लोकसत्ता वार्ताहर
राहाता : दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी रात्री ३० मार्चपासुन नाईट लँडिंग सुरु झाली असून हैदराबादवरुन इंडीगो एअरलाईनचे विमान ५६ प्रवाशांना घेऊन रात्री साडेनऊ वाजता शिर्डी विमानतळावर उतरले. तर रात्री ९ वाजून ५० मिनीटाने शिर्डी विमानतळावरुन हैदराबादकडे ७५ प्रवाशी घेऊन विमानाने उड्डाण केले. दोन वर्षीच्या प्रतीक्षेनंतर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रात्रीची विमानसेवा (नाइट लॉंडिंग) सुरु झाल्याने या विमानतळाने आणखी एक प्रगतीचे पाऊस टाकले आहे.
या विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचे माजी खा डॉ सुजय विखे व आधिकाऱ्यांनी केक कापत एकमेकाला केक भरवत स्वागत केले आहे.यावेळी शिर्डी विमानतळाचे संचालक कृष्णा पॉल व विमानतळाचे अधिकारी उपस्थित होते.विमानतळ प्रशासनाने रात्रीच्या विमानाने येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुग्यांची सजावट केली होती. हैदराबाद वरुन रविवारी ७ वाजुन ५५ मिनीटाने ५६ प्रवासी घेऊन इंडीगोचे ६ ई ७०३८ हे विमान शिर्डी विमानतळावर ९ वाजून ३० मिनीटाने पोहचले. शिर्डी विमानतळावरुन ९ वाजून ५० मिनीटाने ७५ प्रवाशी घेऊन इंडीगोचे ६ ई ७०३९ हे विमान रात्री ११ वाजुन २५ मिनीटाने हैदराबादला पोहचले.
गेल्या आठ वर्षांपासून नाइट लॉंडिंगची साईभक्तांना प्रतिक्षा होती.नाइट लँडिंग सुरू झाल्यामुळे या विमानतळाच्या विकासात नवीन पाऊल ठरणार आहे. अनेक वेळेस नाइट लॉंडिंगची घोषणा झाली होती. मात्र प्रत्यक्षात सुरुवात झालीच नव्हती. शिर्डी विमानतळ हे सुरु झाल्यापासुन प्रवाशांच्या सर्वाधिक पंसतीला उतरलेले विमानतळ आहे.सध्या या विमातळावरुन दिवसा ८ विमाने येतात तर ८ विमाने जातात अशा १६ फेऱ्या या विमानतळावरुन सुरु आहे..महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने नाईट लँडिंगसाठी आवश्यक असलेले सर्व कामे पुर्ण करत केंद्राकडे परवानगी मागीतली होती. केंद्राच्या नागरी विमान वाहुतुक महासंचालनालयाने फेब्रवारी २३ मध्ये नाईट लँडिंगला परवानगी दिली.त्यांनतर एप्रिल २३ मध्ये दिल्लीहून आलेल्या इंडीगो एअरलाइन्सचे पहिल्या रात्रीच्या विमानाची यशस्वी चाचणी झाली आणी या विमानतळाच्या विस्ताराचे आणि परिसराच्या प्रगतीचे एक नवे दालन खुले झाले होते.यशस्वी चाचणी नंतर दोन वर्षाने ही सेवा सुरु झाली आहे.
नाईट लँडिंग सुरु झाल्यानंतर साईबाबांच्या काकडआरतीला उपस्थित राहू इच्छिणार्यांना रात्री प्रवास करुन येता येणार आहे. एकूणच भाविकांना मोठ्या सुविधा यामुळे निर्माण होणार आहेत. रात्रीच्या विमानसेवेमुळे या परिसराच्या विकासाला सुद्धा गती प्राप्त होणार आहे. शिर्डीत भाविकांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ यामुळे अपेक्षित आहे. सुरुवात हैदराबाद विमानसेवेने झाली असली तरी भविष्यात इतर ठिकाणीही रात्रीची विमानसेवा सुरु होईल.
नाईट लँडिंग सेवा सुरू झाल्यानंतर विमानतळावर माध्यमांशी बोलताना माजी.खा. डॉ. सुजय विखे म्हणाले की, नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असल्यामुळे शिर्डी विमानतळ संपूर्ण विमान उद्योगाचे केंद्र बनेल असा आमचा प्रयत्न आहे. तसेच नवीन विमानतळ लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. शिर्डी विमानतळ ५०० कोटी रुपये खर्चून नव्याने बांधले जाणार असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल. या विमानतळावर किमान चार ते पाच एरो ब्रिजची सुविधा असेल. आमचा प्रयत्न आहे. हे नवीन विमानतळ २०२७ पूर्वी पूर्ण होईलAज्यामुळे नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होईल. या संदर्भात पुढील आठवड्यात आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली हे विमानतळ दोन वर्षांत पूर्ण करू, असा विश्वासही विखे यांनी व्यक्त केला.