२५ ऑगस्टपर्यंत समायोजन प्रक्रिया पूर्ण होणार

राज्यातील शालेय शिक्षणक्षेत्रात अतिरिक्त शिक्षकांबाबत प्रथमच सर्वंकष धोरण शासनाने जाहीर केले असून, यापुढे अशा शिक्षकांची पसंती नव्या नियुक्तीत प्राधान्याने विचारात घेतली जाणार आहे.

अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर असून, त्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना सार्वत्रिक होती. त्यांना रुजू करून घेण्यात संस्थाचालक नेहमी टाळाटाळ करीत. या पाश्र्वभूमीवर राज्याचे शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी अतिरिक्त शिक्षकांबाबत प्रथमच एक कार्यक्रम जाहीर केल्याने राज्यातील सर्व अतिरिक्त शिक्षकांची यादी जाहीर झाल्यावर २० ऑगस्टपर्यंत रिक्त जागांच्या शाळा व अतिरिक्त शिक्षकांकडून हरकती मागविण्यात येणार असून त्यावर २२ ऑगस्टला निर्णय होईल. २४ व २५ ऑगस्टला ही समायोजनाची प्रक्रिया पूर्ण होईल. या प्रक्रियेत तीन फे ऱ्यांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचा विचार होईल. सेवाज्येष्ठतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचा प्रवर्ग व त्याचा अध्यापनाचा विषय यानुसार यादी तयार होईल. त्यानुसार जिल्ह्य़ातील रिक्त जागा असलेल्या शाळांसोबत पडताळणी केली जाईल. जनरेटरसह सर्व ऑनलाइन सुविधा असलेल्या सभागृहात समायोजन प्रक्रिया करतांना संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षक व मुख्याध्यापकांना हजर राहणे अनिवार्य आहे.

अतिरिक्त शिक्षकांच्या पसंतीनुसार त्याने शाळा निवडल्यानंतर त्याला तात्काळ नियुक्तीची प्रत द्यावी व लगेच ही माहिती संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. पहिल्या फे रीत समायोजन न झालेल्या शिक्षकांचा दुसऱ्या फे रीत विचार होईल. या फे रीत शिक्षकाच्या पसंतीनुसार सर्वसाधारण प्रवर्गातील रिक्त जागेवर नियुक्ती मिळेल. तिसऱ्या फे रीत प्रवर्गाचा विचार न करता विषयानुसार रिक्त जागांची यादी शिक्षकांना दिली जाईल. जर त्याच जिल्ह्य़ात जागा नसेल तर अशा शिक्षकांचे प्रस्ताव विभागीय उपशिक्षण संचालक कार्यालयाकडे जातील. समायोजनाची ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी प्रत्येक अतिरिक्त शिक्षकांना त्याची माहिती देण्याबाबत शिक्षण आयुक्तांनी शिक्षणाधिकाऱ्यांना बजावले आहे. या प्रक्रियेत जिल्हा पातळीवर समायोजन न झालेल्या शिक्षकांना अन्य जिल्ह्यात रुजू व्हावे लागेल.

पळवाट बंद

यापूर्वीही समायोजनाची प्रक्रिया होती, परंतु रिक्त जागांवर पाठविण्यात आलेल्या शाळांचे संस्थाचालक त्यांना रुजूच करून घेत नव्हते. प्रसंगी पैशाची मागणी होई. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या मनस्तापास पारावार नव्हता. या प्रक्रि येत मात्र समायोजन प्रक्रियेच्या दिवशीच या शिक्षकांना नियुक्तीचा आदेश मिळणार आहे. संबंधित मुख्याध्यापकास त्याला रुजू करावे लागणार आहे. त्याबाबत संकेतस्थळावर त्याचवेळी माहिती टाकावी लागणार असल्याने पळवाट बंद करण्याची दक्षता घेण्यात आली आहे. यापुढे रिक्त जागा असलेल्या शाळांना अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेणे भाग पडणार आहे.