पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पीएफआयच्या (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. संबंधित घोषणाबाजीप्रकरणी सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. या घडामोडी सुरू असताना राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच एनआयएने सोमवारी मध्यरात्री महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे.
एनआयएने रविवारी मध्यरात्री महाराष्ट्रासोबत ८ राज्यांतील सुमारे २५ ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये १३ ते १४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून १३ ते १४ संशयित पीएफआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. तर सोलापुरातून एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समजत आहे. ही कारवाई रात्रभर सुरू होती. याबाबतचं वृत्त ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने दिलं आहे.
या कारवाईत एनआयएकडून २४ ठिकाणी संपूर्णपणे शोधमोहीम राबवली आहे. तर सोलापुरातून एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. औरंगाबादमध्ये यापूर्वीही कारवाई झाली होती. येथून ४ जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री पुन्हा १३ ते १४ ठिकाणी छापेमारी करून १३ ते १४ जणांना ताब्यात घेतलं आहे. संबंधित सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे ईडी आणि एनआयएकडून आतापर्यंत देशभरातून १०६ पीएफआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्रासह केरळ, मणीपूर आणि राजस्थान या राज्यांमध्ये पीएफआय कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड करण्यात आली आहे.