पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या उपसचिव पदावर कार्यरत असणाऱ्या निधी चौधरी यांची रायगड जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या २०१२ पासून त्या भारतीय प्रशासकीय सेवत कार्यरत आहेत.
राजस्थानमधील नागौर जिल्ह्याच्या रहिवाशी असणाऱ्या निधी चौधरी यांनी आपले उच्च शिक्षण जयपूर येथे पूर्ण केले आहे. लोक प्रशासन या विषयात त्यांनी पिएचडी प्राप्त केली आहे. प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी काही काळ रिझर्व्ह बँकेतही कार्यरत होत्या. २०१२ साली त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यांना महाराष्ट्रात नियुक्ती देण्यात आली.
प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यावर परिविक्षण कालावधीत त्यांनी काही काळ उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले रायगड जिल्ह्यातील पेण येथे त्या १ सप्टेंबर २०१४ ते ३० एप्रिल २०१६ या कालावधीत प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होत्या. मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पट्ट्यातील भुसंपादनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. भुसंपादनात येणारी अनेक बांधकामे त्यांनी धडक कारवाई करून जमिनदोस्त केली होती. हि कारवाई त्यावेळी चांगलीच गाजली होती.
यानंतर पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर पालिकेच्या उपआयुक्त म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले होते. यानंतर त्यांची पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात उपायुक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. बुधवारी त्यांनी रायगड जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारला.