Amravati airport Infrastructure: गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेलं अमरावती विमानतळ आता जवळपास तयार झालं असून लवकरच, म्हणजे अगदी महिन्याभरातही या विमानतळावरून पहिलं विमान उड्डाण घेण्याची शक्यता आहे. नुकतीच या विमानतळावर एअर कॅलिबरेशन ऑफ प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर अर्थात पीएपीआय चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यामुळे अमरावतीकरांना मुंबईपर्यंत विमानाने ये-जा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमरावती विमानतळावरून विमान उड्डाण करण्यासाठी DGCA कडून परवानगी मागण्यात आली आहे. ही परवानगी आल्यानंतर इथून नियमित विमान उड्डाण सुरू होईल.

कसं आहे अमरावती विमानतळ?

अमरावती विमानतळ हे ‘बेलोरा विमानतळ’ म्हणूनही ओळखले जाते. अमरावती शहराच्या दक्षिणेकडे साधारण १५ किलोमीटर अंतरावरील बेलोरा या ठिकाणी हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अर्थात MADC च्या माध्यमातून हे विमानतळ विकसित करण्यात आलं आहे. हे विमानतळ पूर्ण क्षमतेनं कार्यरत झाल्यानंतर विदर्भात नागपूर आणि गोंदियापाठोपाठ हे तिसरं व्यावसायिक वापरासाठीचं विमानतळ ठरेल.

अमरावती विमानतळ हे ३८९ हेक्टर क्षेत्रफळावर बांधण्यात आलं आहे. या विमानतळावरची धावपट्टी १८५० मीटर लांबीची असून तिची रुंदी ४५ मीटर आहे. या विमानतळावर टर्मिनसची इमारत ही २६०० चौरस मीटर जमिनीवर बांधण्यात आली आहे. विमानतळासाठी टॅक्सीवे हा १६३ बाय १८ मीटर आकाराचा असून एप्रन १०० बाय ११० मीटर असेल.

विमानतळाची आत्ता काय स्थिती?

MADC नं नुकतीच कॅलिबरेशन प्रिसिजन चाचणी यशस्वी झाल्याची माहिती दिली आहे. ही यंत्रणा प्रामुख्याने विमानाच्या लँडिंगवेळी पायलटला मार्गदर्शन करण्यासाठी वापरली जाते. विमानतळावर सध्या वापरण्यात आलेल्या प्रणालीमुळे या विमानतळावरून ७२ आसनी विमानाचं उड्डाण शक्य होऊ शकेल. शिवाय विमानतळावर एअर ट्रॅफिक कंट्रोल अर्थात एटीसी, टर्मिनल इमारत आणि धावपट्टीचं कामही पूर्ण झालं आहे.

नेमकं कधी सुरू होऊ शकेल हे विमानतळ?

दरम्यान, विमानतळावरील चाचण्या जवळपास पूर्ण झाल्या असून उड्डाणासाठी डीजीसीएकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे. यावर डीजीसीएकडून परवानगी आल्यानंतर पुढील काही दिवसांत संबंधित विमान कंपन्यांकडून या विमानतळावरून सुविधा सुरू केली जाण्याची शक्यता आहे. येत्या महिन्याभरात हे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विमानतळामुळे अमरावतीच्या आसपासच्या भागात आर्थिक विकास साध्य करणं शक्य होणार आहे.

Story img Loader