर असतो. आता त्याला जीवदान देण्यासाठी एक नवी चौकशी सुरू आहे. ती म्हणजे गुमनामीबाबांबद्दलची. उत्तर प्रदेश सरकारने त्यासाठी निवृत्त न्या. विष्णू सहाय यांची एक-सदस्यीय समिती नेमली आहे. प्रतीक्षा आहे ती तिच्या निष्कर्षांची..

त्यातून नवी कोणती रहस्ये निर्माण होतात, त्याची.

संदर्भ-

  • Report of The Justice Mukherjee Commission Of Inquiry
  • India’s Biggest Cover-up : Anuj Dhar, Vitsata, 2012
  • Netaji – Dead or Alive? : Samar Guha, S. Chand and Company, 1978
  • His Majesty’s Opponent : Sugata Bose, The Belknap Press of Harvard University Press, 2011
  • Mahatma – Vol 6 (1940-1945) : D. G. Tendulkar, Ministry of I&B, 1953
  • Mahatma Gandhi – Vol 9 – The Last Phase part 1 – Pyarelal : Navjivan Publishing House, 1956
  • http://www.bosefiles.info
    रवि आमले