काँग्रेसच्या दबावतंत्रामुळे वादग्रस्त ठरलेला विधिमंडळातील सत्कार कार्यक्रम रद्दच करण्यात आला आहे. विधिमंडळ सचिवालय, तसेच वि.स.पागे सांसदीय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माजी आमदार मा. गो. वैद्य यांचा सत्कार झाला. वैद्य हे संघ परिवाराशी संबंधित असल्याने काँग्रेसच्या वर्तुळात धुसफुस सुरू झाली होती. त्यानंतर काँग्रेसच्या वर्तुळातून दहा माजी सदस्यांची नावे सत्कारासाठी निश्चित करण्यात आली.मात्र, या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी पागे प्रशिक्षण केंद्राचे संचालक नागेश केसरी यांच्याकडून काढून घेण्यात आली. यामुळे संतप्त झालेले केसरी शुक्रवारी सायंकाळी दीर्घ रजेवर निघून गेले. तरीही काँग्रेसचे नेते या सत्कार कार्यक्रमावर ठाम होते. या कार्यक्रमासाठी आधी केसरी यांचे नाव असलेली निमंत्रणपत्रिका छापण्यात आली. ते रजेवर गेल्यानंतर पुन्हा दुसरी निमंत्रणपत्रिका छापण्यात आली. या निमंत्रणपत्रिका आज सकाळी वितरित होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचे निर्देश दिले. त्यानंतर दुपारी हा कार्यक्रमच रद्द करण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा