लोकसत्ता प्रतिनिधी
अहिल्यानगर : पक्षांतर्गत निवडीच्या कार्यक्रमानुसार भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष बदलाचे वारे सध्या वाहत आहेत. शहर जिल्हा, दक्षिण जिल्हा व उत्तर जिल्हा असे तिन्ही जिल्हाध्यक्षपदांवर नव्या नियुक्त्या होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रदेश महामंत्री विजय चौधरी व उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवि अनासपुरे हे उद्या, गुरुवारपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
जिल्हा भाजपमध्ये सध्या बुथ कमिटी, मंडलाध्यक्ष निवडीची धामधूम सुरू आहे. या निवडी आटोपताच जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी सुरू केल्या जातील, असे सांगितले जाते. पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक बूथ कमिट्यांच्या निवडी झाल्या असल्यास जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली जाणार असल्याचे समजले. याचाच आढावा प्रदेश महामंत्री विजय चौधरी घेणार आहेत. विजय चौधरी व रवि अनासपुरे हे उद्या सकाळी शहर जिल्हा पदाधिकाऱ्यांची व दुपारी शिर्डी लोकसभा पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते नाशिकला रवाना होतील.
या बैठकांना जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा निवडणूक प्रभारी, प्रवासी कार्यकर्ते, मंडल निवडणूक अधिकारी, मंडळ अध्यक्ष, मोर्चा अध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले आहे. जिल्हा भाजपमध्ये सध्या तीन जिल्हाध्यक्ष आहेत. अभय आगरकर यांच्याकडे शहर जिल्हाध्यक्षपदाची, दिलीप भालसिंग यांच्याकडे दक्षिण जिल्हाध्यक्षपदाची तर नितीन दिनकर यांच्याकडे उत्तर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे.
नितीन दिनकर यांची नियुक्ती अलीकडेच, विधानसभा निवडणुकीपूर्वी झाली आहे. त्यांच्याकडील पद प्रभारी आहे. उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे हे शिवसेनेच्या शिंदे सेनेत प्रवेश करून आमदार म्हणून निवडून गेले. त्यापूर्वी नितीन दिनकर यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी आपली नियुक्ती कायम राहावी यासाठी अभय आगरकर, दिलीप भालसिंग व नितीन दिनकर आग्रही असले तरी पक्षातील काही जणांच्या मतानुसार वयाचे बंधन त्यांना लागू होते.
पक्षामध्ये सदस्य नोंदणीचा कार्यक्रम सुरू होता, त्यावेळी जास्तीत जास्त सक्रिय सभासदांची नोंदणी करणाऱ्यास हे पद दिले जाईल, असेही सांगितले गेले होते. शहर जिल्हाध्यक्षपदासाठी सचिन पारखी, बाबासाहेब वाकळे, बाबासाहेब सानप, धनंजय जाधव आदींची मोर्चेबांधणी सुरू आहे. जिल्हाध्यक्ष निवडीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दक्षिण जिल्हाध्यक्षपदासाठी अक्षय कर्डिले यांच्याही नावाची चर्चा होत आहे.
मुख्यमंत्री ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार
भाजपचे सध्या संघटन पर्व असल्याचे जाहीर केले आहे. सध्या राज्यात पक्षाची १ कोटी ४६ लाख सदस्य नोंदणी झाल्याचे व १ कोटी ५१ लाख सदस्य नोंदणीचे ५ एप्रिलपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. स्थापनादिनी, दि. ६ एप्रिलला राज्यातील ११४९ मंडलात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाइन पद्धतीने संवाद साधणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी दिली.