नगर परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी नीलेश पटेल, तर उपाध्यक्षपदी भारती जगताप यांची बिनविरोध निवड झाली. बुधवारी दुपारी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित सभेत दोन्ही पदांसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड अविरोध झाली. माजी नगराध्यक्ष राजश्री पहिलवान, उपनगराध्यक्षा भारती येवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा दिला होता. त्या पाश्र्वभूमीवर अध्यक्षपदासाठी पटेल यांना उमेदवारी देण्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सुचविले होते. नगर परिषदेत एकूण २३ नगरसेवकांपैकी १६ राष्ट्रवादी, काँग्रेस १, अपक्ष २, भाजप ३, सेना १ असे पक्षीय बलाबल आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष मिळून १९ संख्याबळ आहे. नवीन सदस्याला काम करण्याची संधी देण्याचे सूतोवाच भुजबळ यांनी केले. त्यानुसार पाच वर्षांपैकी सुरुवातीची अडीच वर्षे सर्वसाधारण गटासाठी, तर नंतरची ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यानुसार दहा महिन्यांचा कार्यकाल झाल्यानंतर सर्वसाधारणमधून पटेल, तर उपाध्यक्षपदी अनुसूचित संवर्गातील जगताप यांची निवड झाली.