ताडोबात सफारी करताना वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाच व्याघ्र प्रकल्पाच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. देश-विदेशातून पर्यटक घेऊन येणाऱ्या या संस्थांचे पदाधिकारी, सदस्य व पर्यटक जिप्सीने सफारी करताना वाघ, बिबटय़ा तसेच वन्य प्राण्यांच्या अगदी तोंडाजवळ जाऊन छायाचित्रे काढीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
चंद्रपूरपासून ४५ किलोमीटरवर पट्टेदार वाघांसाठी देश विदेशात प्रसिध्द असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वसलेला आहे. ६२५.०४ चौरस  किलोमीटर क्षेत्रात पसरलेला हा विस्तीर्ण व्याघ्र प्रकल्प म्हणजे मध्य भारतातील निसर्ग, घनदाट अरण्य आणि वन्यजीवांचे अव्दितीय आश्रयस्थळ आहे. त्यामुळेच ताडोबा देशातील पर्यटकांसोबतच विदेशी पर्यटकांच्या मुख्य आकर्षणाचे केंद्र बनलेला आहे. दरवर्षी सव्वा ते दीड लाख पर्यटक ताडोबा प्रकल्पाला भेट देतात. देशविदेशातून येणाऱ्या या पर्यटकांना ताडोबाच्या कानाकोपऱ्याची माहिती व्हावी यासाठी वन विभागाचे दीडशे गाइड सक्रिय आहेत. त्यासोबतच ताडोबात वन्यजीव अभ्यासक व प्रेमी म्हणून काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थासुध्दा सक्रिय आहेत. यातील काही स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी देश विदेशातील पर्यटकांना ताडोबात पर्यटनासाठी घेऊन येतात. त्यांच्या राहण्याची, जेवण व सफारीची व्यवस्था याच स्वयंसेवी संस्थांकडून केली जाते.
एकप्रकारे या संस्थांनी वाईल्ड लाईफ टुरिझम सुरू केले असून, त्यासाठी पर्यटकांकडून शुल्काच्या स्वरूपात मोठी रक्कम घेतली जाते, मात्र याच संस्थांकडून व्याघ्र प्रकल्पांचे नियम अक्षरश: धाब्यावर बसविले जात असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. जिप्सीतून बाहेर डोकावणे, वाघाच्या तोंडाजवळ तोंड नेणे, कॅमेरा घेऊन जाणे असे प्रताप केले जातात. व्याघ्र प्रकल्पात जिप्सीतून खाली उतरणे वन कायद्याने गुन्हा आहे, परंतु पर्यटक सर्रास जिप्सीतून खाली उतरत असल्याचे दिसून आले आहे. सध्या ताडोबा प्रकल्प बंद असून, केवळ दहा जिप्सी नियमित सोडण्यात येत आहे. या कालावधीतही नियमांचे अशाच प्रकारे उल्लंघन सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. ताडोबात काही स्वसंसेवी संस्था कार्यरत आहेत.
यातील काही जणांनी रिसोर्ट थाटले असून, देशविदेशातील पर्यटकांना ताडोबात घेऊन येतात. अशा गर्भश्रीमंत पर्यटकांसाठी मग नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. ताडोबात वाघांचे वास्तव्य असलेले काही पाणवठे व स्थळांवर जिप्सीला बंदी घालण्यात आली आहेत. काही महत्त्वपूर्ण रस्ते सुध्दा बंद करण्यात आलेले आहेत. या स्वयंसेवी संस्था बंद रस्त्याने पर्यटकांना घेऊन जात असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. यात नागपूर येथील तीन ते चार संस्था आघाडीवर असल्याची माहिती एका वनाधिकाऱ्याने दिली.
एखाद्या पर्यटकाने वाघाच्या अगदी जवळ जावून छायाचित्र काढले आणि अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या कामात काही ठराविक गाईड व जिप्सी चालकांचा पुढाकार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्याची सूचना
या वर्षीच्या उन्हाळय़ात जिप्सी चालक व पर्यटकांनी एका वाघाला चारही बाजूने घेरले होते. हे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित करताच या जिप्सी चालक व गाईडला तात्काळ निलंबित करण्यात आले होते. केवळ निलंबनाने हा प्रश्न सुटणार नाही तर ताडोबा, मोहुर्ली व कोळसा या तीन क्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवावे, अशी सूचना समोर आली आहे. दरम्यान, अशा जिप्सी चालकांना ताडोबात कायम बंदी करावी ,अशीही सूचना वन्यजीव प्रेमींनी केली आहे. काही स्वयंसेवी संस्थांनी वन्यजीव हा व्यवसाय म्हणून स्वीकारला असून त्यांच्याकडूनच अशाप्रकारच्या घटना नियमित होत असल्याचे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा