शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार मंगळवारी पार पडल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सरकारमधील सहभागी मित्रपक्ष आणि अपक्षांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. ज्या अपक्षांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही, ते नाराज असल्याचं सांगितलं जात असतानाच ‘प्रहार’ संघटनेचे बच्चू कडू यांनी सूचक शब्दांत अप्रत्यक्षपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. मात्र, युतीमध्ये कुणीही नाराज नसून पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये सर्वांना समावून घेतलं जाईल, असं सरकारमधील मंत्री सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर नेमका पुढचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? याविषयी तर्क-वितर्क लावले जात असतानाच सरकारमधील मंत्र्यांकडूनच यासंदर्भात सूतोवाच करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य मंत्रीमंडळ विस्तारानंतर आज एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपाचे ९ तर शिंदे गटाच्या ९ आमदारांचा समावेश आहे. मात्र, या विस्तारामध्ये युतीमधील इतर अपक्ष आणि मित्रपक्षांना सहभागी करून घेण्यात आलं नसल्यामुळे नाराजीची चर्चा सुरू झाली होती. त्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी अपक्ष आणि मित्रपक्षांना पहिल्या विस्तारात सहभागी करून घेतलं जाईल, अशी अपेक्षा होती, असं म्हटलं आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुढचा मंत्रीमंडळ विस्तार!

“बच्चू कडू स्वत:साठी कधीच नाराज होणार नाही. पण दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी नाराज झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला सांगितलं आहे की सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुढचा मंत्रीमंडळ विस्तार होईल. तेव्हा तुम्हाला संधी देऊ”, असंही बच्चू कडू म्हणाले होते.

सत्ताकारण : महाराष्ट्रात ‘शतप्रतिशत’चा भाजपाचा प्रयत्न, शिंदे गटाशी युती करून डोळे २०२४च्या निवडणुकीवर!

दरम्यान, या सर्व चर्चांवर आज मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उदय सामंत यांनी पुढील मंत्रीमंडळ विस्तारामध्ये सर्वांना सहभागी करून घेतलं जाईल, असं म्हटलं आहे.

“अधिवेशनानंतर तात्काळ मंत्रीमंडळ विस्तार”

“आज फक्त १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ४२ पैकी १८ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर उरलेल्या मंत्रीपदांवर सगळ्यांना प्रतिनिधित्व दिलं जाणार आहे. ज्या शंका सध्या निर्माण केल्या जात आहेत, त्या प्रत्येक शंकेचं निरसन त्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये होईल. हा मंत्रीमंडळ विस्तार अधिवेशनानंतर तात्काळ होईल”, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

येत्या १७ ऑगस्टपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्यानंतर होणारा मंत्रीमंडळ विस्तार बच्चू कडू यांनी सांगितल्याप्रमाणे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.