हर्षद कशाळकर
अलिबाग: माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे पेण विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. या पक्षप्रवेशामुळे मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. पण त्याचवेळी शेकापची मात्र वाताहत झाली आहे. मतदारसंघात भाजपला समर्थ पर्याय देऊ शकेल असे नेतृत्वच विरोधी पक्षाकडे राहिलेले नाही.
पेण विधानसभा मतदारसंघातून धैर्यशील पाटील सलग दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजपच्या रविशेठ पाटील यांनी पराभव केला. मतदारसंघात शिवसेना भाजप युती शेकापवर भारी ठरली होती. या पराभवानंतर धैर्यशील पाटील काही काळ अज्ञातवासात होते. पक्षाच्या कार्यक्रमांपासून त्यांनी अलिप्त राहणे पसंत केले होते. त्यामुळे ते नाराज असल्याच्या वावडय़ा अधूनमधून उठत होत्या. वडखळ येथे झालेल्या शेकापच्या वर्धापन दिनाला त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा काही काळ थांबल्या होत्या.
विधानसभा निवडणूकीनंतर जिल्ह्यात झालेल्या नगरपंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापचा फारसे यश मिळाले नव्हते. त्यामुळे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांच्या समवेत तालुक्यातील दुसऱ्या फळीतील नेतेही भाजपवासी झाले. त्यामुळे शेकापला मोठा धक्का बसला.
काँग्रेसलाही धक्का
पेण विधानसभा मतदारसंघात शेकाप आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष होते. आधी रविशेठ पाटील आणि आता धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने दोन्ही पक्षांचे मतदारसंघातील स्थान अडचणीत आले. रविशेठ पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे स्थान जवळपास संपुष्टात आले. गेली विधानसभा लढविणाऱ्या काँग्रेस उमेदवारावर अनामत रक्कम जप्त होण्याची वेळ आली होती. आता धैर्यशील पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे शेकापचीही तीच परिस्थिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणेच बदलणार आहेत. काँग्रेस आणि शेकापची वाताहत होत असताना भाजपची ताकद मात्र वाढणार आहे. त्यामुळे रविशेठ पाटील यांच्यासाठी आगामी काळात हा मतदारसंघ अधिक सुरक्षित होणार आहे.
भाजपला समर्थपणे पर्याय ठरू शकेल असे नेतृत्व काँग्रेस आणि शेकापकडे राहिलेले नाही. त्यामुळे निर्माण झालेली विरोधी पक्षाची पोकळी भरून काढण्याची जबाबदारी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणार आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत पाहायला मिळू शकणार आहे. आधी रविशेठ पाटील आणि आता धैर्यशील पाटील यांच्या पक्षांतराने मतदार संघातील राजकीय समीकरणाचा नवा अध्याय सुरू होईल यात शंका नाही..
शेकापच्या अडचणी वाढल्या
रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण या चार विधानसभा मतदारसंघात शेकापची ताकद होती. रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी शेकाप सोडल्यानंतर पनवेलमधील शेकापला उतरती कळा लागली. विवेक पाटील यांना कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात अटक झाल्यानंतर उरणमधील पक्षाचे भवितव्य अडचणीत सापडले. आता पेण मतदारसंघातील धैर्यशील पाटील यांनीही पक्ष सोडल्याने शेकापला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे मतदारसंघातील अस्तित्व धोक्यात आले आहे. याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे.