Challenges Of Mahayuti : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सप्टेंबर महिन्यात जाहीर होऊ शकते. त्यानंतर निवडणूक कधी आणि किती टप्प्यात होणार हे चित्र स्पष्ट होईल. मात्र त्याआधीच निवडणूक कशी जिंकायची याची तयारी महायुती ( Mahayuti ) आणि महाविकास आघाडी या दोन्ही युती-आघाडीतल्या पक्षांकडून सुरु झाली आहे. ‘आम्ही २०० जागा जिंकू’, असा आत्मविश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या ३० जागा जिंकून आल्याने त्यांचा आत्मविश्वास प्रचंड दुणावला आहे. तर दुसरीकडे महायुतीने ( Mahayuti ) महाराष्ट्रात जो पराभव झाला त्यातून धडा घेत निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली असताना महाराष्ट्रात महायुतीपुढे नेमकी आव्हानं काय आहेत? हे आपण जाणून घेऊ.
आव्हान क्रमांक १- महाविकास आघाडी
महाविकास आघाडीतले तीन पक्ष म्हणजेच ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष’, ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष’ आणि काँग्रेस. या तीन पक्षांना ज्या ३० जागा लोकसभेला महाराष्ट्रात मिळाल्या त्यामुळे या तिन्ही पक्षांनी आता हा विश्वास व्यक्त केला आहे की महाराष्ट्राची विधानसभाही आम्हीच जिंकणार. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा होते आहे. तर नाना पटोले हे वारीच्या वेळी ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेली वीणा गळ्यात घालून विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १३ जागा मिळाल्या आहेत. त्यातून हा विश्वास निर्माण झाल्याचं दिसून आलं. भाजपा आणि महायुतीने ( Mahayuti ) त्यांचा चेहरा जाहीर केलेला नाही. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जाईल हे जाहीर करण्यात आलं आहे. मात्र पुढे काय? हे अद्याप स्पष्ट नाही. याचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता जास्त आहे.
आव्हान क्रमांक २- शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं आव्हान
भाजपाला राज्यात काँग्रेसपेक्षा मोठं आव्हान आहे ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांचं. याचं महत्त्वाचं कारण आहे या दोन्ही दिग्गज नेत्यांचे पक्ष फोडण्यात आले आहेत. त्यानंतर जनतेची सहानुभूती या दोन्ही नेत्यांना मिळाली आहे. ज्याची झलक लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने पाहिली आहे. यावेळी जेव्हा प्रचाराला दोन्ही नेते उतरतील त्यावेळी ते पुन्हा एकदा पक्ष कसा फोडला? आमच्याबरोबर कसा घात झाला? हे दोन्ही नेते प्रचार सभांमधून सांगतील. अजित पवारांना विश्वास होता की बारामती ते जिंकतील पण तसं घडलं नाही. बारामतीने शरद पवारांना साथ दिली आणि सुप्रिया सुळे पुन्हा खासदार झाल्या. तसंच उद्धव ठाकरे हे सातत्याने माझे वडील चोरले, पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला हे भाषणांमधून सांगत होते, त्यामुळे त्यांच्या बाजूने असलेली सहानुभूती कायम राहिली. यावेळीही तसं घडू शकतंच ज्याचा परिणाम महायुतीला ( Mahayuti ) भोगावा लागण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही.
आव्हान क्रमांक ३ अजित पवार
महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं महायुतीत येणं हे खुद्द सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाच्या लोकांनाच पसंत पडलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली. शरद पवार विरुद्ध अजित पवार हा सामनाही लोकसभेला झाला. पण जनतेचा कौल हा शरद पवारांच्या बाजूने आहे हेच दिसून आलं. अजित पवार विकासाच्या गोष्टी सांगत होते, तसंच शरद पवारांनी त्यांच्या उमेदीच्या काळात वेगळी भूमिका कशी घेतली हे सांगत होते. तरीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत फक्त एक जागा जिंकता आली. आत्ता अजित पवारांची अवस्था ही महायुतीतही फार बरी आहे असं नाही. कारण ज्या अपेक्षेने त्यांना महायुतीने ( Mahayuti ) बरोबर घेतलं ती अपेक्षा पूर्ण करण्यात अजित पवार बऱ्याच अंशी अपयशी ठरल्याचं दिसतं आहे. तसंच एकनाथ शिंदे हे जेव्हा भाजपाच्या साथीला आले तेव्हा त्यांनी तसं येणं हे नैसर्गिक आहे असं मत असणारा वर्ग तयार झाला. जो वर्ग अजूनही आहे, मात्र याच एका विशिष्ट वर्गाला अजित पवारांचं महायुतीत ( Mahayuti ) येणं आणि सत्ता उपभोगणं पसंत पडलेलं नाही.
