काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच व्हावा, यासाठी तुळजाभवानी समोर नवस बोलला होता. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन, असं त्यांनी म्हटलं होतं.

यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच होणार, असं त्यांनी म्हटलं आहे.

त्यांनी आपल्या विधानात म्हटलं की, “सध्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही शिवसेनेच्या माननीय मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. राज्यात उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. पण ज्या-ज्या वेळी पक्ष वाढीच्या संदर्भात चर्चा होते. तेव्हा आम्हाला आमचा पक्ष पहिल्या क्रमांकाचा पक्ष कसा होईल, यासाठी विचार करावा लागतो. राष्ट्रवादी पक्ष पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला तर पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा असेन, असं त्यांनी म्हटलं आहे. ते बीडमध्ये बोलत होते.

खरंतर, शिवसेनेनं भाजपासोबतच्या युतीमधून बाहेर पडत महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी पुढील पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असं ठरलं होतं. असं असताना पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार, असा दावा महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष राष्ट्रवादीकडून केला जात आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरघोड्या होत असल्याची चर्चा रंगत आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे. त्यांनी म्हटलं की, ‘आशा ठेवण्यात काहीच गैर नाही काही जणांना दिवसा देखील स्वप्न पडतात.’

Story img Loader