राजापूर तालुक्यातील बारसू इथल्या माळरानावर सुरु असलेल्या सर्वेक्षणाच्या ठिकाणी ग्रामस्थांकडून निदर्शने करण्यात येत आहे. दरम्यान, या सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी निलेश राणे हे बारसू गावात पोहोचले होते. मात्र, रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांचा ताफा अडवला. यावेळी राणे समर्थकांकडून त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. मात्र, त्यानंतर निलेश राणे यांनी हात जोडून ग्रामस्थांची माफी मागितली. ”जर आमच्यापैकी कोणी तुम्हाला शिवीगाळ केली असेल, तर मी तुमची हात जोडून माफी मागतो”, असे ते म्हणाले.
काय म्हणाले निलेश राणे?
“आपण जो विरोध करत आहात यातून लोकशाही मार्गाने मार्ग काढावा लागेल. मात्र, तुम्ही जो शिविगाळ केल्याचा आरोप करत आहात, जर कोणी तुम्हाला शिवीगाळ केली असेल, तर मी तुमची हात जोडून माफी मागतो. तसेच आमच्या लोकांना समज देतो. तुम्ही आमची माणसं आहात. तुम्ही आणि आम्ही वेगळे नाहीत. मात्र, चर्चेने मार्ग निघू शकतो. त्यामुळे कृपा करून हा विषय चिघळू देऊ नका, शांत व्हा”, अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली.
हेही वाचा – “ज्योती मेटेंना आमदार करा”, संभाजीराजे छत्रपतींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
रिफायनरी विरोधात ग्रामस्थ आक्रमक
राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. मात्र, याला ग्रामस्थांकडून विरोध होतो आहे. दरम्यान, निलेश राणेंच्या गाडीचा ताफा येताच ग्रामस्थ आक्रमक झाले होते. यावेळी महिलांनी रस्त्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले. कोणत्याही परिस्थितीत हे सर्वेक्षण करू देणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी संतप्त गावकऱ्यांनी दिली. तसेच नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या राणेंकडून या रिफायनरीचे समर्थन का? असा प्रश्नही ग्रामस्थांनी विचारला.