जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ४० हजार ८६७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. शेतकरी हवालदिल झाला. मात्र, सरकारकडून अजून तरी म्हणावी अशी दखल न घेतल्याने नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याच्या मागणीसाठी पुढाऱ्यांसह विविध संघटना सरसावल्या आहेत. अनेकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.
सरकारने केलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्य़ात ४० हजार ८६७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यातील ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक पीकनुकसानीचे क्षेत्र २५ हजार ५६७ हेक्टरचे आहे. गहू, हरभरा, ज्वारी पिकांचा घास हातातोंडाशी आला असताना अवकाळीसह गारपिटीच्या संपूर्ण पिकांची माती केली. अनेक गावांत घरांची पडझड झाली. घरावरील टिनपत्रे उडून गेल्याने संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्याचे नुकसान झाले, जिल्ह्यात ३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. अनेक जनावरे दगावली. सुरुवातीला अतिवृष्टीने खरीप पीक वाहून गेले. लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस पिकाला फटका बसला. रब्बी पिकांच्या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांना गारपिटीचा तडाखा बसला. आता घरात येण्यासारखे शेतात काही उरले नसल्याने कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला मायबाप सरकारच्या मदतीची आत्यंतिक गरज असल्याचे चित्र दिसत आहे.
खासदार सुभाष वानखेडे, तसेच आमदार भाऊ पाटील गोरेगावकर व राजीव सातव यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आमदारांनी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी साकडे घातले. प्रशासनाने पीकनुकसानीचे पंचनामे करून सरकारला अहवाल पाठविला. भाकपचे जिल्हा सविच अंकुशराव बुधवंत, भ्रष्टाचार निर्मूलन संस्था, भाजप जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, मनसे जिल्हाध्यक्ष बंडू कुटे यांच्यासह विविध संघटनांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.

Story img Loader