पंढरीची वाट पायी चालून जात ‘सुंदर ते ध्यान उभे विठेवरी’ असणाऱ्या विठ्ठलाला भेटण्यासाठी जाण्याची परंपरा शेकडो शतकांपूर्वीची आहे. पंढरीच्या या वारीला पुढे माउली व तुकोबांच्या पालखी सोहळ्याची जोड मिळाली. त्यानंतर ‘ज्ञानोबा- तुकाराम’ असा घोष करीत टाळ-मृदंगाच्या गजरात मोठय़ा दिमाखात पंढरीच्या वाटेवर जाण्याची परंपरा निर्माण झाली. आज दोन्ही पालख्यांच्या संगतीने आठ ते दहा लाख लोक पंढरीच्या वाटेवर चालत असतात. पूर्वी ही संख्या काही हजारांवर होती. पुढे वारीतील वारकऱ्यांची संख्या वाढत गेली. त्यातील एक कारण माध्यमांतून होणारे या सोहळ्याचे चित्रण, हेही आहे. लाखो लोक मोठय़ा भक्तिभावाने वाटेवर चालत असताना माध्यमांतून त्याचे चित्रण येणे साहजिकच आहे. पण, वारीच्या वाटेवरील माध्यमांचा हा प्रवासही मोठा रंजक आहे. एसटीमधून पाठविल्या जाणाऱ्या बातम्यांपासून सध्याच्या वृत्तवाहिन्यांच्या काळात होणारे वारीचे थेट प्रक्षेपणापर्यंतच्या टप्प्याचा हा प्रवास आहे.
 वारी सुरू असताना अलीकडच्या काळात प्रत्येक वर्तमानपत्रात व वाहिन्यांवर पालख्यांचा प्रवास, त्यातील परंपरा, िरगण सोहळे, भक्तीतील तल्लीनता, वेगवेगळ्या ठिकाणी होणारे स्वागत आदी सर्व गोष्टी सविस्तरपणे लोकांच्या समोर येत आहेत. बदललेल्या तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले आहे. मात्र, अगदी दोन-अडीच दशकांपूर्वीचा काळ लक्षात घेतला तर पालखी सोहळा मार्गावर असताना त्याची बातमी तातडीने मिळण्याची यंत्रणा नव्हती. मार्गावरील गावात दूरध्वनीचे जाळे पसरले नसल्याने फॅक्स पाठविणेही शक्य नव्हते. या काळात वारीतच सहभागी झालेली काही मंडळी किंवा एखाद्या वर्तमानपत्रासाठी काम करणारे वार्ताहर वारीच्या प्रवासाबाबत लिहून पाठवित होते. हा मजकूर पोहोचविण्याचे साधन होते एसटी महामंडळाची गाडी. सकाळी किंवा दुपारी पुण्याकडे जाणारी एसटी गाठायची व त्यातील चालक किंवा वाहकाकडे लिहिलेली पाने सोपवायची. वारीच्या किंवा इतर काही बातम्या अमूक एसटीने येणार आहेत, हे वर्तमानपत्राच्या कार्यालयात माहीत असे. त्यानुसार एसटी स्थानकावर जाऊन कोणीतरी त्या बातम्यांची पाने ताब्यात घेत असे. त्यानंतर एक-दोन दिवसांनी ती बातमी छापली जायची.
 पालखीच्या मार्गावरील मोठय़ा गावांमध्ये एसटीडी बूथ व फॅक्सची व्यवस्था आल्यानंतर या यंत्रणेत आमूलाग्र बदल झाला. हा बदल होईपर्यंत वारीचे चित्रण करण्यासाठी वर्तमानपत्रातील काही मंडळी वारीत सहभागी होऊ लागली. वारकऱ्यांसोबत राहून वारीचाच एक भाग होत व वारकऱ्यांच्याच राहुटय़ांमध्ये निवास करून वारीचे चित्रण होऊ लागले. याच काळात मार्गावर काही ठिकाणी ई-मेलची सुविधा सुरू झाल्याने विविध प्रसंगांचे फोटोही पाठविणे शक्य होऊ लागले. मेल व फॅक्सची सुविधा लक्षात घेऊन पालखी मुक्कामाच्या पुढच्या किंवा मागच्या गावी मुक्काम करून वेळेत मजकूर व छायाचित्र पाठविण्याबाबत माध्यमातील मंडळींचेही एक वेळापत्रक निर्माण झाले. त्यानंतर वारीच्या दैनंदिन बातम्या झळकू लागल्या. एव्हाना माध्यमांमध्ये मराठी वृत्तवाहिन्यांचा प्रवेश झाला होता. भक्तीच्या सोहळ्याकडे या माध्यमाचेही लक्ष गेले. सुरुवातीला वारीची एखादी बातमी दूरचित्रवाहिनीवर दिसू लागली. लाखो लोकांचा हा भक्तिमेळा व त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता आता वारीचे थेट प्रक्षेपणही होऊ लागले.
वारीला गेलेला वारकरी घरी सुखरूप आल्यानंतरच त्याची खबर मिळत होती, असा एक काळ होता. मात्र सध्या विविध माध्यमांमधून रोजच पालखीची दैनंदिन वाटचाल लोकांसमोर येत आहे. त्यामुळे वारीला गेलेल्या जीवलगांची वाटचाल कुणाला न विचारताही लाखो लोकांना कळत असते. त्यामुळे वारीच्या वाटेवर माध्यमांच्या या प्रवासालाही महत्त्व आहेच.

Story img Loader