काँग्रेसचे नेते नारायण राणे, खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या मुहूर्ताची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच लवकरच मोठा ‘राजकीय भूकंप’ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील १२ ते १६ खासदार भाजपच्या गळाला लागले असल्याचा दावा राज्यातील भाजप नेत्यांनी केला आहे. त्यातील अनेक खासदारांची भाजपच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने या संबंधीचे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. देशात ३५० हून अधिक खासदार निवडून आणण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. ‘भाजपमध्ये आपले स्वागत आहे’ असे खुले निमंत्रणही भाजपच्या नेत्यांकडून इतर पक्षांच्या खासदारांना दिले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप नेते चर्चेतील नेत्यांचे अधून-मधून ‘स्वागत’ही करताना दिसत आहेत. ‘घुसमट’ होत असलेल्या इतर पक्षांच्या नेत्यांसाठी भाजपचे दरवाजे नेहमीच खुले आहेत, असे एका भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.

पक्ष किंवा नेतृत्वावर जे लोक नाखूश आहेत. ज्यांना भाजपत प्रवेश करण्याची इच्छा आहे त्यांचे स्वागतच आहे. त्यांच्यासाठी भाजपची दारे खुली आहेत, असे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे, असेही ते म्हणाले. राज्यातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून त्यांच्यात एक बैठकही झाल्याचे वृत्त नुकतेच इंडियन एक्स्प्रेसने दिले होते. त्यामुळे भंडारी यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

राज्यातील इतर पक्षांच्या जवळपास १५ आमदारांची भाजपशी बोलणी सुरू आहेत, असा दावा पक्षाचे सरचिटणीस आणि पिंपरी-चिंचवडचे नेते सारंग कामटेकर यांनी केला आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहेत, असेही ते म्हणाले. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांचे १२ ते १६ खासदार भाजपच्या गळाला लागल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नसेल, असे राजकीय विश्लेषक माधव सहस्रबुद्धे यांनी म्हटले आहे. राज्यातील ४८ पैकी ३५ जागांवर शिवसेना उमेदवार उभे करण्यात येतील, असे नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यात युती झाल्यास २५ पेक्षा जास्त जागा शिवसेनेसाठी सोडणार नसल्याचे भाजपचे म्हणणे आहे, असेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Next lok sabha elections 2019 mode maharashtra bjp eyeing 12 to 16 mps shiv sena ncp