कोणत्याही उमेदवाराचे नाव न घेता जय बाबाजी परिवारातील भक्तांनी गोहत्या थांबविणाऱ्या, मांसाहार न करणाऱ्या उमेदवारास पसंती द्यावी, असे आवाहन वेरूळच्या शांतिगिरी महाराजांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत केले. या वेळी सुदर्शन वाहिनीचे प्रमुख सुरेश चव्हाणके यांच्या उपस्थितीमुळे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या बाजूने शांतिगिरी झुकल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी कोणत्याही उमेदवाराचे नाव घेण्याचे टाळले. मात्र, त्यासाठी त्यांना बरीच शाब्दिक कसरत करावी लागली. या भूमिकेमुळे लोकसभा निवडणुकीतील गणिते पुन्हा बदलली जाण्याची चिन्हे आहेत.
सुदर्शन वाहिनीच्या उद्घाटनाच्या वेळी बोलणी झाली असून शांतिगिरी महाराज शिवसेनेच्या बाजूने असतील, असा दावा खैरे गेल्या महिनाभरापासून करीत आहेत. शुक्रवारी चव्हाणके यांच्याबरोबर बठक झाल्यावर शांतिगिरी यांनी भूमिका मांडली. मात्र, स्पष्टपणे त्यांनी कोणत्या उमेदवारास पाठिंबा हे न सांगता काही निकष सांगितले. गेल्या निवडणुकीत स्वत उमेदवार असताना १ लाख ४९ हजार मते मिळविणाऱ्या शांतिगिरी महाराजांनी काँग्रेसला पािठबा द्यावा, या साठी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केला होता. या भेटीबाबत कमालीची गोपनियता पाळण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर गेल्या महिन्यापर्यंत शांतिगिरी महाराज काँग्रेसला पािठबा देतील, असा दावा केला जात होता. मात्र, शांतिगिरी यांनी उमेदवार कसा असावा, याचे निकष या वेळी जाहीर केले. उमेदवार मांसाहारी नसावा, देव-देश व धर्मासाठी काम करणारा असावा, त्याने संतांचे ऐकावे, असे ते म्हणाले. हे निकष खैरे यांना लागू पडतात का, असे विचारले असता त्यांनी नाव घेण्यास नकार दिला.
राजकीय उमेदवारीसाठी शांतिगिरींनी मनसेचे उंबरठेही झिजवले होते. मुंबईत राज ठाकरे यांनी भेट का घेतली असे विचारले असता, विचारांच्या प्रसारासाठी गेल्याचेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगत उमेदवारांचे निकष भक्तांना कळविले आहेत. त्यांनी मत वाया जाऊ न देता मतदान करावे, असेही जाहीर केले. खैंरेच्या बाजूने महाराजांना वळविण्यासाठी चव्हाणके यांनी प्रयत्न केले का, असे विचारले असता ‘जय बाबाजी परिवाराचा सदस्य आहे. भक्त असल्याने येथे आलो’ असे सांगत मध्यस्थीचे आरोप चव्हाणके यांनी फेटाळले.
काँग्रेसची सारवासारव
दरम्यान, नितीन पाटील यांना महिनाभरापूर्वी ‘चांगला मुलगा’ म्हणणाऱ्या शांतिगिरी यांनी मांसाहार न करण्याचा निकष लावण्यापर्यंत रेटून नेल्याने काँग्रेसच्या गोटात चिंता आहे. या अनुषंगाने काँग्रेसचे डॉ. पवन डोंगरे यांनी ‘नितीन पाटील यांनाही महाराजांनी आशीर्वाद दिले होते. तेही संतांचे वचन ऐकतात. दररोज मांसाहार करीत नाहीत,’ अशी सारवासारव केली.

Story img Loader