नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपा उमेदवार सुजय विखे यांचा २८ हजार मतांनी पराभव केला. अहमदनगरची निवडणूक देशभर चर्चेचा विषय बनली होती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, माजी खासदार सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची टीका केली होती. तसेच त्यांच्या शिक्षणावरूनही टीका केली होती. “निलेश लंके यांनी माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवल्यास मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार नाही”, असं आव्हानही सुजय विखे पाटील यांनी दिलं होतं. लंके यांनी प्रचारकळात विखेंच्या टीकेला जशास तसं प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच लंके यांनी आता पुन्हा एकदा विखेंवर कुरघोडी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी (१० जून) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात निलेश लंके यांनी दमदार भाषण केलं. तसेच या भाषणाची सुरुवात इंग्रजी वाक्याने केली. निलेश लंके या भाषणावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांबाबत म्हणाले, “सर्वांनी एक गोष्ट ध्यानात ठेवायची… Pawar is the Power… सगळ्यांचा नाद करायचा, पण पावारांचा नाद केला तर ते भल्याभल्याना घरी बसवतात. शरद पवार हे आम्हा सर्वांचं दैवत आहे.”

निलेश लंके म्हणाले, “लोकसभा तो बस ट्रेलर हैं, विधानसभा अभी बाकी हैं, शरद पवार यांनी चेंडू टाकला की समोरच्यांचा त्रिफळा उडतो. त्यामुळे नाद करायचा, पण शरद पवारांचा नाद करायचा नाही, पवारांचा नाद करून भले भले थकले, कारण पवार इज दी पॉवर.” भाषणातील या इंग्रजी वाक्यासह लंके यांनी थेट सुजय विखेंवर निशाणा साधला. यावेळी राष्ट्रवादीच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सुजय विखे यांनी निलेश लंके यांची इंग्रजी भाषेवरून खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता. विखे म्हणाले होते की, “संसदेत जायचं असेल तर माझ्यासारखं इंग्रजीत बोलता आलं पाहिजे.”

हे ही वाचा >> लोकसभेच्या निकालानंतर ठाकरे-भाजपाचं मनोमिलन? चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे तर्कवितर्कांना उधाण

शरद पवारांकडून लंकेंचं कौतुक

दरम्यान, या मेळाव्यात शरद पवार यांनीदेखील भाषण केलं. या भाषणावेळी पवारांनी निलेश लंके यांचं कौतुक केलं. पवार म्हणाले, “आपले निलेश लंके प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत. ते आता लोकसभेत जात आहेत. मात्र, मला एका गोष्टीची काळजी वाटते की निलेश लंके संसदेत गेल्यावर त्यांच्याबरोबर असलेल्या संसदेतील आपल्या जुन्या सदस्यांना तिथले लोक विचारतील की हा कोण गडी या ठिकाणी आणला? मात्र आपले हे खासदार लोकसभेतही जोरदार भाषण करतील यात शंका नाही. मी निलेश लंके यांना सांगितलं आहे की संसदेत मराठीतही भाषण करता येतं. निवडणुकीच्या काळात कुणीतरी म्हटलं इंग्रजीत का बोलत नाही? त्या टीकाकारांना मला सांगायचं आहे की इंग्रजी बोलायची काही अडचण नाही. परंतु, संसदेत हिंदीत किंवा आपली मातृभाषा मराठीतही बोलता येतं.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh lanke slams sujay vikhe patil with english phrase in speech ncp meeting asc
Show comments