महाराष्ट्रात करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन संसर्गाची वाढती स्थिती पाहता राज्यातील ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या आदेशात सरकारने ओमायक्रॉनचा संसर्ग पाहता काही नवे निर्बंध लागू होत असल्याचं नमूद केलं आहे. या आदेशानुसार १० जानेवारीपासून हे नवे निर्बंध लागू होणार आहेत. यात लग्ना समारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमधील लोकांच्या उपस्थिती संख्येवर निर्बंध लावण्यात आले आहेत. याशिवाय केवळ लसीचे दोन डोस घेणाऱ्यांनाच प्रवास आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाची परवानगी असणार आहे.
कोणते निर्बंध लागू होणार?
१. पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही.
२. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही.
३. लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी.
४. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येणार.
५. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार.
६. शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार. यात केवळ १० वी, १२ वीच्या बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा इतर सरकारी शैक्षणिक विभागांकडून आयोजिक नियोजित कृतिकार्यक्रमाला अपवादात्मक स्थितीत परवानगी असणार.
७. जलतरण तलाव, व्यायामशाळा, सौंदर्य प्रसाधनगृह बंद राहणार.
८. केशकर्तनालये ५० टक्के क्षमतेने चालू राहतील, मात्र करोनाबाबच्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार. याशिवाय दररोज रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील.
९. जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धांवरही निर्बंध असणार, केवळ पूर्वनियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांना विनाप्रेक्षक परवानगी असणार.
१०. प्राणीसंग्रहालय, किल्ले, मनोरंजन पार्क अशी सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद राहतील.
११. शॉपिंग मॉल आणि बाजार रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. इतरवेळी ५० टक्के क्षमतेसह परवानगी असणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार.
१२. रेस्टॉरंट आणि भोजनालये रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. इरवेळी केवळ ५० टक्के क्षमतेने चालू ठेवता येणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार. होम डिलिव्हरी पूर्ण वेळ आणि सर्व दिवस सुरू राहणार.
१३. नाट्यगृह आणि सिनेमागृह १२. रेस्टॉरंट आणि भोजनालये रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असणार. इरवेळी केवळ ५० टक्के क्षमतेने चालू ठेवता येणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार.
१४. आंतरराष्ट्रीय प्रवास केंद्र सरकारच्या नियमांनुसार होणार.
१५. राज्यांतर्गत सर्व प्रकारच्या प्रवासासाठी ७२ तासात केलेली RTPCR निगेटिव्ह चाचणी अहवाल बंधनकारक असणार.
हेही वाचा : “कुणीही आत्मसंतुष्ट होऊ नका, पुढच्या दोन आठवड्यात…”, करोनाबाबत दिल्लीतील तज्ज्ञ डॉक्टरांचा गंभीर इशारा!
ओमायक्रॉनमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीच्या नियमावलीत बदल
जगभरात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना भारतात देखील ओमायक्रॉन बाधितांची संख्या ३ हजारांच्या वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार परदेशातून, विशेषत: ओमायक्रॉनचा धोका असलेल्या देशांच्या यादीत समाविष्ट देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांच्याहोम क्वारंटाईनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच, त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्हि किंवा निगेटिव्ह आल्यास पुढील कार्यवाहीच्या पद्धतीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात नियमावली जारी केली आहे.
सर्व प्रवाशांना ७ दिवसांचे गृह विलगीकरण!
केंद्राने जारी केलेल्या नियमावलीनुसार, आता भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ७ दिवस होम क्वारंटाईन राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे हे प्रवासी ओमायक्रॉनबाधित देशांच्या यादीत असो किंवा नसो, त्या सगळ्यांना ७ दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करावाच लागणार आहे. केंद्राने जारी केलेली नवी नियमावली येत्या ११ जानेवारीपासून अर्थात मंगळवारपासून लागू होणार आहे.
ओमायक्रॉनबाधित देशांमधील प्रवासी
दरम्यान, ज्या देशांचा समावेश भारतानं ओमायक्रॉन देशांच्या यादीमध्ये केला आहे, अशा देशांमधील प्रवाशांना भारतातील कोणत्याही विमानतळावर उतरल्यानंतर तिथे करोनाची चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित विमान कंपनीला माहिती द्यायची आहे. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली, तरी त्यांना होम क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. मात्र, जर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली, तर त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.