सोलापूर : राजा रयतेची काळजी घेणारा, सर्वांना सोबत घेऊन जाणारा, कर्तृत्वाने सिंहासारखा शूर असावा. त्याचबरोबर लांडग्यासारखा लबाड नसावा तर चतुर असावा, लोकशाहीत राज्यकर्त्यांकडून हीच अपेक्षा असते, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. तुळजापूरच्या तुळजामवानी महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख तथा ज्येष्ठ लेखक, साहित्य संशोधक प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार तसेच त्यांच्या दोन पुस्तकांच्या नव्या आवृत्त्यांचा प्रकाशन सोहळा सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
हेही वाचा >>> “अजित पवार बिभीषण असतील आणि ते आमच्याबरोबर आले तर मग..”, देवेंद्र फडणवीसांचं नाना पटोलेंना प्रत्युत्तर
डॉ. शिवाजीराव देशमुख लिखित ‘शैलीदार यशवंतराव ‘ या लोकोत्तर नेते यशवंतराव चव्हाण यांच्याविषयीच्या ग्रंथाची द्वितीय आवृत्ती आणि ‘कथात्म साहित्य : विमर्श आणि विवेचन ‘ या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन शिंदे यांनी केले. प्रा. डॉ. देशमुख व त्यांच्या पत्नी कौसल्या देशमुख यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती आणि कविवर्य रा. ना. पवार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या प्रा. श्रीराम पुजारी कला संकुलातील ॲम्पी थिएटरमध्ये झालेल्या या नेटक्या समारंभात संयोजक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. शिवाजीराव देशमुख यांचे ज्येष्ठ सहकारी प्रा. डॉ. आनंद जाधव यांनी ‘शैलीदार यशवंतराव ‘ ग्रंथावर भाष्य करताना पाश्चिमात्य विचारवंत प्लेटो यांच्या विचारांचे संदर्भ दिले. तोच धागा पकडून सुशीलकुमार शिंदे यांनी प्लेटो आणि मॕकिव्हली या तत्वज्ञांच्या विचारांचा दाखला देत राजा कसा असावा, याचे विवेचन केले. यात देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी मार्मिक टिप्पणी करून, राजा हा रयतेची काळजी घेणारा, प्रामाणिक, रयतेच्या कल्याणाप्रती निष्ठा बाळगणारा, राजधर्म पाळणारा, कर्तृत्वाने सिंहासारखा शूर असावा. पण लांडग्यासारखा लबाड नव्हे तर चतुर असावा.
हेही वाचा >>> कंत्राटी शिक्षकांमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा – आ. अरूण लाड
लोकशाही देशात राज्यकर्त्यांकडून हीच अपेक्षा असते, असे शिंदे यांनी भाष्य केले. प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांच्या ‘ शैलीदार यशवंतराव ‘ ग्रंथाच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन २००९ साली आपल्याच हस्ते झाले होते. आता पुन्हा दुस-या आवृत्तीचेही प्रकाशन आपल्या हातून झाले. त्याबद्दल धन्यता वाटते. १९८३ साली यशवंतराव चव्हाण यांच्या ‘ कृष्णाकाठ ‘या आत्मचरित्र ग्रंथाचे प्रकाशनही आपल्याच हस्ते झाले होते, अशी आठवणही शिंदे यांनी काढली. प्रा. शिवाजीराव देशमुख यांच्यासारख्या चांगल्या, कृतिशीलता जापणा-या आदर्श प्राध्यापकाचा विद्यार्थी होणे हे देखील भाग्य असते, असे गौरवोद्गार शिंदे यांनी काढले. यावेळी डॉ. अभयकुमार साळुंखे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, डॉ. आनंद जाधव, प्राचार्य प्रशांत चौगुले, प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर, जयसिंहराव देशमुख, डॉ. देशमुख यांच्या कन्या डॉ. शिवानी देशमुख आदींनी मनोगत मांडले. गौरवमूर्ती डॉ. शिवाजीराव देशमुख यांनी आयुष्याचा धांडोळा घेताना जीवन साफल्य झाल्याबद्दल कृतज्ञतापर भावना व्यक्त केली. समारंभाचे सूत्रसंचालन अरवि़द हंगरगेकर यांनी केले, तर कवी माधव पवार यांनी आभार मानले.