पेपरफुटीत बडे मासे?
प्रतिनिधी, औरंगाबाद
यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फोडणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली प्रत, तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडील उत्तरपत्रिकेची प्रत तपासून प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी ही माहिती दिली.
या गंभीर गुन्हय़ातील आरोपींवर गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांचे लक्ष होते. विक्रीकर निरीक्षक मकरंद मारुती खामणकर यांच्याकडून सर्व पदांसाठीची उत्तरपत्रिका पोलिसांना मिळाली. त्यामुळे या प्रकरणात काही बडे मासे हाती लागण्याची शक्यता आहे. सूत्रधार खामणकर याचे यवतमाळमध्ये कोणाशी संबंध होते, त्याला कोणी उत्तरपत्रिका पुरवली या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यवतमाळला जाणार आहेत. विविध पदांसाठी परीक्षा देणारे मात्र पुरते घाबरले आहेत. दरम्यान, ही परीक्षाच रद्द होऊ शकते काय याचा निर्णय करण्यासाठी ती उत्तरपत्रिका तपासावी लागेल. त्यानंतर यंत्रणेत कोठे दोष आहेत हे शोधू, असे यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले अटक करण्यात आलेले आरोपी दलालीचे काम करीत होते. उत्तरपत्रिका घेणारा शोधायचा, व्यवहार ठरवायचा व सूत्रधार खामणकपर्यंत न्यायचे, अशी कामाची पद्धत होती.

म्हैसाळ पाणी योजना बंद
वार्ताहर, सांगली<br />रब्बी हंगामासाठी सुरू करण्यात आलेली म्हैसाळ पाणी योजना बिलाच्या थकबाकीसाठी विद्युत पुरवठा बंद केल्याने अवघ्या दोन तासात बंद पडली. मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि तासगाव तालुक्यातील काही गावांसाठी रब्बी हंगामाकरिता पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले होते. वीज बिलाच्या सुमारे सव्वा कोटीच्या थकबाकीसाठी ही योजना आता बंद पडली आहे.
खरीप हंगामात प्रारंभीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने आघाडी शासनाने टंचाई निधीतून वीज बिल भरण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे या योजनेतून ऑगस्टअखेर पाणी सुरू होते. त्यानंतर विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने पंप बंद करण्यात आले. शेतकऱ्यांची रब्बी हंगामासाठी पाण्याची मागणी वाढू लागताच योजनेच्या विद्युत विभागाने कसेतरी पंप सुरू केले.
पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरण्यासाठी मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन करीत म्हैसाळ पंपगृहातील १६५० अश्वशक्तीचे पाच पंप सुरू केले. पंप सुरू होताच वीज वितरण कंपनीला आपल्या वीज बिलाच्या थकबाकीची आठवण झाली आणि पंपाचे पाणी कालव्यात पडल्यानंतर अवघ्या दोन तासात थकबाकी वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे सुरू करण्यात आलेले पंप पुन्हा बंद झाले आहेत.
जुलमध्ये पाणी योजना सुरू असताना वापरलेल्या विजेचे १ कोटी ३४ लाखांचे बिल वितरण कंपनीने आकारले आहे. योजना बंद असतानाच्या काळातील महावितरण कंपनीच्या कायद्यानुसार ३९ लाखांचा दंडही आकारण्यात आला आहे. या बिलाच्या वसुलीसाठी योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना म्हैसाळ योजनेचे पाणी वेळेत मिळणे अशक्य बनले आहे.

सहकार कायद्यातील त्रुटी दूर करणार-चंद्रकांत पाटील
वार्ताहर, सातारा
सहकार कायद्यातील त्रुटी दूर करणारे विधेयक आम्ही हिवाळी अधिवेशनात मांडणार आहोत. त्रुटी दूर केल्यावर सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर पर्यंत होतील, असा विश्वास सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
केंद्राच्या नव्या सहकारी कायद्यातील दुरुस्तीच्या अंमलबजावणीत आघाडी सरकारने सुमारे तीन वर्षांचा कालावधी वाया घालवला.आता आम्ही या कायद्यातल्या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न करणार आहोत, तसे विधेयक आम्ही येत्या अधिवेशनात मांडणार असल्याचे ते म्हणाले. गेल्या निवडणुकीपर्यंत पश्चिम महाराष्ट्र आघाडीचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र २००९ च्या निवडणुकीत आम्ही या बालेकिल्ल्यात दहा जागा मिळवल्या तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत वीस जागा मिळवल्या आहेत.आगामी काळात पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्णाांतील ५८ जागांपकी ३५ जागा आम्ही भाजपच्या चिन्हावर निवडून आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पश्चिम महाराष्ट्रात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आम्ही आता प्रयत्न करणार आहोत .त्यासाठी गट-तट कमी करणार .पक्ष मोठा असला की किरकोळ मतभेद असतात, मात्र त्यात सामंजस्य निर्माण करून एकसंधता पक्षात आणणार, असेही ते म्हणाले. सातारा जिल्ह्णाातील सहकार क्षेत्रात भ्रष्टाचार मोठय़ा प्रमाणात वाढला असून तो कमी करण्यावर आम्ही भर देणार असे म्हणत त्यांनी सफाई मोहिमेचे संकेत दिले.

Story img Loader