अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे सुजय विखे पाटील यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते निलेश लंके लोकसभेच्या मैदानात आहेत. दोन्ही उमेदवारांकडून सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. ‘निलेश लंके यांनी पाठांतर करुन माझ्यासारखे फाडफाड इंग्रजी बोलावे, आपण उमेदवारी मागे घेऊ, असे आव्हान सुजय विखे पाटील यांनी दिले होते. त्यानंतर आता निलेश लंके यांनी सुजय विखे यांना टोला लगावला आहे. ‘विखे फक्त बोलतात, पण मी जे बोलतो तेच करतो’ , असे निलेश लंके म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निलेश लंके काय म्हणाले?

“स्वाभिमान जनसंवाद यात्रेला सर्व तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. वाड्या-वस्तीवरदेखील या जनसंवाद यात्रेचे जोरदार स्वागत होत आहे. मी निवडणुकीला सामोरे जात असताना त्या भागातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करत असतो. कोणत्या परिसरात काय अडचण आहे. हा लोकसभेचा मतदारसंघ ७५ टक्के दुष्काळी पट्टा आहे. या भागात बेरोजगारी, दुध व्यवसायाच्या प्रश्नासह अनेक प्रश्न आहेत. मी जर निवडून आलो तर पारनेर, कर्जत-जामखेड आणि श्रीगोंद्याला पॅनलचे पाणी कधी कमी पडू देणार नाही”, असे निलेश लंके म्हणाले.

हेही वाचा : “मोदी हे महायुतीचं इंजिन, तर राहुल गांधींच्या ट्रेनचं…”; देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाणा

निलेश लंके म्हणाले, “सुजय विखे फक्त बोलतात, पण मी जे बोलतो तेच करतो. आमदारकीच्या कार्यकाळात पारनेर मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली. त्यामुळे आगामी काळातदेखील येथील प्रश्न सोडविण्याचे काम केले जाईल. साकळाई योजनेचाही पाठपुरावा केला होता. परंतु मधल्या काळात सत्तांतर झाल्याने कामे ठप्प झाले होते. आता हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेण्याचे काम केले जाईल”, असे आश्वासन निलेश लंके यांनी दिले.

दरम्यान, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी काही दिवसांपूर्वी निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh lanke on sujay vikhe patil ahmednagar south lok sabha constituency politics gkt