राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आक्रमक शैलीचे माजी मंत्री भास्कर जाधव यांची नियुक्ती झाल्यामुळे मंत्रिपद गेल्याची थोडी भरपाई झाली असली तरी त्यांच्यापुढे नवी राजकीय आव्हाने निर्माण झाली आहेत. शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेल्या भास्कर जाधव यांनी प्रभावी वक्तृत्व आणि आक्रमक शैलीच्या बळावर राज्यमंत्री पदापर्यंत मजल मारली, पण आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या फेररचनेत जाधवांचे मंत्रिपद गेले. त्यामुळे गेले दोन दिवस ते काहीसे खट्ट झाले होते. त्यातच त्यांचे जिल्ह्य़ातील पक्षांतर्गत विरोधक आमदार उदय सामंत यांना हे मंत्रिपद मिळाल्यामुळे जाधवांच्या दु:खात भर पडली, पण पवारांनी त्यांचेही पूर्ण राजकीय खच्चीकरण होऊ न देता पक्षातील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांचा विरोध पत्करून जाधवांना पक्षामध्ये मानाचे स्थान दिले आहे. त्याचप्रमाणे या नियुक्तीमुळे महत्त्वाच्या राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद कोकणाला प्रथमच मिळाले आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात एके काळी समाजवादी पक्षाचे, तर रत्नागिरी जिल्ह्य़ात काँग्रेसचे वर्चस्व होते; पण १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच कोकणातही भगवी लाट आली. भाजप-सेना युतीच्या काळात तब्बल अर्धा डझन मंत्री कोकणातील होते, पण ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर हे चित्र बदलले. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसमय झाला. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिरकाव केला आणि हळूहळू चांगला जम बसवत जिल्ह्य़ातील पाचपैकी दोन विधानसभा मतदारसंघही काबीज केले.
नव्या जबाबदारीमुळे जाधवांना काँग्रेस आघाडीच्या राज्यपातळीवरील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्य़ात त्यांचा स्वत:चा गुहागर मतदारसंघ आणि आमदार सामंतांचा रत्नागिरी मतदारसंघ आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडे राखण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात रत्नागिरी मतदारसंघ काँग्रेसकडे असून राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नीलेश येथून प्रतिनिधित्व करत आहेत. जाधव आणि राणे पिता-पुत्रांचे ‘सख्य’ सर्वज्ञात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना या संदर्भात जाधवांना आपल्या जुन्या भावनांना मुरड घालावी लागणार आहे. त्याचप्रमाणे शेजारच्या रायगड जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री सुनील तटकरे आणि रत्नागिरी जिल्ह्य़ात त्यांचे मंत्रिपद पटकावणारे उदय सामंत यांच्याही बाबतीत बेरजेचे राजकारण करावे लागणार आहे. यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे, पवारांनी पक्षामध्ये प्रथमच प्रदेश पातळीवर कार्याध्यक्ष पद निर्माण करून ठाण्याचे आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड यांची या पदावर नियुक्ती केली आहे. अशा परिस्थितीत जाधव आणि आव्हाड यांच्यात अधिकार व जबाबदाऱ्यांबाबत गोंधळ उडण्याची दाट शक्यता आहे. अन्य कोणत्याही राजकीय पक्षामध्ये नसलेल्या या पदाची निर्मिती प्रदेशाध्यक्षांना साहाय्यक म्हणून होण्याऐवजी अडथळाच होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एरवी प्रदेशाध्यक्षपद हे राजकीय पुनर्वसन म्हणून पाहिले जाते, पण आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर भाजपने या पदावर आमदार देवेंद्र फडणवीस या विदर्भातील प्रभावी तरुण नेत्याची नियुक्ती केली आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाधव आणि आव्हाडांकडे प्रदेश संघटनेची जबाबदारी सोपवली आहे. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे घणाघाती वक्तृत्वाने राज्यभर सभा गाजवत आहेत. काँग्रेस पक्षामध्येही प्रदेशाध्यक्षपदाच्या फेरनिवडीबाबत हालचाली सुरू आहेत. हे सर्व लक्षात घेता आगामी राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्षपद ही जाधवांसाठी संधीपेक्षाही नवे आव्हानच ठरण्याची शक्यता आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा