शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जिव्हाळय़ाचे संबंध होते. शिवसेनेच्या पायाभरणीमध्ये लोकनेत्यांचीदेखील मोठी साथ मिळाली असल्याचे सांगताना, मराठी माणूस ताठ मानेने उभा करण्यासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा इतिहास नव्या पिढीने समजून घेतला पाहिजे, असे मत माजी आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.
पाटण तालुक्यातील एकावडेवाडी (सळवे) येथील शिवशक्ती मित्रमंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळय़ाचे अनावरणाचा कार्यक्रम शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते. पंचायत समितीचे सदस्य डी. आर. पाटील, दीपक हांडे, संतोष साळुंखे, जयवंतराव शेलार, अरूणशेठ कदम, प्रकाश पवार, शंकर एकावडे, स्वाती गिरीगोसावी, अॅड. मिलिंद पाटील, टी. डी. जाधव, एकनाथराव जाधव, विकास गिरीगोसावी, नारायण कारंडे उपस्थित होते.
शंभूराज म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण, त्यांचे विचार पुढे नेण्याचे काम मावळय़ांनी करायचे आहे. मराठी माणसावरील दडपण कमी करून त्यांना ताठ मानेने जगता यावे, यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. कदाचित नव्या पिढीला हा इतिहास माहिती नसावा. त्यांनी तो समजून घ्यायला हवा.
लोकनेते बाळासाहेब देसाई आणि शिवसेनाप्रमुखांचे जिव्हाळय़ाचे संबंध होते. लोकनेत्यांच्या नातवाचे शिवसेनेत स्वागत करण्यासाठी म्हणूनच शिवसेनाप्रमुख लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यावर आले. लोकनेत्यांचा नातू महाराष्ट्रात रूबाबदारपणे फिरला पाहिजे यासाठी त्यांनी सहकार परिषदेचे अध्यक्षपद आणि या पदाला मंत्रिपदाचा दर्जा आपणाला देऊ केल्याबद्दल शंभूराज यांनी कृतज्ञता व्यक्त केली. केवळ पुतळे उभारून आपली जबाबदारी संपणार नाही. तर, या खऱ्या खुऱ्या लोकनेत्यांचे विचार पुढे नेण्याचे कार्य साध्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा