कराड : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे (ता. कराड) येथे सहा पदरीकरणांतर्गत नवीन ज्यादा लेनचा पथकर नाका उभारून तो कार्यान्वित करण्यात आला आहे. विना बूथ १३ लेनवर अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून फास्टटॅगनेच पथकर वसुली होत आहे. त्यामुळे शंभर टक्के पथकर वसुलीबरोबरच वादाचे प्रसंग टळताना पथकर नाक्यावरील वाहन कोंडी, वाहनांच्या रांगांमधील घुसमट थांबण्याची चिन्हे आहेत.
पुणे- बंगळुरू महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर दोन दशकांपूर्वी तासवडेला पथकर नाका उभारला गेला. अनेक कारणांनी हा पथकर नाका बहुचर्चेत राहिला. स्थानिकांना पथकरात सूट मिळावी या मागणीसाठी अनेकदा आंदोलने झाली. वसुलीच्या ठेक्यावरून झालेले संघर्ष चांगलेच गाजले. अलीकडेच या पथकर नाक्यावर स्थानिकांना पथकरमाफीच्या मागणीसाठी मोठे आंदोलनही झाले होते.
सहा पदरीकरणांतर्गत जुन्या पथकरनाक्याच्या अगदी नजीक प्रशस्त रस्ते तयार झाल्यानंतर गतवर्षी नवीन पथकरनाका उभारण्यास प्रारंभ झाला. हा नवीन पथकर नाका उच्च तंत्रज्ञानाने (हायटेक) उभारण्यात आला. अदानी समूहाकडून चालवला जात असलेल्या या नव्या पथकर नाक्यावर तेरा लेन करण्यात आल्या आहेत. याशिवाय स्थानिक वाहनचालकांना दोन्ही बाजूस स्वतंत्र लेन दिल्या आहेत. त्यातील कोणत्याही लेनवर बूथ नाही. स्वयंचलित यंत्रणेद्वारे वाहनावरील फास्टटॅग स्कॅन होताच वाहने तात्काळ पुढे जातील. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणार नाहीत.
पथकर नाक्यावरील लेनही अतिशय अरुंद असल्याने वाहनातील लोक पथकर नाक्यावर आपल्या वाहनाचे दार उघडू शकणार नाहीत. नाक्यावरील कर्मचार्यांनाही उभे राहण्यास जागा नाही. फेरीवाले, खाद्यपदार्थ विकणारे पथकर नाक्यावरील लेनवर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे फास्टटॅग नसलेले वाहन आल्यास उपस्थित कर्मचार्यांमध्ये वाद होत आहेत. याशिवाय स्थानिक वाहनांना स्वतंत्र लेन असताना काही वाहन चालक मुख्य लेनचा वापर करत असल्याने वादाचे प्रसंग घडू लागले आहेत. याकडे संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
दरम्यान, तासवडेचा जुना पथकर नाका पाडण्यास सुरुवात झाली असून, नवीन रस्ते झाल्यानंतर येथे आणखी एक नवा पथकर नाका उभारून तो फक्त कराड, कोल्हापूरकडे जाणार्या वाहनांसाठी वापरला जाईल. त्याचवेळी सध्या सुरू झालेल्या नव्या नाक्यावर सातारा पुणे बाजूकडे जाणार्या वाहनांसाठीची पथकर वसुली सुरु राहणार आहे. त्यामुळे सुसूत्रता येवून वाहनधारक व प्रवाश्यांना दिलासा मिळणार आहे.