नव्या पिढीत तारपावादकांची वानवा

नितीन बोंबाडे, डहाणू

तारपा या वाद्यास आदिवासी संस्कृतीत खूप महत्त्व आहे. अनेक सण-उत्सवात, सांस्कृतिक कार्यक्रमांत हे वाद्य वाजवले जाते. आदिवासी लोकसंस्कृतीचे कोंदण असलेल्या तारपा नृत्यात तर या वाद्याचा आवर्जून उपयोग केला जातो. मात्र सध्या तारपावादकांची संख्या घटू लागली आहे. नव्या पिढीमध्ये तारपा वाद्य वाजवण्यास शिकण्याची ओढ नाही. त्यामुळे आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या वाद्याचे सूर हरवणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

आदिवासी समाज उत्सवप्रिय आहे. तसेच या समाजात नृत्यालाही फार महत्त्व आहे. निसर्गपूजक आदिवासी समाज होळी, दिवाळी, गणेशोत्सव या सणांसह नवीन आलेले पीक, नवीन भाताची लागवड अशा प्रसंगीही उत्सव साजरा करण्यासाठी हे नृत्य केले जाते. हातात हात गुंडाळून गोल रिंगण, ताल, लय आणि सुरावटीवर सामूहिक नृत्य केले जाते. तारपा वाजवणारे या वाद्यात मोठय़ा ताकदीने फुंकर मारून विविध प्रकारचे सूर काढतात. या वादकांमुळे या नृत्याला बहर येतो. मध्यरात्रीपर्यंत तारपानृत्य चालत असले तरी तारपावादक थकत नाहीत, कारण आव्हान पेलण्यात ते सराईत असतात.

मात्र आता या तारपावादकांची संख्या कमी होत आहे. अनेक तारपावादक वयोवृद्ध झाले असून नव्या पिढीचे वादक तयार होताना दिसत नाहीत. त्यामुळे या बहारदार वाद्याचे सूर हरवण्याच्या मार्गावर आहे.

लांब भोपळा सुकवून त्याला बांबूच्या नळ्या, ताडाच्या झावळ्या आणि मेण वापरून हे वाद्य तयार केले जाते. या वाद्याचा दमदार ध्वनी, निसर्गाशी नाते सांगणारे पोशाख आणि एकमेकांच्या कमरेत हात गुंफून, फेर धरून, नृत्यात मग्न झालेले आदिवासी लोककलेच्या कार्यक्रमामधून आणि वारली चित्रकलेच्या माध्यमातून सर्वाना परिचित झाला आहे. तारपा हे वाद्य वाजवण्यासाठी नव्या पिढीने पुढे यावे, असे आवाहन अनेक आदिवासींनी केले आहे.

 

आदिवासींची बरीच नृत्ये आहेत; पण तारपा नृत्य जास्त प्रसिद्ध आहे. परंतु त्याचा वारसा टिकवणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन तारपावादक तयार होणे गरजेचे आहे.

– वसंत भसरा, आदिवासी अभ्यासक

Story img Loader