‘फडतूस’ आणि ‘काडतूस’ या दोन शब्दांनी राज्याचं राजकारण ढवळलं जात आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर बोलताना राज्याला फडतूस गृहमंत्री मिळाला असल्याची टीका शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी फडतूस नव्हे तर काडतूस आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल सुरू आहे. तर ठाकरे गटाकडूनही त्यावर प्रत्युत्तर दिलं जात आहे. याचदरम्यान, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनीदेखील उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
निलेश राणे यांनी एक ट्वीट करून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. या ट्वीटमध्ये राणे यांनी म्हटलं आहे की, सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण, दिशा सलियान मृत्यू प्रकरण, सपना पाटकर प्रकरण, अलिबाग प्लॉट, मुंबईचं वाटोळं इत्यादी, अशी उद्धव ठाकरे आणि कुटुंबाच्या फडतुसपणाची यादी मोठी आहे. या ठळक विषयांवर लक्ष दिले तर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा सत्यानाश होईल.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी, तसेच दिशा सलियान मृत्यू प्रकरणात राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. यावरून राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
ठाण्यात एकनाथ शिंदे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण केली आहे. या मारहाणीत रोशनी शिंदे जबर जखमी झाल्या असून त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिंदे यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारानी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही.”