बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी समाजमाध्यमावर त्यांच्या कथित जातीचा दाखला प्रसारित करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्नांना प्रतिउत्तर दिल आहे. कोणाचीही जात लपून राहू शकत नाही. आतापर्यंत कधीही मी जातीचे राजकारण केले नाही आणि करणारही नाही, अशा स्पष्ट शब्दात पवारांनी विरोधकांना खडसावले. ते गोंविदबाग येथे पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांचा कथित जातीचा दाखला समाज माध्यमावर प्रसारित होत आहे. त्यानंतर शरद पवारांनी ओबीसी जातीचा दाखल घेतल्याचा दावा करण्यात आला. याप्रकरणी मोठे वादंग झाल्यानंतर पवारांनी मंगळवारी स्वत: त्यावर भाष्य केले. ते म्हणाले, काही गोष्टी खऱ्या आहेत, पण काही लोकांनी इंग्रजीचा दाखला फिरवला.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर कीर्तीकर, कदम वादावर अखेर पडदा; माध्यमांशी बोलताना कदम यांनी व्यक्त केली खदखद

त्यात माझ्या जातीच्या रकान्यात ओबीसी लिहिलेले आहे. ओबीसी वर्गाबद्दल मला प्रचंड आदर व आस्था आहे. पण, जन्माने प्रत्येकाची जी जात असते तीच माझी आहे. कुणीही ती लपवू शकत नाही. साऱ्या जगाला माझी जात कोणती ते माहिती आहे. मी जातीचे राजकारण कधीही केले नाही आणि करणार नाही, पण त्या वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी जो हातभार लावणे गरजेचे आहे तो माझ्याकडून लावला जाईल, असेही ते म्हणाले.

वास्तवात जगले पाहिजे

अजित पवारांना डेंग्यू झाला आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे. मागचे २० ते २५ दिवस ते कुठल्याच कार्यक्रमांना गेलेले नाहीत. रणजीत पवार आहेत आणि इतरही भाऊ आहेत. मला असे वाटते की जी गोष्ट आहे ती मोठय़ा मनाने स्वीकारली पाहिजे. आहे त्या वास्तवात जगले पाहिजे. अर्धा ग्लास कधीही रिकामा नसतो हे लक्षात ठेवले पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. माझ्यासाठी माझ्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे. प्रत्येक जण आपली तब्येत, जबाबदाऱ्या सांभाळतो आहे. आज रोहितही इथे आलेला नाही. तो संघर्ष यात्रेसाठी बीडला आहे. रोहितचा आम्हा सगळ्यांनाच सार्थ अभिमान आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

अजित पवार  गोविंदबागेत आधी गैरहजर, नंतर हजर

पाडव्याच्या निमित्ताने आणि दिवाळीच्या निमित्ताने बारामतीतल्या गोविंदबाग या ठिकाणी पवार कुटुंब दरवर्षी एकत्र येत असते. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यापासूनच शरद पवार आणि अजित पवार हे दिवाळीसाठी एकत्र येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अशात शरद पवारांच्या बारामतीतल्या गोविंदबाग या निवासस्थानी सकाळी अजित पवार गैरहजर होते. त्यांच्या गैरहजेरीची दिवसभर चर्चा होती. मात्र, सायंकाळी ते गोविंदबागेत दाखल झाले. त्यांच्यासमवेत पत्नी सुनेत्रा व मुलेही होती. संपूर्ण पवार कुटुंबीयांनी एकत्रित भोजन केल्याची माहिती आहे.

Story img Loader