रत्नागिरी जिल्ह्य़ात दरवर्षी जून महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या सरासरीबाबत गेल्या पाच वर्षांतील नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. जिल्ह्य़ात पावसाची जून महिन्यातील एकूण सरासरी ८१७ मिलीमीटर आहे. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहता २००९ च्या जूनमध्ये या सरासरीच्या जेमतेम निम्मा (३४९.६ मिमी) पाऊस पडला होता, तर गेल्या वर्षी सरासरीपेक्षा किंचित जास्त (८५६ मिमी) पावसाची नोंद झाली. पण या वर्षी मात्र ३० जूनअखेर १३४८.५ मिमी पाऊस पडला आहे.
गेल्या दहा वर्षांत जून महिन्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पाहिली तर फक्त २००७ मध्ये यंदापेक्षा जास्त पावसाची नोंद (१३६८.९ मिमी) जूनअखेर झाली आहे.
दरम्यान मंगळवारी सकाळअखेर जिल्ह्य़ातील यंदाच्या पावसाची सरासरी आणखी वाढून १४४७ मिमीवर पोहोचली आहे. सोमवारी जिल्ह्य़ात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मंडणगड तालुक्यात सर्वात जास्त (८४ मिमी), तर त्या खालोखाल रत्नागिरी (६५ मिमी), राजापूर (५५ मिमी), गुहागर (५१ मिमी) आणि संगमेश्वर (५०.७८ मिमी) तालुक्यामध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली. दीर्घकाळ दमदारपणे पडणाऱ्या या पावसामुळे जिल्ह्य़ात सर्वत्र भात लावणीच्या कामाने चांगलाच वेग घेतला आहे.
संततधार पावसामुळे कोकणात रेल्वे-रस्ता वाहतूक ठप्प
रत्नागिरी जिल्ह्य़ातील संगमेश्वर तालुक्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे मुंबई-गोवे महामार्ग आणि कोकण रेल्वेचीही वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्य़ात कालपासून सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून संगमेश्वर तालुक्यात त्याचा विशेष जोर आहे. आज सकाळपासून तर या टापूमध्ये पावसाने कहर केला असून अनेक ठिकाणी महापुरासारखी स्थिती आहे. संगमेश्वरपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर महामार्गाला समांतर वाहणाऱ्या नदीचे पाणी महामार्गावर आल्यामुळे संध्याकाळपासून वाहतूक बंद पडली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या आहेत.
याच टापूमध्ये संगमेश्वरपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आरवली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेमार्गावर माती वाहून आल्यामुळे कोकण रेल्वेचीही वाहतूक बंद पडली आहे. माती दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून रात्री उशिरापर्यंत वाहतूक पूर्ववत होईल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा