सोलापूर : रविवारी सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयांसह परिसराची पाहणी केली आणि परिसर स्वच्छतेपासून सेवेचा श्रीगणेशा केला.
काल शनिवारी सुट्टीच्या दिवशी आव्हाळे यांनी मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून फदभार स्वीकारला. त्यानंतर रविवारीही सुट्टी असताना त्यांनी जिल्हा परिषदेत येऊन कार्यालयांसह वरिष्ठ अधिका-यांची दालनांची पाहणी केली. परिसर न्याहाळत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कच-याचे ढिग आढळून आले. वाहनतळाच्या परिसरात साचलेला कचरा वेळेत उचलण्यासह कचरा व्यवस्थापन करण्याच्या सूचना आव्हाळे यांनी कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांना दिल्या.
हेही वाचा >>> किनारपट्टी, घाटमाथा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज
परिसरातील कचरा आगाराची पाहणी केल्यानंतर ओला व सुका कचरा वेगळा करावा तसेच प्रत्येक कार्यालयात होणा-या कच-याचे वर्गीकरण करावे, झाडांपासून पडणा-या पाला-पाचोळ्यापासून सेंद्रीय खत तयार करून आवारातील झाडे व कुड्यांतील रोपांना घालावे, अशा सूचनाही आव्हाळे यांनी दिल्या. सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयामध्ये उपस्थित रहावे, आपले दफ्तर कपाटामध्ये सहा संच पद्धतीने ठेवण्यात यावे, कार्यविवरण नोंदवही अद्ययावत करावी, दफ्तर वर्गीकरण करुन अभिलेख कक्षाकडे पाठवावे, आपापल्या विभागाच्या अभिलेख कक्षाची स्वच्छता करुन घ्यावी. अशाही सूचना आव्हाळे यांनी दिल्यामुळे प्रशासन लगेचच स्वच्छता आणि साफसफाईच्या कामाला लागले.