भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावरील तीन भाषांमध्ये अनुवादित वृत्तपट, मालेगावमधील चित्रपटांची विशेष ओळख व प्रदर्शन, यांसह देश-विदेशातील सुमारे १८८ वृत्तपट, लघुपट तसेच चित्रपट, कार्यशाळा असा सर्व खजिना येथे आयोजित पाचव्या आंतरराष्ट्रीय निफ चित्रपट महोत्सवानिमित्त खुला होणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ मेट्रो फाऊंडेशन ऑफ इंडिया संस्थेच्या पुढाकाराने २१ ते २४ मार्च या कालावधीत हा महोत्सव होणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन कुसुमाग्रज स्मारक येथे होणार असून महोत्सवास महाराष्ट्र शासन, फिल्म डिव्हिजन ऑफ इंडिया, नॅशनल फिल्म अर्काईव्ह ऑफ इंडिया यांचे सहकार्य लाभले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या शतकपूर्ती वर्षांनिमित्त महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे मुंबई येथील सुमित पाटील यांनी ‘भारतीय चित्रपटसृष्टीची १०० वर्षे’ या शीर्षकाखाली दादासाहेब फाळके यांचा कलात्मक देखावा तयार केला आहे. महोत्सवात मॉलीवूड, ऑस्ट्रेलियन, फ्रेंच येथील चित्रपट व वृत्तपट दाखविण्यात येणार आहेत. विशेष स्क्रीनिंग म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावरील ‘ऑन द फुट प्रिंट ऑफ महात्मा’ हा वृत्तपट दाखविला जाणार आहे. याशिवाय मालेगावमध्ये अत्यंत कमी खर्चात तयार होणाऱ्या काही चित्रपटांचे प्रदर्शन केले जाणार आहे. वैविध्यपूर्ण विषय व वैशिष्टय़पूर्ण हाताळणी यामुळे मालेगावची चित्रपटसृष्टी देशातही गाजत आहे. स्थानिक पातळीवर मोठय़ा प्रमाणावर गल्ला मिळविणाऱ्या या चित्रपटांचा आनंद घेण्याची संधी रसिकांना यानिमित्ताने मिळणार आहे. महोत्सवादरम्यान लघुपटनिर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक व निर्माता ऑन्ड्रय़ू व्हेल मोफत कार्यशाळा घेणार आहे.
भारतीय सिनेमाची १०० वर्षे यावर इसाक मुजावरलिखित ‘शंभरी सिनेमाची’ पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महोत्सवात जीवनगौरव पुरस्काराने हिंदी चित्रपटसृष्टीसाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे. आतापर्यंत हा पुरस्कार धर्मेंद्र, मनोजकुमार, राजेश खन्ना, आशा पारेख, झीनत अमान, कामिनी कौशल यांना प्रदान करण्यात आला आहे. महोत्सव कालावधीत वाइन पर्यटन महोत्सवही सुरू राहणार असल्याची माहिती संयोजक मुकेश कणेरी यांनी दिली. महोत्सवात सहभागी होण्यासाठी ९९७०३ ६४४४६, ९८३३१ ५६४४६ या क्रमांकावर संपर्क साधावा.