नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL)ने शुक्रवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे भूमिगत स्टेशन बांधण्याच्या उद्देशाने मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल सर्किटसाठी निविदा मागवल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरवरील हे एकमेव भूमिगत स्टेशन असेल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच निविदा निघाली आहे. मागील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात थंडबस्त्यात पडलेल्या या प्रकल्पाला नव्या सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे.
हेही वाचा – सलमान खानने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, धमकीच्या पत्रानंतर केली शस्त्रपरवान्याची मागणी
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट केले की, “मुंबई भूमिगत स्थानक आणि बुलेट ट्रेनसाठी बोगद्याच्या डिझाइन आणि बांधकामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.” NHSRCL ही बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी एजन्सी आहे, ज्या अंतर्गत अहमदाबाद आणि मुंबई दरम्यानच्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरवर ट्रेन ३२० किमी प्रतितास वेगाने धावतील. ही ट्रेन ५०८ किमी अंतर कापणार असून तिच्या मार्गावर १२ स्थानके असतील. रेल्वेने दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सध्याच्या सहा तासांवरून तीन तासांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.
बुटेट ट्रेन प्रकल्पाची एकूण किंमत १.०८ लाख कोटी रुपये आहे आणि शेअरहोल्डिंग फ्रेमवर्कनुसार, NHSRCL ला केंद्र सरकारकडून १० हजार कोटी रुपये, तर गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना प्रत्येकी पाच हजार कोटी रुपये द्यायचे आहेत. उर्वरित रक्कम जपानकडून ०.१ टक्के व्याजाने भरायची आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत फुकाहोरी यासुकाता यांची भेट घेतली. जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) द्वारे अर्थसहाय्यित बुलेट ट्रेनसारख्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्याचे आश्वासन त्यांनी वेळी दिले.