Ladki Bahin Yojana December installment : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल १४ दिवसांनी राज्यात महायुती सरकारचा शपथविधी पार पडला आहे. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. काल मुंबईतील आझाद मैदानावर पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यानंतर नवे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी काही महिलांनी संवाद साधला. यावेळी या महिलांनी एकनाथ शिंदे यांना लाडकी बहिण योजनेचा पुढचा हप्ता कधी देणार आणि त्याची रक्कम किती असणार हे सुद्धा विचारले.
शिंदे दादा या महिन्याचा हप्ता कधी?
रविवारी, ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यातील लाखो नागरिकांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या महिलांशी शिंदेंनी संवाद साधला. यावेळी नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या एका महिलेने एकनाथ शिंदे यांना विचारले की, “शिंदे दादा आमचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे. १५०० रुपये येणार की २१०० रुपये?” यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले सर्व ठरल्याप्रमाणे मिळणार आहे.
अखेर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले
विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठे यश मिळाले होते. २८८ पैकी २३० हून अधिक जागा जिंकूनही जवळपास दोन आठवडे मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचे चित्र स्पष्ट झाले नव्हते. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची मागणी करत होते, पण भाजपाने त्यांना मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. पण अखेर ४ डिसेंबर रोजी भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केल्यानंतर फडणवीसच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. दुसरीकडे राष्ट्रवादीने (अजित पवार) निवडणुकीच्या निकालानंतरच मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाला पाठिंबा दर्शवला होता.
लाडक्या बहिणींमुळे विधानसभा निवडणुकीत यश
लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर महायुतीने राज्यात विविध योजना सुरू केल्या होत्या. या योजनांमध्ये लाडकी बहिण योजनेचाही समावेश होता. राज्यात सर्वत्र महायुतीच्या विरोधात वातावरण असतानाही लाडकी बहिण योजनेमुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्याच्या चर्चा आहेत. लाडकी बहिण योजनेंतर्गत राज्यातील महिलांनी दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येतात. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीनंतर १५०० रुपयांची ही रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याचे आश्वासनही दिले होते.