आव्हान क्रमांक ४ राज ठाकरे
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात हे जाहीर केलं होतं की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत म्हणून माझा बिनशर्त पाठिंबा. त्यांची ही भूमिका काहीशी कोड्यात टाकणारी ठरली. पण जेव्हा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर राज ठाकरेंनी काहीही भाष्य केलं नाही. त्यांचं हे मौन सूचक होतं हे तेव्हा कुणाला कळलं नाही. इतकंच काय तर नरेंद्र मोदींच्या शपथविधीलाही बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंना बोलवण्यात आलं नाही. या सगळ्यावर कडी करण्यासाठी म्हणून की काय किंवा आता विधानसभेला तुमचं तुम्ही पाहून घ्या या महायुतीला बजावण्यासाठी असेल, राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला. २२५ ते २५० जागा आपण लढवणार आहोत यांचं (महायुती) काही ठरत नाही त्यामुळे आपण त्यांच्याबरोबर जायचं की नाही ते नंतर पाहू असं राज ठाकरेंनी महायुतीबाबत म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंची ही घोषणा महायुतीसाठी ( Mahayuti ) डोकेदुखी ठरणारी आहे.
पाचवं आणि महत्त्वाचं आव्हान आहे जागावाटपाचं
लोकसभेला अनेक जागांवर उमेदवार उशिरा दिल्याने आमचा पराभव झाला असं महायुतीतले ( Mahayuti ) नेते कधी दबक्या आवाजात तर कधी जाहीरपणे सांगताना दिसले. आता २८८ जागांपैकी भाजपा किती जागा लढवणार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा? तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा देणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. भाजपाने जर १५० जागा लढवल्या तर १३८ जागा उरतात. त्यापैकी समसमान वाटप ठरलं तरीही प्रत्येकी ६० जागा शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी आणि उर्वरित १८ जागा मित्रपक्षांसाठी असं चित्र दिसू शकतं. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांनाही खुश ठेवून तसंच मित्र पक्षांची मर्जी राखून भाजपाला जागावाटपाचं शिवधनुष्य पेलायचं आहे. मात्र त्याबाबत लवकर निर्णय घेतला नाही तर लोकसभा निवडणुकीला जो फटका बसला तसाच फटका या वेळी Mahayuti ला बसू शकतो असं चित्र सध्या तरी दिसतं आहे.
आव्हान क्रमांक ६ -मनोज जरांगे
मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा नुसता उभा केलेला नाही तर तो महाराष्ट्रभरात घेऊन जात मोठाही केला आहे. सगेसोयऱ्यांसह आरक्षणासाठी ते आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटमही संपला आहे. आता ते शांत असले तरीही येत्या काही दिवसांमध्ये ते आक्रमक होत निवडणूक लढवायची की नाही हा निर्णय घेतील. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आरक्षण मिळालं नाही तर सगळे २८८ उमेदवार पाडा असं आवाहनच मराठा समाजाला केलं आहे. मागच्या दीड वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा आणि जटिल झाला आहे. महायुती सरकारने तो सोडवला नाही आणि निवडणूक येईपर्यंत तसाच भिजत ठेवला तर लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही ‘मराठा फॅक्टर’चा परिणाम पाहण्यास मिळू शकतो.
आव्हान क्रमांक ७ प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला साजेशी भूमिका घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान बदलतील असा प्रचार करण्यातही प्रकाश आंबेडकर आघाडीवर होते. वंचित बहुजन आघाडीचा एकही खासदार लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडून आलेला नाही. मात्र त्यांनी जिथे जिथे त्यांचा उमेदवार उभा केला तिथे त्या उमेदवाराने भाजपाची किंवा महायुतीची Mahayuti मतं खाण्याचं काम चोखपणे बजावलं आहे. विधानसभेला जर प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीबरोबर राहिले आणि असाच प्रचार केला तर त्यांच्या जागाही येऊ शकतात आणि ज्या ठिकाणी जागा येणार नाहीत त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार भाजपा आणि महायुतीची मतं खाण्याचीही जोरदार शक्यता आहे.
महायुतीला आव्हानं पेलण्यासाठी व्हावं लागणार सज्ज
या सगळ्या आव्हानांची तारेवरची कसरत पार करुन भाजपाला महायुतीसह ( Mahayuti ) १४५ ची मॅजिक फिगर गाठायची आहे. तसं घडलं तरच महायुतीचा मुख्यमंत्री होऊ शकणार आहे. केंद्रात सत्ता भाजपासह एनडीएची आहे. महाराष्ट्रात महायुतीचा मुख्यमंत्री पुन्हा बसवायचा असेल तर या प्रमुख अडथळ्यांची शर्यत महायुतीच्या सगळ्याच आमदारांना जिंकावी लागणार आहे किंवा त्यादृष्टीने कसोशीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण ही निवडणूक महायुतीला वाटते तितकी सोपी राहिलेली नाही. ‘लाडका भाऊ’, ‘लाडकी बहीण’, योजनांचा आणि घोषणांचा पाऊस या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या तोंडावर केल्याचं जनतेलाही समजतं आहे. आता महायुतीतल्या तिन्ही पक्षांची रणनीती काय असेल? तसंच ते या आव्हानांची शर्यत कशी जिंकतील? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निवडणुकीत घमासान होणार असल्याचं राज ठाकरेंनी नुकतंच जाहीर केलं आहे. आता येत्या काही महिन्यांमध्ये कुठला पक्ष कशी रणनीती ठरवतो त्यावर सगळं काही अवलंबून असणार आहे यात शंका नाही.