सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात भाजपने ग्रामपंचायतीत सत्ताकेंद्रे निर्माण करून काँग्रेसला दणका दिला आहे. भाजप सदस्यांनी विकासाचे राजकारण करावे. मुद्दय़ावरून कोणी गुद्यावर येत असेल तर कायदा हातात घ्या. मी तुमच्या पाठीशी आहे, असे विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. विनोद तावडे यांनी काँग्रेसला अप्रत्यक्ष टोला हाणत इशारा दिला.
भाजप नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार बांदा येथे आयोजित केला होता. त्यावेळी तावडे बोलत होते. यावेळी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, विजयकुमार मराठे व अन्य उपस्थित होते.
भाजपचे जिल्ह्य़ात ग्रामपंचायतीत ३०० सदस्य विजय होणे हे मोठे यश आहे. गल्ली मजबूत तर दिल्लीही मजबूत होईल. यापुढे महाराष्ट्रात भाजप युतीचीच सत्ता येईल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त करून यापुढे भाजपने विकासाचे धोरणच ठेवून बदल घडवावा, असे आवाहन केले.
विदेशी गुंतवणूक मुद्दय़ावर केंद्राचे राजकारण बदलत आहे. केंद्र व राज्य सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचारी मुद्दे निघत आहेत. पंतप्रधानांनी अनुदान थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्याचा इरादा व्यक्त केला असला तरी काँग्रेसवाले बोगस बँक खाती काढतील आणि त्यात अनुदान जमा करतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
गॅस सिलेंडरबाबतही सरकारने ग्राहकांत भांडणे लावून ठेवली आहेत. सिंचन घोटाळा तर लुटणाराच आहे. त्यामुळे येत्या अधिवेशनात सरकारला आडवे पाडताना गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहे, असे ना. विनोद तावडे म्हणाले.
इंदू मिल जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला देणाऱ्या काँग्रेसने स्मारकासाठी पैसे मागणी केले. त्या काँग्रेसवाल्यांना जनता धडा शिकवेल, असे तावडे म्हणाले.
यावेळी आम. प्रमोद जठार, अतुल काळसेकर, डॉ. प्रसाद देवधर यांनी मार्गदर्शन केले.

Story img Loader