राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांची अटक आणि त्यांचा कुख्यात गुंड दाऊद ईब्राहिमशी जोडला जाणारा संबंध यामुळे मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शरद पवार हेच दाऊदचा माणूस आहेत, असा संशय येतोय असं निलेश राणे यांनी म्हटलंय. राणे यांच्या या आरोपानंतर आता वेगळा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पवार साहेबच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस आहेत
निलेश राणे यांनी केलेल्या आरोपाचे वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले असून या वृत्तानुसार “मला संशय येतोय की पवार साहेबच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस आहेत. अनिल देशमुख यांनी काय केलं होतं ? त्यांचा राजीनामा कसा झटपट घेतला होता. तेव्हा विचार केला होता का ? मग नवाब मलिक कोण आहेत. नवाब मलिक शरद पवार यांचे कोण लागतात ? ज्यांनी व्यवहार केला. ज्यांनी दाऊदच्या बहिणीला पैसे दिले. दाऊदच्या माणसाला पैसे दिले. बॉम्बस्फोटातील आरोपीला पैसे दिले, त्यांचा राजीनामा घेतला जात नाही,” असं निलेश राणे यांनी म्हटलंय.
मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही
दरम्यान, नवाब मलिक यांच्यावर कुख्यात गुंड दाऊद ईब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या आरोपांखाली ईडीने मलिक यांची आठ तास चौकशी करुन त्यांना अटक केलं होतं. तर ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झालेली असून न्यायालय येत्या १५ मार्च रोजी आपला निकाल देणार आहे. तर मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीने घेतलेली असून विरोधक मलिक यांच्या राजीनाम्यावर अडून बसलेले आहेत.