राहाता : शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ३० मार्चपासुन रात्रीची विमानसेवा (नाईट लॅंडीग) सुरु होणार आहे.रविवारी ३० मार्चला रात्री ९ वाजुन ५० मिनीटांनी शिर्डी विमानतळावरुन हैदराबादकडे विमान उड्डाण करेल व या विमानतळावरुन नाईट लॅंडीगची अधिकृत सुरुवात होईल.नाईट लॅंडीगने शिर्डी विमानतळाच्या प्रगतीत भर पडेल.
शिर्डी विमानतळ प्रशासनाकडुन नाईट लॅंडीगची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नसली तरी ऑनलाईन बुकींगमध्ये दोन दिवसापासुन या विमानतळावरुन रात्रीची हैदराबाद विमानसेवेची बुकींग सुरु झाली आहे.त्यामुळे या विमानतळावरुन मार्च अखेरीस रात्रीची विमानसेवा सुरु होईल हे नक्की.गेल्या आठ वर्षापासुन नाईट लॅंडीगची साईभक्तांना प्रतिक्षा होती.नाईट लॅंडीग सुरु झाल्यानंतर या विमानतळाच्या विकासात नविन पाऊल ठरणार आहे.अनेक वेळेस नाईट लॅंडीगची घोषणा झाली मात्र प्रत्यक्षात सुरुवात झालीच नाही.
शिर्डी विमानतळ हे सुरु झाल्यापासुन प्रवाशांच्या सर्वाधिक पंसतीला उतरलेले विमानतळ आहे.सध्या या विमातळावरुन दिवसा ८ विमाने येतात तर ८ विमाने जातात अशा १६ फे-या या विमानतळावरुन सुरु आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने नाईट ल्रॅंडीगसाठी आवश्यक असलेले सर्व कामे पुर्ण करत केंद्राकडे परवानगी मागीतली होती.
केंद्राच्या नागरी विमान वाहतुक महासंचालनालयाने फेब्रवारी २३ मध्ये नाईट लॅंडीगला परवानगी दिली.त्यांनतर एप्रिल २३ मध्ये दिल्लीहून आलेल्या इंडीगो एअरलाइन्सचे पहिल्या रात्रीच्या विमानाची यशस्वी चाचणी झाली आणी या विमानतळाच्या विस्ताराचे आणि परिसराच्या प्रगतीचे एक नवे दालन खुले झाले.यशस्वी चाचणी नंतर दोन वर्षाने ही सेवा सुरु होत आहे.
नाईट लँडिंग सुरु झाल्यानंतर साईबाबांच्या पहाटेच्या काकडआरतीला उपस्थित राहू इच्छिणार्यांना रात्री प्रवास करुन येता येणार आहे. एकूणच भाविकांना मोठ्या सुविधा यामुळे निर्माण होणार आहेत. रात्रीच्या विमानसेवेमुळे या परिसराच्या विकासाला सुद्धा गती प्राप्त होणार आहे. शिर्डीत भाविकांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ यामुळे अपेक्षित असून, त्यामुळे स्थानिक अर्थकारणाला गती प्राप्त होईल.तुलनेने रात्रीचे भाडे कमी असल्याने साईभक्तांना हि सेवा उपयुक्त ठरणार आहे.
रात्रीच्या विमानसेवेसाठी आवश्यक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) जवानांची फौज विमानतळाकडे केंद्राने उपलब्ध करुन दिली आहे. एअर ट्रॅफीक कंट्रोलसाठी गरजेचे असलेला कर्मचारी वर्ग अजुन आलेला नाही मात्र ते लवकरच उपलब्ध होईल अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.