Shirdi airport Night landing : शिर्डी विमानतळावर रविवारी (३० मार्च) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘नाईट लँडिंग’ सेवेची सुरुवात झाली असून यामुळे शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे भाविक अथवा कामानिमित्त शिर्डीवरून ये-जा करणारे आता कोणत्याही वेळी प्रवास करू शकतात. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सेवा सुरू झाल्यामुळे शिर्डी व परिसरातील औद्योगिक विकासालाही चालना मिळू शकते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती देत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून म्हटलं आहे की “गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीने (एमएडीसी) हैदराबादहून आलेल्या इंडिगो विमानाचं स्वागत केलं. हैदराबादहून सुटलेलं इंडिगो विमान रात्री ९.३१ वाजता शिर्डीच्या विमानतळावर उतरलं. यावेळी एमएडीसीने विमानातील प्रवाशांचं स्वागत केलं. हे नाइट लँडिंग महाराष्ट्राच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रवाशांसाठी सोयी आणि जगभरातील श्री साई बाबा भक्तांसाठी कनेक्टिव्हिटी वाढवणारी ही घटना आहे.

अहिल्यानगर व आसपासच्या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा टप्पा : मुरलीधर मोहोळ

केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील याबाबत एक पोस्ट करून माहिती दिली आहे. मोहोळ यांनी एक्सवर म्हटलं आहे की “शिर्डी विमानतळावर आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘नाईट लँडिंग’ सेवेचा प्रारंभ झाला असून यामुळे शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. शिवाय शिर्डी आणि परिसरातील औद्योगिक विकासालाही चालना मिळणार असून याचाच सकारात्मक परिणाम या भागाच्या अर्थकारणावर देखील होणार आहे. त्यामुळे शिर्डी विमानतळावरील ‘नाईट लॅंडिंग’ सुरू होणे, हा केवळ शिर्डीसाठीच नाही तर अहिल्यानगर आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठीही एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार नाईट लँडिंग सुरु करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरु केली होती.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “नाईट लॅडिंग सुविधा सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एटीसी अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोल संदर्भातील सर्व परवानग्या, सीआयएसएफ जवानांची पूर्तता तसेच धावपट्टीचे रिकार्पेटिंग याचा आढावा प्रत्यक्ष शिर्डी विमानतळावर बैठक घेऊन घेतला होता. शिवाय संबंधित विभागांना काम वेळेत पूर्ण करण्यासंदर्भातही सूचित केले होते. शिवाय ३१ मार्च २०२५ पूर्वी ‘नाईट लँडिंग’ सुरू करावे, या संदर्भातही सविस्तर चर्चा अधिकाऱ्यांसमवेत झाली होती आणि आज नियोजित तारखेच्या एक दिवस आधीच ही सेवा सुरू करण्यात यश आले आहे.

नाशिक कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमातळ केंद्रबिंदू ठरेल, असं माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे.