मराठी रंगभूमीच्या विकासासाठी धोरणात्मक बदल करून धाडसी निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करीत आगामी नाटय़संमेलन सीमावर्ती भागामध्ये बेळगावला घ्यावे, अशी सूचना भाषा विकास विभागाचे राज्यमंत्री उदय सामंत यांनी रविवारी नाटय़ परिषदेला केली. सीमा भागातील भाषासंवर्धनासाठी असलेला निधी या संमेलनाला देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
९४व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. जलसंपदामंत्री सुनील तटकरे, पालकमंत्री दिलीप सोपल, संमेलनाध्यक्ष अरुण काकडे, आमदार गणपतराव देशमुख, लक्ष्मण ढोबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सीमा भागातील मराठी भाषकांना नाटय़ परिषद त्यांच्या पाठीशी नव्हेतर त्यांच्याबरोबर असल्याचा दिलासा देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आगामी संमेलन बेळगावला घेतले जावे, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. अर्थात, राज्य सरकारचा मंत्री किंवा नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाचा सदस्य म्हणून नव्हेतर वैयक्तिक स्वरूपाचे हे मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सामंत यांची ही सूचना सुनील तटकरे, दिलीप सोपल आणि लक्ष्मण ढोबळे या आजी- माजी मंत्र्यांनी उचलून धरली.
संगीत नाटकांनी मराठी रसिकांचा कान तयार केला. ऐतिहासिक नाटकांनी गारुड निर्माण केले. आता नव्या पिढीच्या प्रेक्षकांसाठी नवीन नाटकांच्या निर्मितीचे आव्हान नाटय़ परिषदेने आपल्या खांद्यावर पेलावे, अशी अपेक्षा सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. नाटय़संमेलनाला अधिकाधिक रंगकर्मी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

Story img Loader