राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. तसेच रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत आता सर्व पक्ष आणि नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली. आता नवीन राज्यपाल भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत अशी अपेक्षा आहे.
जयंत पाटील म्हणाले की, “महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो.”
हे ही वाचा >> अग्रलेख : राजभवनातील राधाक्का!
“नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपाच्या हातचे बाहुले बनणार नाहीत”, अशी आशा जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो असे म्हणत या महामानवांचा जयघोष केला आहे.
हे ही वाचा >> “महाराष्ट्रातली घाण…” राज्यपालांच्या राजीनामा मंजुरीनंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
“राज्यातली घाण गेली” : शिवसेना
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “उशिरा का होईना राज्याला न्याय मिळाला आहे.” तर शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी “महाराष्ट्रातली घाण गेली” अशी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.